विघ्नहर्त्याचे आगमन होऊन चार दिवस झाले. सगळीकडे वातावरण भक्तिमय बनलं आहे. खूप छान वाटतंय. सकाळी-संध्याकाळी आरतीचे सूर कानावर पडत आहेत. रेंगाळत राहिलेला फुले, धूप-अगरबत्तीचा सुगंध उत्सवाचा गंध मनापर्यंत पोचवत आहे. काही ठिकाणी ढोल-ताशे निनादत आहेत. कमी आवाजात का होईना डॉल्बीही वाजताना दिसत आहे. सगळं कसं प्रसन्न-प्रसन्न! मनामनांत ही प्रसन्नता तुडुंब भरलेली असल्यामुळेच सारा भोवतालही त्याच लाटेवर स्वार झाला आहे.
निरनिराळ्या आकारांतील गणेश मूर्ती कलाकारांची कला जगासमोर ठेवत आहे. मूर्तींचे सौष्ठव पाहताना तल्लीन व्हायला होत आहे. भावगर्भ नेत्र, मस्तकावरील किरीट, आभूषणांनी युक्त असं मनमोही रूप आठवून आठवून मनात साठविलं जात आहे आणि मनोमन नमस्कारही पोचता केला जात आहे.
पाऊस कमी पडलाय. महागाई वाढणार या नकारात्मक बाबीवर काही प्रमाणात का होईना हा उत्सव फुंकर घालत आहे. जगण्याची उमेद मनामनांत जागवत आहे. ऊर्जा निर्माण करून जगण्याची प्रेरणा पेरत आहे. मंगलमयी वाटेवरून चालताना अंतर्मुखही करायला भाग पाडत आहे. भोवताली घडणाऱ्या विविध घटनांचा मेळ घालण्यास भाग पाडत आहे. "मी- माझं' या चक्रातून बाहेर पडण्याविषयी सुचवून "आपण-आपलं'च्या दिशेने जाण्यासाठी थोडीफार तरी दिशा देत आहे. उत्सवाच्या निमित्ताने का होईना हातात हात गुंफून काही तरी विधायक घडविण्याच्या दिशेने पावले पडू लागल्याचे दिसते. भक्तीच्या वाटेवरचे प्रवासी होताना थोड्या प्रमाणात का होईना समाजाला माघारी काही तरी देण्याचं मन होत आहे. गणेशाप्रति काही तरी करताना ते ओझे न वाटता एक जबाबदारी पेलल्याचे समाधानही काही जण मिळवत आहेत. हे लाखमोलाचं समाधान त्यांना पुढे जाण्यासाठी प्रेरणादायी ठरत आहे.
No comments:
Post a Comment