मूर्तीला नमस्कार करून तो मंदिरातून बाहेर पडला. देवाचं नामस्मरण करत तो बाहेर पायऱ्यांवरच एका बाजूला काही वेळ तसाच बसून राहिला. काही वेळाने उठला. पुन्हा एकदा मूर्तीकडे पाहून त्याने नमस्कार केला आणि चप्पल घालण्यासाठी तो स्टॅंडजवळ आला तर ठेवल्या जागी त्याला त्याची चप्पलच दिसेना... तो अस्वस्थ झाला. अस्वस्थपणेच त्यानं सगळं चप्पल स्टॅंड तीन-तीनदा पाहिलं; मात्र चप्पल काही त्याला सापडली नाही. मघाशी देवाचं नामस्मरण करणारा तो अस्वस्थपणे आता मनातल्या मनात चप्पल नेणाऱ्याला "लाखोली' वाहू लागला. महिनाच झाला होता चप्पल घेऊन... आता पुन्हा भुर्दंड... एकदा चप्पल घेताना शंभरदा विचार करतो आम्ही आणि नेणारा... त्यानं पुढची वाक्ये मनातल्या मनात उच्चारली आणि दोन शिव्याही हासडल्या... वैतागून तो पुन्हा पायरीवर जाऊन बसला...काही वेळ गेला. मनाशी काही तरी ठरवून उठला. इकडं तिकडं बघत... त्यानं त्यातल्या त्यात बरी चप्पल पायात सरकवली आणि देवाकडं पाठ करून तो मंदिरातून बाहेर पडला.
पायऱ्या चढून घरात येता-येता, चप्पल काढतच त्याने झाली हकीकत "कुटुंबा'ला सांगितली.
त्याच्या पायाकडं पाहत त्याचं कुटुंब म्हणालं, "हे बरं झालं बाई, काहीतरी पायात घालून आलात ते! नाहीतर नेहमीप्रमाणे मंदिरात चप्पल गेली की पायात काहीही न घालता आला असता म्हणजे उद्या पहिली चप्पल खरेदी करावी लागली असती.''
तिचं ते बोलणं बहुधा त्याच्यापर्यंत पोचलं नसावं. तो कपडे काढून बेडवर आडवा झाला आणि चप्पल गेल्याचा विचार करू लागला. नेणाऱ्याला माझीच चप्पल दिसली काय? जरा नवी दिसली की घातली पायात. माणसांनी पुरती लाजच सोडली आहे. चपला पण सोडत नाहीत... अरे एखाद्याची ऐपत नसेल तर त्यानं काय अनवाणी फिरायचं? काय सालं जिंदगी...' तो चप्पलच्या विचारांतून बाहेरच यायला तयार नव्हता. एवढ्यात कुटुंब म्हणालं, "अहो तुम्ही ज्याची चप्पल घालून आलात तो बसला असेल की शोधत.''
झालं. तिच्या या वाक्यासरशी त्याच्या विचारांनी एकदम यु टर्न घेतला. अरेच्चा हा विचार मी केलाच नाही. मघाशी आवेगात चप्पल घालून आलो खरा पण, यापूर्वी मी जे अनुभवलं तोच अनुभव माझ्यामुळे एखाद्यावर येणार...आता तो आणखी अस्वस्थ झाला. त्याला आता अपराध्यासारखं वाटू लागलं. "माझी चप्पल गेली जाऊ दे... पण आपण दुसऱ्याची चप्पल घालून यायलां नको होतं. मी उद्या दुसरी चप्पल घेऊ शकतो; पण ज्याची चप्पल मी घालून आलो त्याची जर ऐपत नसेल तर... हे माझ्या लक्षात कसं आलं नाही. भावनेच्या भरात घातली चप्पल आणि आलो घरी. का मी भावनांवर नियंत्रण नाही ठेवू शकलो. काय अवदसा आठवली मला... विचारांचा भुंगा त्याला पोखरू लागला आणि त्याच्या अस्वस्थतेमध्ये भरच पडू लागली...
त्याच अस्वस्थतेत त्यानं दिवसभर ऑफिसात काम केलं. पायातली चप्पल त्याला मनात टोचत राहिली. कधी एकदा घरी जातोय असं त्याला झालं. काम संपवून तो घरी आला... फ्रेश झाला. त्यानं पुन्हा "ती' चप्पल अडकवली आणि तडक मंदिर गाठलं. जेथून त्यानं "ती' चप्पल पायात सरकवली होती तिथंच ती काढून ठेवली. चप्पल पायातून काढताच त्याला एकदम हलकं-हलकं वाटू लागलं. डोक्यावरचं ओझं उतरल्याचं समाधान त्याला मिळालं. तो पुन्हा मंदिरात गेला. मूर्तीपुढे नतमस्तक झाला. यावेळी त्याच्या मनावरील मळभही बऱ्यापैकी दूर झालं. चप्पल कोणाची का असेना, आपण पुन्हा जागेवर आणून ठेवली. ज्याची आहे तो कदाचित चप्पल शोधण्यासाठी येईल आणि त्याला ती मिळूनही जाईल; पण आता किमान ती माझ्याकडे तरी नाही याचं समाधान. हा विचार करतच तो बाहेर पडला आणि पायऱ्यांवर येऊन बसला. आता पोखरणाऱ्या भुंग्याने त्याची पाठ सोडली होती. चप्पल हरवल्याचं वाईट वाटणं त्याच्या लेखी संपलं होतं. आपण घालून गेलेली चप्पल पुन्हा आणून सोडल्याचं समाधान त्याला जास्त समाधानी करत होतं. त्याच समाधानात तो बराच वेळ तसाच बसून राहिला.
बराच वेळ गेला. आता तो पायऱ्यांवरून उठला. पुन्हा एकदा समाधानाने मूर्तीला नमस्कार केला आणि मंदिरातून बाहेर पडला. जाताना सहज त्याचं लक्ष चप्पल स्टॅंडकडे गेलं. पाहतो तर काय... त्याची काल कोणीतरी घालून गेलेली चप्पल आहे त्याच जागी आणून ठेवलेली त्याला दिसली. तो घाईने जवळ गेला. त्यानं निरखून पाहिलं तर ती त्याचीच होती म्हणजे ज्यानं नेली होती त्यानं ती पुन्हा आणून ठेवली होती तर.... त्यानं अगदी अधाशीपणे ती चप्पल पायात सरकवली. पुन्हा एकदा मंदिरातील मूर्तीकडे पाहिलं आणि मस्त शीळ वाजवत तो तिथून बाहेर पडला... पूर्ण समाधानाने! |
No comments:
Post a Comment