Monday, February 14, 2011

अखेरचा डाव!

बेल वाजली तिनं दार उघडलं ! धाप आवरत तो घरात आला. तिनं पटकन आत जाऊन पाण्याचा ग्लास आणला.
"तो' पाणी पित असताना तिनं खुणेनंच चहाविषयी विचारलं! त्यानं होकारार्थी मान हलविली.
आता त्याची धापही थांबली! त्यानं शर्ट काढला. तिथंच खुर्चीवर टाकला. त्याच खुर्चीवर रेलून पाय लांबविले आणि "ऐ मेरी जोहराजबी तुझे मालूम नही...' ची मस्त शीळ देत डोळे मिटले.
चहा घेतोस नं!
तिच्या हाकेनं तो भानावर आला. त्यानं कप घेतला आणि चहाचे घोट घेऊ लागला.
ती समोरच्या खुर्चीवर बसून चहा घेऊ लागली आणि त्याच्या "हॅपी मूड'मुळे सुखावली.
आजारपणामुळे त्याचं हास्य विरलंय हे तिला माहित होतं, त्यामुळेच त्याचा आजचा मूड पाहून तिला बरं वाटलं.
न राहवून तिनं विचारलंच,""आज एकदम मूड चेंज, काय भानगड?'
""ह्या, भानगड-बिनगड काहीही नाही! असंच! बरं पटकन आवर. बाहेर जायचंय. किशोरीच्या कार्यक्रमाची दोन तिकिटं आणलीत!''
तिच्या परवानगीची वाट न पाहता तो उठून आवरू लागला!
क्षणभर तिला काही कळेचना. तिनंही झटपट आवरलं! त्याला आवडणारी गुलाबी रंगाची साडी नेसून ती तयार झाली.
तिला पाहताच पुन्हा एकदा त्याच्या ओठांवर "ए मेरी जोहराजबी...'ची शीळ आलीच.
"चलायचं!
दोघेही रस्त्यावर आले. नेहमीप्रमाणे तिची पावलं बसस्टॉपकडे वळली, तोच "टॅक्‍सी' या त्याच्या हाकाऱ्याने ती उडालीच. आज टॅक्‍सी!
दोघे टॅक्‍सीत बसले! तिला आज तो नेहमीपेक्षा वेगळा-वेगळा भासला! आज त्याचा मूड एकदम कसा काय बदलला?
थिएटरच्या गेटसमोर टॅक्‍सी उभी राहिली आणि तिची विचारांची श्रृंखला खंडित झाली.
त्यानं टॅक्‍सीवाल्याला पैसे दिले. तिच्या हातात कार्यक्रमाची तिकिटे देऊन तिला पुढे जाण्यास सांगितले.
तिकिटं घेऊन ती अँपी थिएटरच्या पाठीमागील बाजूस गेली. समोर उभ्या स्वयंसेवकाच्या हातात तिकिटं दिली आणि बसण्याची जागा विचारली!
त्यानं तिकिटं हातात घेतली आणि मागून येण्याविषयी खुणावलं! ती पाठोपाठ चालू लागली. "किशोरी' मंचावर जेथे बसणार त्याच्या बरोबर समोर भारतीय बैठकीकडे त्या स्वयंसेवकाने खूण केली! काहीशी अवघडून ती त्या बैठकीवर जाऊ बसली! आत्तापर्यंतचे पाहिलेले सर्व कार्यक्रम थिएटरच्या शेवटच्या कोपऱ्यात बसूनच पाहिलेले असल्याने एकदम पहिल्या रांगेत जाऊन बसणे ही कल्पनाच ती करू शकत नव्हती आणि आत्ता तर खास बैठकीवर. तिचं लक्ष तिकिटांकडे गेलं. पहिल्या रांगेतील खास तिकिटे होती.
एवढ्यात तो ही आलाच!
""जरा तिकडं बघतेस!' असं म्हणून त्यानं तिच्या केसांत मोगऱ्याचा गजरा माळला.''
अपूर्वाईने मोहरलेल्या तिच्या श्‍वासांत मोगऱ्याचा गंध काठोकाठ भरला! ती त्याच्या चेहऱ्याकडे एकटक पाहू लागली.
तिची नजर चुकवत तो कार्यक्रम सुरू होण्याची वाट पाहू लागला!
तब्बलजीने तबला ठीक केला, तानपुऱ्यावरील मुलीनं तारांना ताण दिला. सतारीचे स्वर ठीक केले गेले आणि त्याच वेळी किशोरी मंचावर आल्या...
स्वरांच्या एकेक लडी उलगडल्या आणि मैफलीत रंग भरू लागला.
"जाईन विचारीत रानफुला...' किशोरींनी सुरू केलं आणि... वाह।।। च्या उत्स्फूर्त प्रतक्रिया उमटल्या!
त्यानंही तशीच दाद दिली. तल्लीन होऊन किशोरी ऐकत असताना त्यानं तिचा हात हातात घेतला आणि त्याच्या स्पर्शाचं गाणं तिच्याभोवती फेर धरून नाचू लागलं!
ती गाणं विसरली. भूतकाळात गेली. पाच वर्षांपूर्वी अखेरच्या स्टेजच्या कॅन्सरशी झगडत असताना "तो' आयुष्यात आला!
ंसह घरातील सर्वांनी जेव्हा आपल्याला दूर लोटलं तेव्हा त्याने आधार दिला. जगण्याची उमेद जागवली. वर्षभर सेवा केली! मरण लांबवलं! सहवासानं ओढ वाढली!
एक दिवस चहाला म्हणून रेस्टॉरंटमध्ये गेलो, तेथे लग्नाविषयी विचारलं! स्वतःविषयी सांगितलं! दोन मुलं अमेरिकेत! त्यांना बापाची गरज नाही. नातवंडांसाठी आजोबा अनोळखी. पत्नी दहा वर्षांपूर्वीच गेली! घरी एकटाच राहतो. कॅन्सरग्रस्तांच्या रुग्णालयात सेवाभावी वृत्तीनं काम करतो आणि आता आधाराची गरज आहे.
"नाही म्हणूच शकले नाही!'
सहजीवन नव्याने सुरू झालं. सुखाचे दिवस आल्याचं वाटत असताना "त्याला'ही ब्रेन ट्यूमर असल्याचं समजलं आणि आशेच्या पालवीने नव्याने फुललेल्या झाडाला दुःखाची वाळवी लागली! गेले वर्षभर दोघेही एकमेकांच्या आधाराने जगत अखेरच्या दिवसाची वाट पाहत असताना... आज अचानक?
टाळ्यांचा गजर झाला आणि तिची विचारमालिका भंगली.
दोघेही उठले...बाहेर आले...
त्यांच्या आवडीच्या रेस्टॉरंटमध्ये जेवले! तेथून बाहेर पडले आणि चालत चालत नदीकाठी आले.
नेहमीप्रमाणे अनेक जोड्या बसलेल्या.
दोघेही एका ठिकाणी बसले... बराच वेळ कोणीच काही बोलले नाही!
पाण्यावर उमटणाऱ्या तरंगावर चांदणप्रकाशाचा खेळ रंगलेला.
तिनं मौनाला बोलतं केलं!
"काय विशेष? स्वारी आज एकदम वेगळ्या मूडमध्ये...घरात शीळ घालून गाणं काय?, येताना टॅक्‍सी, मग "किशोरी' तीही पहिल्या रांगेत बसून...गजरा...रेस्टॉरंट आणि आता इथे... काय दोघांच्या मरणाची तारीख समजली की काय?
तो काहीच बोलला नाही! फक्त नदीकडे पाहत राहिला!
"बोल ना काही तरी! नाही तर जाऊ या घरी' म्हणून ती उठू लागली!
आता त्याचं मौन सुटलं! तो आश्‍वासक हसला!
हसतोस काय? आपण अवघ्या काही दिवसांचे पाहुणे आहोत हे विसरलास काय?
काहीही विसरलो नाही! असं म्हणत त्यानं शर्टाच्या आतून छानसा गुलाब आणि पाकीट काढलं आणि तिच्या हाती दिलं, म्हणाला, "हॅपी व्हॅलेंटाईन!'
आता तिला दिवसभराच्या त्याच्या वागण्याचा अर्थ उमगला! तिचे डोळे भरले! जाता जाताही तो आपल्याला आनंदाचे क्षण देतोच आहे! तिच्या तोंडून हुंदका बाहेर पडला!
बराच वेळ रडल्यानंतर तिनं डोळे पुसले आणि पाकीट फोडून पाहिले.
कसली तिकिटं आहेत?
"पुढच्या आठवड्यात आपण लंडनला जातोय!'
"कशाला?'
"दोघांवरही शस्त्रक्रिया करायची आहे. दोघांचेही कॅन्सर शेवटच्या स्टेजला असले तरी होप्स आहेत! मग निदान जाता जाता दोघांसाठी एक डाव खेळून बघायला काय हरकत आहे! त्याचीच ही गिफ्ट! हॅपी व्हॅलेंटाईन!
त्यानंतर दोघे कितीतरी वेळ भविष्याविषयी बोलत राहिले!

14 comments:

खूप आठवणी,,, said...

mast!!!!!!!!!!! khup chan lihile aahe....Great!!!!!!!!!

prajkta said...

thank u so much

भानस said...

प्रसाद, तरल, हळुवार ओघवती कथा. खूप आवडली!!!

लिहीत जा रे लवकर लवकर. :)

prajkta said...

thank u bhans....khup khup bare watle....vichar khup dokyat aahet....pan kagdawar ootrat nahi...aalas.nadtoy

Sonal said...

god bless them both...

hanuman waghmare said...

aavadali
he suddha ekda paha...

http://72.78.249.107/esakal/20110217/4974338815236737677.htm

prajkta said...

sonal and waghmare khup khup thanks

prajkta said...

hanuman waghmare.......to mich aahe...so dont worry and thanks. tumchya sajgtebaddal

सुप्रिया.... said...

khup sahi post....

prajkta said...

thank u so much सुप्रिया.

महेश सावंत said...

khup chan post jhali aahe

prajkta said...

thank u mahesh

saumiti said...

Great post ahe hi... :)

Atul said...

पूर्वी वाचली होती. खूपच व्हायरल झाली. फेसबुकवर आणि व्हाट्सपवर फिरत आहे अजूनही. पण मला व्यक्तीश: अजिबात न पटलेली कथा आहे. कॅन्सरच्या (तो सुद्धा ब्रेन ट्युमर) शेवटच्या स्टेज मधले रुग्ण शीळ घालत गायनाच्या कार्यक्रमाला, नदीकाठी फिरायला वगैरे जातात हे फारच अवास्तविक आहे. कर्करोग इतका हलकाफुलका गमतीजमतीचा रोग नाही. शेवटची अवस्था भयाण असते. त्या अवस्थेत कर्करोगाचे रुग्ण काय प्राणांतिक यातनांमधून जात असतात याची बहुधा लेखकाला कल्पना नसावी. अज्ञानातून केलेले लिखाण आहे. (किंवा रूपक वगैरे असेल तर मला माहित नाही. पण तरीही कर्करोगाचे उदाहरण नकोच होते. पूर्ण असहमत).