Sunday, June 19, 2011

बापपण अनुभवताना...

कानावर तुझा रडण्याचा पहिलावहिला ट्याहां ट्याहांचा स्वर पडला अन्‌ आनंदानं छाती गच्च भरून आली.
तुझा जन्मसोहळा सुखरूप पार पडावा म्हणून हातांची बोटे होती त्या वेळी एकवटलेली परमेश्‍वरचरणी.
दुपट्यात गुंडाळलेली मऊसुत सावरीपरी तू आलीस सामोरी खरी; मात्र तेव्हा पापण्यांवर थबकल्या थेंबांतून तू भेटलीस मला धूसर धूसर.
मला सुचलेच नाही तुला अनुभवण्याचे, ना हृदयाशी कवटाळण्याचे.
मग आलं भान जरा, इवल्याशा तुला मी धरलं
हृदयाला आणि बापपणाचा अर्थ पोचला पार मनाच्या तळाला.
तुझ्या लुकलुकत्या डोळ्यांनी, बालमुठीत एकवटलेल्या असंख्य स्वप्नांनी घातली मला साद आणि आनंदाने भरून वाहत राहिला माझा श्‍वास अन्‌ श्‍वास.

------------------------
आळसावलेलाच होता तो माझा दिवस जरा.
भोवताली तुझं रांगत-रांगत खेळणं, मध्येच येऊन पुस्तक ओढणं, मस्ती करणं आणि सुरू होतं खळाळून हास्यफुलं उधळणं.
खेळता खेळता एकवटलंस बळ आणि राहिलीस क्षणभरच पहिल्यांदाच उभी स्वतःच्या पायावर.
पाहिलंस माझ्याकडे तेव्हा डोळ्यांत तुझ्या उसळला होता आत्मविश्‍वासभरला सागर.
हसलीस छानसं गोड आणि टाकलंस पहिलं अडखळतं पाऊल.
गेला तोल तुझा, सावरलं मी तुला अलगद हातांवर.
तुझ्या चेहऱ्यावर आनंद उमटला आणि माझ्या विस्फारल्या बाहुल्यांनी साठविला तो क्षण डोळाभर.

------------------------
त्या दिवशी पोचलो पाऊसधारांना सोबत घेतच शाळेवर.
मस्त गुलाबी ड्रेस खुलला होता तुझ्या नाजुकशा अंगावर.
गोड-गोड बोलत, समजावून सांगत, कॅडबरीचं प्रॉमिस करत सोडलं तुला वर्गाच्या दारात.
बाईंनी तुला घेतलं आत आणि लावून घेतलं दार.
बंद होणाऱ्या दारांच्या फटीतून दिसली मला तुझी भरून आलेली नजर आणि जाणवली त्यामध्ये दूर जातानाची असहायता, माझ्यावर आलेला मोठ्ठा राग आणि व्यक्त न करता येणारी घुसमट. बोलत होती नजर, "बाबा, तू वाईट्ट आहेस, सोडून मला नको जाऊस...' आईशपथ सांगतो त्या नजरेनं कालवला जीव. शहारा उमटला देहभर.

------------------------
कॅलेंडरवरील तारखा राहिल्या फडफडत, अंगणातला पारिजातकही फुलत राहिला काठोकाठ.
उगवणाऱ्या प्रत्येक सोनेरी दिवसाचं बोट धरून तू आनंदाच्या किरणांनी शिंपलेस आपलं अंगण.
समाधानाचे क्षण गुंफत राहिलीस एक-एक आणि घट्ट होत गेले आपसुक सारे भावबंध.
तुझे यशाचे क्षण घेऊन आले आनंदसरींची बरसात आणि चिंब न्हात राहिलं आपलं घर.
कधी पुरवून घेतलास हट्ट, कधी रुसलीस, कधी लटक्‍यानेच रागावलीस, भांडलीसही, मोठी होऊनही "गट्टी फू' करताना तू माझ्यासाठी मात्र सानुलीच राहिलीस.
तुझ्या कर्तृत्वाने आकाश आमचे उजळले, यशाचे ते सोनभरले क्षण भरून ठेवले मनाच्या कुपीत.
वाटली जेव्हा काळजी पहिल्यांदा तुझ्याबद्दल, तेव्हा खांद्यावर हात ठेवून म्हणालीस, "पिलावर विश्‍वास नाही का तुमचा बाबा?'
गैरविश्‍वास नव्हता गं! आतून आलेले तुझ्याबद्दलचे काळजी वाहणाऱ्या बापाचे भेदरलेपण.
ते भेदरलेपण मोडताना भक्कम अस्तित्वाने तू घालत राहिलीस सतत फुंकर.
ओळखतात जेव्हा मला "तुझा बाबा' म्हणून, अभिमानाने भरलं माझं मन हिंदोळत राहतं वाऱ्याच्या लहरींवर.

------------------------
पाहू या- करू या... करत मी ढकलत राहिलो तुझ्या आयुष्यातला तो सोनेरी दिवस.
मात्र अखेर आलाच "तो क्षण', जो माहीत असूनही लपवत राहिलो स्वतःपासून आयुष्यभर.
सनई, चौघडे वाजू लागले, घर सजलं, अंगण मांगल्यानं काठोकाठ भरलं.
सनईच्या सुरावटीने भारला सारा भवताल. पळ भरले आणि आली लग्नघटिका समीप.
"शुभमंगल....' शब्द-सूर उच्चारत गेले आणि फुटणारा बांध कसा आवरू आवरू झाले.
...आठवला तुझा जन्मसोहळा, तुझा पहिला मृदू सहवास, लुकलुकणारे डोळे, तुझं पहिलं पाऊल, पहिलं यश.
आठवला तुझा मला धीर देणारा स्पर्श, मैत्रीण होऊन झेलताना लुटलेला बापपणाचा आनंद.
उभे राहिले डोळ्यांसमोर तुझ्यासोबतचे लटके रागाचे क्षण, कधी तरी चुकून उचलला गेलेला हात आणि मग कुशीत शिरून मुसमुसणाऱ्या तुला सावरताना माझ्यातला गळून पडलेला कठोर बाप.
"कन्यादानाचं पाणी सुटलं हातातून अन्‌ जाणवलं आपलं पिलू आपल्याला कायमचं दुरावलं...'
उंबरठा ओलांडण्यास निघाली अन्‌... "बाबा।।। म्हणून धावत शिरलीस आवेगाने माझ्या कुशीत...'
खरं सांगतो पोरी, तेव्हा कढ दाटल्या हृदयातलं बापपण धो धो रितं होत राहिलं अश्रूंमधून..
also on: http://72.78.249.107/esakal/20110619/5214167252538387743.htm

7 comments:

भानस said...

अप्रतिम!प्रसाद अगदी आतून लिहीलीस रे.

एका बापाच्या प्रत्येक श्वासात गुंतलेल्या लेकीच्या आठवणींचा हिंदोळा खूप भावला. हे काळजाचे तुकडे नेहमीच आनंदी, औक्षवंत राहोत.

Sonal said...

aai gaa.... pratyek ol waachtaana shahaare yet hote. mast!!!

Sonal said...

shewatchya oli wachtana maatra dolyat paani aala..

prajkta said...

thank u भानस aani Sonal. khup khup bare watle...tumhala aawdle.

रुही said...

अप्रतिम लिहिलंय...मी माझ्या वडिलांच्या आठवणींनी हळवी झाले. त्यांना जाऊन ६ वर्ष झाली. लेख वाचताना माझे बालपण डोळ्यांसमोर आले.

prajkta said...

thank u ruhi

saumiti said...

अप्रतिम आहे ही पोस्ट... सगळं लहानपण डोळ्यासमोर उभं राहिलं. अनेक रुसवे-फुगवे, भांडणं, कौतुकाचे असंख्य क्षण...
वाचताना ओठावर हसू आलं आणि तितक्याच सहज डोळ्यात पाणीही आलं...