Saturday, September 24, 2011

जन्मापूर्वी...मी...

"आता फक्त काही दिवसांचा प्रश्‍न आणि आपण मोकळा श्‍वास घेणार. जग खूप सुंदर आहे, असं म्हणतात. ते आपण पाहू शकणार. जगातली प्रत्येक सुंदर गोष्ट आपल्याला अनुभवता येणार. वेगवेगळे रंग, वेगवेगळे गंध, झाडं, पानं, फुलं, वेगवेगळ्या प्रकारची माणसं, आणखी बरंच काही पाहायला मिळणार.

ती दोघं ताईसोबत आपल्यासाठी किती स्वप्नं रंगवत आहेत. दोघं सारखं काहीबाही बोलत असतात. "तो' म्हणतो मला डॉक्‍टर करायचं, तर "ती' म्हणते नाही, इंजिनिअर करायचं. मग दोघंही म्हणतात, "त्याला' जे व्हायचंय ते होऊ दे, आपण फक्त त्याच्या पंखात बळ भरू. रोज वेगळंवेगळं ठरवत असतात. एक मात्र खरं, दोघंही माझ्यासाठी जाम खूश आहेत. मला काय काय खायला देतात. तिनं नुसतं नाव उच्चारलं तरी तो तातडीने तिच्यासाठी सगळं हजर करतो. आईस्क्रीम काय, डोसा काय, वडे काय.... माझी तर मेजवानीच सुरू आहे. मज्जा येते नुसती. कित्येकदा मनात विचार येतो, काय करायचं बाहेर जाऊन? त्यापेक्षा येथेच मला हवं ते अगदी विनासायास मिळतंय. त्याचाच घेऊ मनमुराद आनंद. त्यांच्या कौतुकाच्या बदल्यात मी काय करायचं, तर फक्त तिच्या पोटाला जराशी ढुशी द्यायची, कधी तरी पाय झाडायचे. कसली खूश होते ती! तिचा आनंद मला जाणवत राहतो आणि मग मलाही चेव चढतो. अक्षरशः ढुशा मारून, लाथा मारून मला दमायला होतं; पण ती मनापासून आनंदते. भोवतीच्या सर्वांना अगदी कौतुकाने सांगते, "ढुशा देतो लबाड मला. असलं भारी वाटतं!' तिच्या बोलण्यातून माझ्याबद्दल आनंद, कौतुक अगदी भरभरून व्यक्त होत असतं. ती आनंदली की मलाही शहारल्यासारखं होतं. वाटतं, असं तिच्या मिठीत विरघळून जावं. मग जाणवतं, अरेच्च्या, मी तिचाच अंश आहे की...'

"दोन दिवस झाले, दोघंही अगदी गप्प गप्प आहेत. ताईचापण आवाज नाही. त्यांच्या नेहमीच्या छान-छान गप्पा ऐकायलाच मिळत नाहीत. "ती' पण अगदी गप्प गप्प असते. माझ्याकडे लक्ष द्यावं म्हणून काल किती ढुशा दिल्या; पण ती नेहमीसारखं काहीच बोलली नाही की कौतुकानं तिनं कोणाला काहीच सांगितलं नाही. "त्यानं' पण माझी जरासुद्धा चौकशी केली नाही. माझ्यासाठी काही खाऊही आणला नाही. परवापर्यंत माझे कौतुक करताना दोघंही थकत नव्हते, मग अचानक काय झालं बरं..... अरे हां, परवा दवाखान्यात जाऊन आल्यापासून त्यांच्यात हा फरक पडला.

काय झालं बरं दवाखान्यात? हां, आत्ता आठवलं...डॉक्‍टरांनी तपासणी केली आणि ते म्हणाले, "बेबी इज गुड अँड नॉर्मल.' मलाच म्हटले असणार. माझं हलतं बोलतं चित्रही म्हणे त्यांनी पडद्यावर दाखवलं दोघांना. त्यावेळी ती कसली मोहरली. ती मोहरली आणि माझ्या रोमारोमावर मोरपीस फिरवल्यासारखं वाटलं. माझ्यासाठीचा तिचा आनंद बघून मला काय करू आणि काय नको असं वाटलं. तेव्हाच ठरवून टाकलं, जगात प्रवेश केल्यानंतर तिचं प्रत्येक स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण धडपडायचं...

एवढ्यात "त्याचे' शब्द कानावर पडले. ""डॉक्‍टर, प्लीज सांगा काय आहे, मुलगा की मुलगी..'' डॉक्‍टरांनी बरेच आढेवेढे घेतले. तो म्हणाला, ""डॉक्‍टर, प्लीज तुमची काही अपेक्षा असेल तर बोला; पण सांगा काय आहे!'' खूप आढेवेढे घेतल्यानंतर डॉक्‍टरांनी जे सांगितलं ते ऐकून "ती' काहीशी हलल्यासारखी वाटली आणि त्यानंतर दोघांमधील संवादच बंद झाला. दोघेही घरी आले पण त्यांच्यात नेहमीसारखं बोलणं झालंच नाही दोन दिवस.

एकदा ती म्हणाली, आपल्या हातात काही नसतं. सगळी परमेश्‍वरी कृपा. जे आहे ते आपण स्वीकारू. जगात इतरांकडेही जरा पाहा. पण बहुधा त्याला माझं "असणं' आवडलं नसावं. त्याच्या बोलण्यात माझ्याबद्दलचा विखार जाणवला. त्यानंतर दोघांमधील संवादच बंद झाला.

त्याच्याकडून होणारे माझे लाड बंद झाले. आताशा "तो' माझी चौकशीही करेनासा झाला. "तिनं' मात्र मला तिला जमेल तसं जपलं. मला हवं नको ते पाहिलं. माझ्याबद्दल त्याच्यासोबत वादही घातला. पण त्याला मात्र मी नकोशी झाले आहे. परवा तर मला तो "धोंड' म्हणाला. कसली रडली ही. तिच्या रडण्यानं माझ्याही अंगाला कापरं भरलं...'

"काय करू मी जगात येऊन? मी येणार म्हणून आनंदित असलेल्या दोघांमध्ये मी कोण आहे हे समजल्यानंतर किती अंतर पडलं. त्यापेक्षा मी जगात नाहीच आले तर? त्याच्या गळ्यातली धोंड जाईल. माझ्या जन्माला येण्याने जर "तिला' बोल लावला जाणार असेल तर मी का म्हणून जन्म घेऊ? मरून का काय ते जाऊ या... छे छे, भलतेच काय विचार करतेय मी! तिला काय वाटेल? तिनं मला कुठं अंतर दिलंय? ती खूश आहे. मला तिच्यासाठी जन्माला यायला हवं. तिचा अंश म्हणून मी जग पाहिलं पाहिजे. ती किती माझ्यासाठी खंबीर राहिली आहे हे मी विसरून चालणार नाही. तिच्या आनंदासाठी, समाधानासाठी मी जन्मले पाहिजे. माझ्यासाठी भांडणाऱ्या तिला पाहून मला कृतज्ञता व्यक्त करायची आहे. "त्याच्या' विचारांची दिशा चुकलीय हे दाखविण्यासाठी मी जन्मलं पाहिजे. तिचं आईपण किती मोलाचं आहे, हे दाखविण्यासाठी मला जन्मलं पाहिजे. त्याला "बाबा'पणाचा आनंद देण्यासाठी मी जन्मले पाहिजे. मला जेव्हा तो पाहील तेव्हा तो पाहतच राहील, मला खात्री आहे...'

"कसली गोड आहे नं ही... अगदी कापसासारखी. माझ्याकडेच पाहून हसतेय. माझं चुकलंच. ए, मला माफ कर हं...मी उगीच... तिच्या जीवावर उठलो होतो. हिला मी सगळी सुखं देणार...तिला मी डॉक्‍टर करणार...'' त्याच्या त्या बोलांनी ती गहिवरली. दोघांच्याही डोळ्यांत पाणी तरळलेलं मी पाहिलं. त्या वेळी बाबांच्या कुशीतल्या "मला' माझी आई किती ममत्वाने पाहत होती.. आई, तू कसली भारी आहेस गं. तू जगातली सर्वांत सुंदर आई आहेस. माझी आई, जिनं मला हे जग दाखवलं....

3 comments:

saumiti said...

सगळ्या मुली अशाच निर्विघ्नपणे जन्माला आल्या आणि सगळ्याच आई-बाबांनी त्यांचं अशाच उत्कटपणे स्वागत केलं तर खरंच किती छान होईल... :)

prajkta said...

thank u saumiti

सौ गीतांजली शेलार said...

khup chan !