Saturday, October 13, 2012

चैतन्याचं झाड...

डोक्‍यावरून हात फिरवत केस व्यवस्थित असल्याचा अंदाज घेत त्यानं पायात चप्पल सरकवली, खांद्याला अडकवलेली पिशवी पुन्हा एकदा सरळ केली आणि तो घरातून बुथकडे जाण्यास निघाला. त्याच्या नव्या दिवसाची सुरवात झाली. घरापासून साधारण किलोमीटरवर त्याचा बुथ होता. दिवसभर काम करायचं सायंकाळी घर गाठायचं हे त्याचं गेल्या कित्येक वर्षांचं रुटीन. या रुटीनला तो मुळीच कंटाळलेला नव्हता. त्याला कारण त्याचा रोजचा जाता-येता होणारा प्रवास. या किलोमीटरच्या प्रवासात तो रोजच्या आयुष्याला नव्याने सामोरा जात असे. आजचा दिवसही असाच. तो घरातून बाहेर पडला आणि त्याची पावलं नेहमीच्या दिशेने पडू लागली.
काही अंतर जाऊन तो कोपऱ्यावर वळला आणि डाव्या बाजूला पाहत त्यानं श्रद्धेने हात जोडले. काही क्षण रेंगाळला. मंदिरातील घंटा किणकिणली... एकापाठोपाठ तिची कंपनं त्यानं रोजच्या सवयीनं ऐकली. तो तोंडातच काहीतरी पुटपुटला... बहुधा "देवा मला सुखी ठेव' असं काहीसं म्हणाला. पुन्हा वळून चालू लागला. गेल्या कित्येक वर्षांची सवय. तो खास होऊन मंदिरात जात नसे; पण रोजचा नमस्कारही चुकवत नसे. मंदिरातल्या देवानंही ते ताडलं असावं. तो त्याच्या बाहेरून केलेल्या नमस्कारावरही खुश होत असावा. कारण गेल्या कित्येक वर्षात या मंदिरात न येणाऱ्या भक्ताला त्यानं फारसा त्रास दिलेला नव्हता. त्यामुळे त्याचा रोजचा नमस्कार देवापर्यंत पोचत होता आणि देव त्यावरच खुश होता.
काही अंतर पार केलं आणि मोगरा, गुलाब, चमेली, निशिगंध, सोनचाफ्याच्या फुलांचा मिश्रित गंध त्याच्या नाकाजवळ रेंगाळला. येथूनच घराघरांतील देव्हाऱ्यांत फुलं पोचतात आणि घरं सुगंधीत होतात. काही क्षण त्याचा चालण्याचा वेग मंदावला. त्यानं फुलांच्या दिशेने पाहत हा मिश्रीत गंध छाती भरून घेतला. हा गंध आता त्याला दिवसभर सोबत करणार होता. या गंधाच्या साथीने तो दिवसभराची कामे न कंटाळता करत राहणार होता. समाधानाने तो स्वतःशीच हसला आणि चालू लागला.
आता कपबशा विसळल्याचा, चहामध्ये घालायची सुंठ छोट्या खलबत्त्यात कुटल्याचा आवाज कानावर पडला आणि तळणीचा खमंग वासही त्याच्या नाकात शिरला. त्याची पावलं "तुकाराम'च्या चहाच्या गाड्याकडे वळली. समोर मांडलेल्या खुर्चीवर तो विसावला. "काय कसं काय?'ची चौकशी झाली. तुकारामनं चहाच्या पातेल्यात ओगराळं फिरवत "मस्त चाललंय' म्हणत त्याला प्रतिसाद दिला. जोडीला इतर विषयांवर चर्चा रंगली. बोलत बोलत चहा पिऊन झाला. त्याच्या पायाला विश्रांती आणि मनाला समाधान लाभलं. अमृततुल्यची चव ओठांवर रेंगाळली तिच सोबतीला घेऊन तो बाहेर पडला आणि पुन्हा बुथ जवळ करू लागला. आता एक चौक ओलांडला की पुढच्या चौकात बुथ. चालत चालत तो दिवसाच्या कामाची मनात आखणी करू लागला. अमूक पुस्तकांचे गठ्ठे बांधून ठेवायचे. उद्या उदबत्त्या आणायला हव्यात. काही ब्रॅंड संपलेत, कागदही संपत आलेत, ते ही आणून ठेवले पाहिजेत. पुढच्या महिन्यात कॅलेंडर लागणार तेही आणले पाहिजेत... विचारांच्या तंद्रीत तो चौकाजवळ पोचला.
---
तो चौकात पोचला खरां... पण त्याला चुकल्याचुकल्यासारखं वाटू लागलं. घरातून निघालेली वेळ, तुकारामच्या चहाच्या गाड्यावर घालवलेला वेळ आणि चौकात पोचायची वेळ यांचं गणित चुकल्यासारखं वाटू लागलं. का आपला रस्ता चुकला हेही त्याला समजेना. त्यानं हातातली काठी सवयीच्या पारावर आपटली तर तो पार तेथेच होता. तेथे नेहमी दोन वाहने उभी असतात ती पण त्याच्या जागी होती. तरीही त्याला काही तरी हरवल्यासारखं वाटत होतं. आपण चुकून विचारांच्या तंद्रीत भलत्याच रस्त्याला तर लागलो नाही ना! आता तो प्रचंड अस्वस्थ झाला. आता दुकानात पोचताना कसरत करावी लागणार, चार ठिकाणी विचारावं लागणार... विचारावं लागणार या विचारानं त्याची अस्वस्थता आणखी वाढली. परावलंबित्वाचा एक काटा त्याला टोचू लागला. इलाज नाही हे समजून अंदाज घेण्यासाठी त्यानं जाणाऱ्या एकाला हटकलं आणि विचारलं. दादा इथं कोपऱ्यात एक झाड....?
तो म्हणाला,"काय राव, रस्ता रुंदीकरणासाठी कार्पोरेशननं काल रात्रीच झाड तोडलं की... लाकडं पण गोळा करून नेली!'
--
...आता मात्र तो आतून कोसळला. आधार घेत बाजूच्या पाराला टेकला. पोचेल तिथपर्यंत हात फिरवत राहिलां. बुंधा हाताला लागेल या वेड्या आशेने चाचपत राहिला. झाडच नसल्यामुळं बुंधा असण्याचा प्रश्‍नच नव्हता. रोजची त्याला परिचित असणारी पक्ष्यांची किलबिलही नव्हती... तिथून जाताना रोज अनुभवण्यास मिळणारी वाऱ्याची झुळुक नव्हती...
रोज किलबिलाटाचा आवाज कानी पडला की रस्ता बरोबर असल्याची खुण त्याला पटायची आणि पक्ष्यांच्या आवाजानं त्याच्या मनावरील निराशाही दूर होत राही. तो किलबिलाट त्याच्या अंधारल्या आयुष्यात चैतन्य निर्माण करत राही, जगण्याचं सूत्र समजावत राही. वाऱ्याची झुळुक मनाला आणि देहाला गारवा देत राही... पण आता हे झाड भेटणार नाही... पक्ष्यांचे हक्काचे घर हिरावले गेल्याने त्यांचा किलबिलाट नाही... वाऱ्याची झुळुक नाही... जाणाऱ्या-येणाऱ्यांना सावली नाही आणि आपल्या रस्त्यात रोज मिळणारं चैतन्यही नाही... त्यानं ओलावलेले डोळे पालथ्या हाताने कोरडे केले... पुन्हा एकदा दोन्ही हात पारावर फिरविले... हाताशी झाडाचं एक गळालेलं पान लागलं. ते हाताशी घेतलं... थरथरणाऱ्या काठीने अंदाज घेतला आणि तो भरल्या मनाने दुकानाच्या दिशेने चालू लागला... 

No comments: