Sunday, May 6, 2012

दिल को लग गयी...


छायाचित्र संकेतस्थळाच्या सौजन्याने

दिल को लगेगी तभी तो बात बनेगी... हे वाक्‍य "सत्यमेव जयते' ही मालिका सुरू होण्यापूर्वी आमिरखान आपल्या जाहिरातीमधून सातत्याने ऐकवत होता. त्याच वेळी आमिरचा हा कार्यक्रम कोणत्या दिशेने जाणार हे स्पष्ट होत होते. रविवारी सकाळी अकरा वाजता कार्यक्रम जेव्हा एअरवर गेला त्यानंतरची 90 मिनिटे फक्त आमिरची होती. या नव्वद मिनिटावरील (निदान पहिल्या भागात तरी) त्याची हुकुमत अगदी स्पष्ट दिसून आली. तो परफेक्‍सनिस्ट आहे...ते का हे पुन्हा सप्रमाण सिद्ध झालं. कार्यक्रमाचा प्रत्येक मिनिट पुढे-पुढे सरकत राहिला आणि आमिरखान या माणसाचं भोवतालच्या परिस्थितीबाबत असलेलं अवधान स्पष्ट होत राहिलं.
आमिरने छोट्या पडद्यावर येण्याचा मोह सातत्याने टाळला. त्याला कित्येकदा विचारणा करूनही, पैशांच्या थैल्या रिकाम्या करूनही तो आपल्या भूमिकेवर ठाम राहिला. जेव्हा त्याच्या मनाने त्याला साद घातली तेव्हा त्याने छोट्या पडद्यावर यायचं ठरविलं मात्र तेही काहीतरी वेगळं करून दाखविण्याचा मनाशी चंग बांधूनच. त्यासाठी गेली दोन वर्षे त्यानं चौफेर अभ्यास केला. ....असं केलं तर कसं होईल? तसं केलं तर कसं होईल?...कार्यक्रम तर करायचा पण निव्वळ करमणूक म्हणून नाही. माझा कार्यक्रम वेगळा कसा होईल याचा ध्यास त्यानं घेतला. त्यासाठी भक्कम पूर्वतयारी केली. देशाच्या कानाकोपऱ्यात तो फिरला, सगळ्या टिमला त्यानं फिरवलं...आपण जे करणार आहे... त्यातून समाजाच्या भल्यासाठी काही करता येईल का? या एकमेव विचाराने तो झपाटला असावा... असं एकूण "सत्यमेव जयते' या कार्यक्रमाचा पहिला भाग पाहिल्यानंतर सारखं वाटत राहतं.
पहिल्या भागामध्येच त्याने देशापुढे आ वासून उभ्या असलेल्या "स्त्री भ्रूण हत्येसारखा' प्रचंड संवेदनशील विषयाला हात घातला आहे. हा विषय यापूर्वी वाहिन्यांवर, माध्यमांतून अनेकदा येऊन गेलेला आहे...तरीही आमिरने त्यासाठी घेतलेली मेहनत त्याच्या कितीतरी पट अधिक आहे हे जाणवत राहतं.
त्यानं मांडलेली तिन्ही उदाहरणे ही प्रतिकात्मक पण, तरीही अंगावर येणारी...पाहताना ऐकताना अंगावर काटा आणणारी...ज्यांनी भोगलं त्यांच्याविषयी अपार करुणा भरून आणणारी आणि ज्यांनी केली त्यांच्याविरोधात पेटून उठायला लावणारी आहेत...त्यांनी जे सोसलं ते पाहताना डोळ्यांच्या कडांवर अश्रू जमा करणारं आणि आपल्याच अवती भोवती हे सारं घडतंय हे जाणून अस्वस्थ करायला लावणारी होती.
हे सारं मांडताना आमिरचं थेट ह्रदयाला हात घालणारं निवेदन आणि प्रत्येक मुद्याशी प्रेक्षकांना जोडण्याचा त्याचा प्रयत्न पहिल्या भागात तरी नक्कीच यशस्वी झाला आहे असं म्हणता येईल. तो विषय मांडून थांबत नाही...त्यावरील उत्तर सांगण्याचा प्रामाणिक प्रयत्न तो करतो आहे. त्यासाठी तो पुढाकार घेणार आहे ही अत्यंत महत्वाची बाब. मी सांगतो तुम्ही करा...असा उंटावरून शेळ्या हाकण्याचा कोणताही प्रयत्न यामध्ये नाही...मी तुमच्यातलाच एक आहे आणि हा मुद्दा उपस्थित केला आहे. आपण मिळून त्यावर तोडगा काढायचा आहे हे अत्यंत संयमीत पण परिणामकारकरित्या सांगण्याचा त्याचा प्रयत्न म्हणूनच भावणारा आहे.
कार्यक्रम सुरू होण्यापूर्वीच त्याच्याबद्दलची उत्सुकता शिगेला नेण्यात तो यशस्वी झालाच; पण जेव्हा रविवारी सकाळी अकरा वाजता दूरचित्रवाहिनी संच सुरू करून प्रेक्षकांनी आपल्या सुटीमधील नव्वद मिनिटे घालविली तेव्हा ती वाया गेली नाहीत...याचं समाधान त्यानं दिलंच...वरपक्षी या नव्वद मिनिटांचं गारूड पुढचा एपिसोड येईपर्यंत कायम राखण्यात तो यशस्वी ठरला.
एरव्ही हाच विषय एक डॉक्‍युमेंटरी सारखा वाटला असता; पण आमिरच्या सादरीकरणाने त्याची दाहकता पाहणाऱ्याच्या काळजापर्यंत नक्कीच पोचली आणि हेच आमिरच्या मालिकेच्या पहिल्या भागाचे यश. कार्यक्रम पाहताना त्याला नक्की काय करायचं आहे? त्याला नक्की कोठे जायचं आहे हे स्पष्ट असल्याचं जाणवत राहतं. बरं हे मांडताना आपण हा प्रश्‍न सोडविणार आहे असा दिवास्वप्न दाखविणारा आव तो आणत नाही हे सर्वात महत्त्वाचे.
चला आता उत्सुकता आहे त्याच्या दुसऱ्या भागामध्ये काय असणार याची आणि खात्री वाटते तो भागही असाच वेगळा...ह्रदयाला हात घालणारा असेल...लेटस सी... 

Thursday, March 29, 2012

"सृजन ई गुढीपाडवा वसंत विशेष आता "नेटभेट'वर'


                                       http://ebooks.netbhet.com/2012/03/marathi-online-emagazine.html
गुढीपाडव्यानिमित्त प्रकाशित केलेल्या "सृजन...'च्या अंकास वाचकांनी उदंड प्रतिसाद दिला त्याबद्दल मनःपूर्वक आभार.
आता हा अंक नेटभेटवरही उपलब्ध झाला असून त्याची लिंक सोबत देत आहे. अंकाबद्दल जरूर जरूर कळवा. 

Tuesday, March 27, 2012

'सृजन ई गुढीपाडवा वसंत विशेष...'

 अंक सोबतच्या लिंकवर वाचता येईल.
नमस्कार,
दिवाळीमध्ये "सृजन ई दिवाळी अंक' प्रकाशित केला, त्याला वाचकांनी उदंड प्रतिसाद दिला. त्यानंतर आता मराठी नववर्षाच्या प्रारंभी असाच अंक करावा असे अगदी ऐनवेळी सुचले आणि "सृजन ई गुढीपाडवा वसंत विशेष' हा अंक आकाराला आला. अगदी कमी वेळेमध्ये हा अंक सजविण्याचा प्रयत्न केला आहे. गडबड झाली आहे खरी पण आता पूर्णत्वाचा आनंदही लाभला आहे. अगदी ऐनवेळी काही तांत्रिक अडचण उद्भवल्यामुळे गुढीपाडव्यादिवशी हा अंक अपलोड करू शकलो नाही याची सल आहेच. असो यातूनही काही नवीन शिकायला मिळाले हे मात्र नक्की. एक प्रयोग आपल्यासारख्या सुजाण साहित्यरसिकांपुढे ठेवत आहे. त्याला प्रतिसाद द्याल हीच अपेक्षा. त्रुटींबद्दल जरूर लिहा. पुढील वेळी त्या सूचना आम्हाला नक्कीच उपयोगी पडतील.
तुम्हा सर्वांच्या प्रतिसादाची वाट पाहत हा अंक आपल्यासमोर ठेवत आहे. प्रतिक्रिया जरूर जरूर कळवा.
नवीन वर्षाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा!


                                                   

'सृजन ई गुढीपाडवा वसंत विशेष...'



                                                     अंक सोबतच्या लिंकवर वाचता येईल.


                                              1) http://www.scribd.com/doc/86917638/srujan-padwa-2012



नमस्कार,
दिवाळीमध्ये "सृजन ई दिवाळी अंक' प्रकाशित केला, त्याला वाचकांनी उदंड प्रतिसाद दिला. त्यानंतर आता मराठी नववर्षाच्या प्रारंभी असाच अंक करावा असे अगदी ऐनवेळी सुचले आणि "सृजन ई गुढीपाडवा वसंत विशेष' हा अंक आकाराला आला. अगदी कमी वेळेमध्ये हा अंक सजविण्याचा प्रयत्न केला आहे. गडबड झाली आहे खरी पण आता पूर्णत्वाचा आनंदही लाभला आहे. अगदी ऐनवेळी काही तांत्रिक अडचण उद्भवल्यामुळे गुढीपाडव्यादिवशी हा अंक अपलोड करू शकलो नाही याची सल आहेच. असो यातूनही काही नवीन शिकायला मिळाले हे मात्र नक्की. एक प्रयोग आपल्यासारख्या सुजाण साहित्यरसिकांपुढे ठेवत आहे. त्याला प्रतिसाद द्याल हीच अपेक्षा. त्रुटींबद्दल जरूर लिहा. पुढील वेळी त्या सूचना आम्हाला नक्कीच उपयोगी पडतील.
तुम्हा सर्वांच्या प्रतिसादाची वाट पाहत हा अंक आपल्यासमोर ठेवत आहे. प्रतिक्रिया जरूर जरूर कळवा.
नवीन वर्षाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा! 

Saturday, February 18, 2012

"राजसाहेब' बाळाच्या पायात "बळ' भरलं

                                             
                                               छायाचित्र संकेस्थळावरून साभार 

"अवघ्या सहा वर्षांपूर्वी माझ्या पक्षाचा जन्म झाला आहे. लगेच त्याच्याकडून कोणत्याही चमत्काराची अपेक्षा करू नका; देणार असाल तर एकहाती सत्ता द्या, माझ्यात नवनिर्माणाची धमक आहे. संधी द्या सोनं कसं करतात ते मी दाखवून देईन'

हे आत्मविश्‍वास भरले आवाहन गेल्या काही दिवसांत "मनसे' करणारे राज ठाकरे यांचा आत्मविश्‍वास शुक्रवारी जेव्हा महापालिकांचा निकाल लागला तेव्हा नक्कीच दुणावला असेल. मुंबईवर जरी महायुतीचा भगवा फडकला असला तरी त्याचवेळी मनसेच्या पदरातही मतदारांनी झुकते माप टाकलेच याकडे दुर्लक्ष करताच येणार नाही. विशेषतः दादर-गिरगावच्या पट्ट्यामध्ये मनसेने धडक मारताना शिवसेनेचा बालेकिल्ला उध्वस्त करून "मराठी टक्का' आपल्याकडे वळविण्यात मिळविलेले यश शिवसेना नेतृत्वाला विचार करावयास लावणारे आहे.
प्रभावी वक्तृत्व, महाराष्ट्राच्या नवनिर्माणासाठी महाराष्ट्राला घातलेल्या सादेला जनतेने सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे हे मनसेला मुंबई, नाशिक, पुणे या महानगरांत मिळालेल्या जागांवरून स्पष्ट होत आहे. नाशकात हा पक्ष पहिल्या क्रमांकावर आहे. पुण्यात राष्ट्रवादीपाठोपाठ तो दुसऱ्या क्रमांकावर आहे; तर ज्या मुंबईमध्ये त्यांना किंगमेकर होण्याची मनिषा होती तेथेही त्यांनी आपली ताकद चौपट वाढविण्यात यश मिळविलेले आहे. हे नक्कीच पक्ष विस्तारत आहे, बळ भरत आहे हे दर्शविणारे आहे.
नाशकात तर हा पक्ष निर्विवादपणे किंगमेकर ठरू शकतो. आकडेवारीचा हिशोब केला तर आघाडी किंवा युती स्वबळावर सत्तेवर येऊच शकत नाही. एकतर दोघांना हातात घालावा लागेल किंवा मनसेच्या इंजिनाला जोडून घेऊन सत्तेचा प्रवास करावा लागेल हे स्पष्ट आहे. पुण्यात आघाडीची सत्ता येणार असली तरी प्रबळ विरोधी पक्ष म्हणून दोन्ही कॉंग्रेसला हा पक्ष जेरीस आणू शकतो.
राज्यातील या प्रमुख तीन महानगरांत उत्तम कामगिरी करणारा हा पक्ष रांगत आहे असे सांगणाऱ्यांना हे बाळ आता खऱ्या अर्थाने दमदार पावले टाकू लागले आहे हे समजून चुकले असेल.
ज्याप्रमाणे शिवसेनेमध्ये बाळासाहेबांचाच काही वर्षांपूर्वीपर्यंत एकहाती करिष्मा होता.( गेल्या काही वर्षांपासून उद्धव ठाकरे पक्षासाठी वर्षांत जीवतोड मेहनत घेत आहेत हे मुळीच नाकारता येत नाही, सर्व विरोधात असूनही त्यांनी मुंबईत सत्ता राखण्यात मिळविलेले यश त्यांची मुत्सद्देगिरी दाखवून देतेच.) त्याप्रमाणेच सध्या राज यानी मनसेसाठी एकहाती यश मिळवून दिले आहे. यामध्ये ज्याप्रमाणे त्यांचे कौतुक आहे, त्याचप्रमाणे त्यांच्यावर विश्‍वास ठेऊन त्यांच्यासाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचेही आहे. राज यांच्यावरही जीव ओवाळून टाकणारी एक पिढी निर्माण होऊ लागली आहे, हेही या निकालाने स्पष्ट झाले. संपूर्ण महाराष्ट्रात पोचण्यासाठी राज यांना आणखी कष्ट घ्यावे लागणार आहेत हे नक्की. सध्या त्यांच्या पक्षाचा पाया महानगरांत विस्तारतो आहे, त्याचप्रमाणे महाराष्ट्राच्या नवनिर्माणाचे स्वप्न पाहताना महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात पक्ष पोचणे हेही अत्यंत आवश्‍यक आहे. (जिल्हा परिषदांचे निकाल पक्षासाठी अंतर्मुख करणारे आहेत, अर्थात तेथे राज यांनी ताकद लावलेली नाहीच हेही तेवढेच खरे, ज्या काही जागा निवडून आल्यात त्या राज यांचे नेतृत्व स्वीकारलेल्या शिलेदारांच्या कष्टाचा आरसा आहे. हेच शिलेदार भविष्यात मनसेचे भक्कम आधारस्तंभही होऊ शकणार आहेत. याकडे राज यांनी जाणीवपूर्वक लक्ष देणे आवश्‍यक आहे) अर्थात या सर्वांची जाणीव राज यांना नक्कीच असेल.
यदाकदाचित राज यांच्या हाती नाशकात सत्तेच्या चाव्या आल्याच तर त्यांच्यासाठी ही सुवर्णसंधी असेल. नवनिर्माणाचे मॉडेल ते येथे सादर करू शकतील आणि त्या माध्यमातून महाराष्ट्रातील जनतेला विश्‍वास देऊ शकतील. जर ते तसे नाही करू शकले तर त्यांनी दाखविलेली स्वप्ने ही भाषणांतील स्वप्नरंजनच ठरेल. एकमात्र खरे सध्या तरी प्रमुख महानगरांतील काही टक्के नागरिकांनी राज यांच्या नेतृत्वावर, त्यांच्या स्वप्नांवर विश्‍वास दाखविलेला आहे. भविष्यात हे बळ वाढविणे आणि स्वप्नपूर्तीच्या दिशेने पाऊल टाकणे हेच मनसे नेतृत्वापुढे आव्हान असेल. तुर्तास या यशाबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीस अगदी मनसे शुभेच्छाः
जय महाराष्ट्र! 

Wednesday, February 15, 2012

मैत्रीण...

मोबाईलची रिंग वाजली, झोपेतच त्यानं मोबाईल उचलला... कानावर आवाज पडला, "आज आपण भेटायचं नक्की नं?' तिच्या किणकिणत्या प्रश्‍नानं त्याची झोप उडाली. 
"भेटायचं म्हणजे काय भेटायचंच! मी अगदी वेळेत पोचतो.' 
गेले सहा महिने आपण ज्या क्षणाची वाट पाहत होतो तो क्षण आज आयुष्यात येणार. वर्षभर ज्या आवाजावर आपण फिदा आहोत त्या आवाजाच्या गळ्यासोबत आपली पहिली भेट होणार. कशी असेल ती? कशी दिसेल ती? आवाजाप्रमाणेच गोड असेल का? किती प्रश्‍न. 
आकाशवाणीवर जेव्हा कार्यक्रमांचे सूत्रसंचालन, निवेदन करते तेव्हा ऐकत राहावे वाटते. पत्रमैत्री आणि फोनवरून संवाद सुरू झाल्यानंतर तिनं मला कधी झिडकारलं नाही. अनेक गोष्टी शेअर केल्या. मैत्रीण बनून अनेक चांगले सल्ले दिले. जेव्हा जेव्हा त्रास झाला तेव्हा हक्काने तिला सांगितले आणि तिनेही आपुलकीने प्रत्येक बाबीची चौकशी करून त्यावर सल्ला दिला. मध्यंतरी महिनाभर जेव्हा काही कारणाने फोनवर बोलणे होऊ नाही शकले तेव्हा आपण तिला किती "मिस' केलं. काहीतरी प्रॉब्लेम झाला असं सांगून मला फार चौकशीही करू दिली नाही. आत्ताही मी गेले पंधरा दिवस भेटण्याचा आग्रह धरल्यानंतर मोठ्या मुश्‍किलीने तयार झाली भेटायला. कधी एकदा पुणे गाठतो असं झालंय. 
विचारांच्या लयीत त्यानं आवरलं. धावत-पळत रेल्वे गाठली. गाडी हलली आणि पुन्हा एकदा भोवताल विसरून त्याच्या विचारांची फुले उमलू लागली. 
गेले सहा महिने आपण तिच्यासोबत फोनवरून बोलतोय. किती बोलते. आपलेपणानं चौकशी करते. आश्‍वासक बोलते. समजून सांगते. अनेक प्रश्‍नांची उकल पटकन्‌ करते. तिची वैचारिक प्रगल्भता जाणवत राहते. माझ्यापेक्षा तीच मला मॅच्युअर वाटते. रोज फोनवर बोलणं होतं. मग तिचा आवाज दिवसभर मनात किणकिणत राहतो. तिचा आवाज आपल्याला जाम आवडतो बुवा आणि...ती....? 
गाडी स्टेशनात शिरली आणि थांबतानाचा धक्का बसला तशी त्याची विचारांची तंद्री भंगली. स्टेशनमधून बाहेर येताच त्यानं रिक्षाला हात केला. "बालगंधर्व...' सांगत तो रिक्षात बसला... रिक्षा चालू पडली आणि याची विचारांची गाडीही सुटली सुसाट... 
...कशी असेल ती? कशी दिसेल ती?....काही वेळातच आपल्यासमोर तिचं सगुणसाकार रूप उभं राहील. आतापर्यंत फक्त आवाज ऐकून आपण तिला भेटायला एवढे आतूर झालो ती नेमकी कशी असेल...दिसायला सुंदर असेल की...?आणि सुंदर नसली तर...?छे, छे...ती सुंदरच असणार...एवढा गोड गळा आणि चेहरा कसलातरी कसा असेल...काही का असेना...जशी असेल तशी असेल...मैत्रीण आहे ती. मग दिसण-बिसणं फिजूल... 
...आयला पण उद्या तिला गाडीवरनं फिरवायचं म्हटलं तर... जरा तरी बरी असावी बुवा...हे....हे... हे... जशी असेल तशी घेऊन फिरू...आपली सख्खी मैत्रीण आहे हे महत्त्वाचे. भेटीच्या ओढीने...लागलेली हुरहूर त्याला दोन्ही बाजूंनी विचार करायला भाग पाडत होती. आता बास.. फार विचार नाही...जशी असेल तशी...ती आपली मैत्रीण...सखी! 
रेस्टॉरंट आलं... तो रिक्षातून उतरला. भेटायचं ठरलेल्या रेस्टॉरंटच्या पायऱ्या चढून आत जाताना धडधड वाढली. वाढत्या हार्टबिट्‌सना "ऑल इज वेल' समजावत तो आत गेला... त्याच्या भिरभिरत्या नजरेनं तिचा शोध सुरू केला. एका टेबलवर त्याची नजर स्थिरावली आणि त्याचा शोध बहुधा संपला. तो त्या टेबलजवळ जाऊ उभा राहिला... 
"मी...अमेय? तनया? 
"या नं बसा!' दोघीही म्हणाल्या. 
(हुश्‍श एक टेन्शन संपलं...दोघींपैकी कोणही असो. दोघीही दिसताहेत गोड..फाजील मनाचा कौल) 
तिघंही एकत्र बसूनही कमालीची शांतता. गर्दीतलं एकटेपण त्यानं अनुभवलं. मौनाला वाट मोकळी करून देत "काय घ्यायचं आपण?' त्यानं विचारलं. 
"काहीही' दोघीही बोलल्या. (किणकिणता आवाज आला; पण नेमका कोणाचा? पुन्हा त्याच्या डोक्‍यात प्रश्‍न) 
त्यानं वेटरला बोलावलं. काहीबाही ऑर्डर दिली. पुन्हा शांतता. 
तेवढ्यात दोघींपैकी एक उठली, "बराय, तनया मी येते जाऊन...तुम्ही बसा बोलत' असं म्हणत ती त्याच्याकडे पाहून हसली आणि जाऊ लागली. 
"अहो बसा हो...मिस...' 
तिनं काहीसं नाव सांगितलं. "आपण असेच न बोलता बसून राहायचं? एरव्ही फोनवर किती सुरेख बोलतेस आणि आज काय मौन व्रत, का मी भेटायला आलेलं आवडलं नाही तुला?. 
"नाही नाही तसं नाही...' तिचा किणकिणता आवाज कानावर पडला आणि दूरवर मंदिरात घंटा वाजल्याचा भास झाला. एवढ्यात वेटरने पदार्थ आणून ठेवले. पुन्हा संवाद बंद. फक्त काटेचमच्यांचा आवाज. ती मैत्रीणच काहीबाही विचारत होती आणि तो तिला उत्तरे देत राहिला. फोनवर अखंड बडबडणारी "तनया' त्यांना ऐकत होती गप्प राहून. 
न राहवून तो म्हणालाच 
"मला वाटतं मी आता निघावं!' 
त्याच्या चेहऱ्यावरील भाव पाहून मैत्रीण उठली, "चालू दे तुमचं!' मी आहे येथेच...'म्हणत ती बाहेर पडली. 
आता तो रिलॅक्‍स झाला. 
"खूप छान दिसतेस तू...पण आज काय बोलायची इच्छा नाही काय? आणि हे काय मला तुझ्या डोळ्यांत मला पाहायचंय. पाहायचंय माझ्या मैत्रिणीचे डोळे कसे आहेत ते?' 
ती काहीच बोलली नाही... 
"ओ बाईसाहेब, मी तुमच्याशी बोलतोय...' 
तिने गॉगल काढला. तिच्या दोन्ही डोळ्यांवर लावलेल्या पट्ट्या इतका वेळ गॉगलमुळे त्याला दिसल्या नव्हत्या. 
"हे काय? कशाने झालं हे?' 
ती सांगू लागली, ""महिनाभरापूर्वी ऑफिस सुटल्यानंतर बसमधून येत होते. कोणी तरी फुगा फेकून मारला. नेमका चेहऱ्यावर आदळला. त्यात कसलंतरी रसायनमिश्रित पाणी होतं. आग-आग झाली. मी ओरडले, किंचाळले. बेशुद्ध पडले. कोणीतरी मला दवाखान्यात नेलं. डॉक्‍टरांनी तपासणी केली. तातडीनं ऑपरेशन केलं...पण डोळ्यांविषयी खात्री नसल्याचं मला सांगितलं. अशा अवस्थेत मला तुला भेटायचं नव्हतं. तुला वाईट वाटेल म्हणून मी तुला टाळत होते. मित्र म्हणून तुला सांगायला हवं होतं, पण... 
तिला त्याची काहीच हालचाल ऐकू आली नाही..."अमेय...अमेय...' तिच्या हाकांना प्रतिसाद आलाच नाही.... 
तो हादरला...तिची कहाणी ऐकून तो बाहेर पडला...सगळा परिसर भोवताली फिरतोय असं त्याला वाटलं. सकाळपासून पाहिलेल्या सगळ्या स्वप्नांचा चक्काचूर झाला...तिच्यासोबत सहजीवनाची पावले चालण्याचा विचारही संपला. ती दिसते गोड...आपल्याला शोभलीही असती...माझ्यासोबत सहजीवनाचं राहू दे पण, तिच्या आयुष्याचं काय? काल-परवापर्यंत बहुरंगी असलेलं तिचं आयुष्य एकदम काळवंडलं...तिच्या आयुष्यातले सगळे रंग उडून गेले एका क्षणात. ज्या हरामखोराने फुगा मारला त्याला कल्पनासुद्धा नसेल किती भयानक परिणाम भोगावा लागतोय एका जीवाला. डोळे बरे होईपर्यंत तिला काम नाही. नंतरचं माहीत नाही. आता फक्त नरकयातना. नियती...नियती म्हणतात ती हीच का? परमेश्‍वराऽऽऽ. तो तेथेच कट्ट्यावर बसून राहिला अस्वस्थ, असहाय्य...... 
काही वेळ गेला. मैत्रिणीसोबत तनया रेस्टॉरंटमधून बाहेर पडली. बससाठी रस्ता ओलांडला. समोर कट्ट्यावर अमेय. दोघींना पाहून तो समोर आला. त्याला पाहून मैत्रीण सटकली. काही बोलण्यापूर्वी अमेयनं तनयाचा हात हातात घेतला. 
"कोण...कोण आहे?' 
"मीच आहे अमेय... तू जशी आहेस तशी मला मैत्रीण म्हणून हवी आहेस...माझी मैत्री तुला आवडेल? असं म्हणत त्यानं गिफ्ट म्हणून आणलेली अंगठी तिच्या हातात ठेवली. 
-- 
त्याच्या या कृतीने पट्ट्यांआड तनयाचे डोळे पाणावले...आणि मैत्रिणीच्या चेहऱ्यावर एकाचवेळी आनंद आणि अश्रू चमकून उठले.

Friday, January 13, 2012

'कॉम्प्लिमेंट'

दिवसभराच्या धावपळीमुळे सगळेच जाम थकले होते. कार्यक्रम नेटका झाल्यामुळे सगळे आनंदी होते. कोणतंही मंगलकार्य ठरवणं सोपं असतं; पण ते तेवढ्याच ताकदीनं पार पाडणं आणि पार पडणं दोन्हीही अवघड. सगळ्याच बाबी जुळून याव्या लागतात. आजच्या कार्यक्रमाचंही तसंच होतं. गेले पंधरा दिवस "त्याचं' कुटुंब हा कार्यक्रम निर्विघ्नपणे पार पडावा यासाठी प्रत्येक बारीक-सारीक गोष्टीचा विचार करून तयारी करत होतं. घरातील प्रत्येकाला कामे नेमून दिलेली होती. त्यामुळे गोंधळ असा फारसा झाला नाही. कार्यक्रम अगदी आनंदात, उत्साहात पार पडला.

सायंकाळी सगळं आवरल्यानंतर दिवसभराच्या कामाचा आढावा घेण्याचं काम सुरू झालं. प्रत्येकानं नेमून दिलेली कामं चोख केल्यानं तो प्रत्येकाचं कौतुक करत होता आणि त्याच्या कौतुकाने सगळे सुखावत होते. आता त्याच्याकडे पार्टीची जोरदार मागणीही केली गेली. त्यानं ती लगेच मान्य केली. सगळ्या थोरल्यांनी भरपूर कामं केली असली तरी आज प्रत्येकाच्या तोंडात "तिचं' नाव आवर्जून येत होतं.

"लहान असून किती समज आहे. प्रत्येक काम तिनं अगदी मनापासून, तिच्या वकुबाला पेलेल असं केलं. तिच्या वयाला न शोभेल आणि न झेपेल अशी पळापळ तिने दिवसभरात केली,' असं कौतुक ऐकत ती आत्ता बाबाच्या जवळच बसली होती आणि तो लेकीच्या कौतुकानं मनोमन सुखावला होता. दहा वर्षांच्या आपल्या चिमुरडीचं भविष्यात कोठेच अडणार नाही या जाणिवेनं त्याला आणखीनच बरं वाटलं. लेकीबद्दलचा अभिमान त्याच्या चेहऱ्यावर काठोकाठ भरून राहिला. त्याच्या बायकोचे डोळे तर आनंदाने अगदीच भरून आले. खरंच पोरगी मोठी व्हायला लागली आहे. प्रत्येक गोष्ट समजून उमजून करत आहे, याचे समाधान तिच्या चेहऱ्यावर दिसत होतं. पोरीची दृष्ट काढायची, असं तिनं मनोमन ठरवून टाकलं...

छोकरी तिथंच बसलेली कौतुक ऐकत. तिलाही सगळं छान-छान वाटत होतं. आपण दिवसभर जे काय केलं त्याचं सगळी कौतुक करत आहेत, हे ऐकून तिला मजा वाटत होती; पण तरीही ती काहीशी अस्वस्थ होती. कौतुकाने आनंद होतानाच कोठेतरी एक सल तिला जाणवत होती. पण, तिला नेमकं काय करावं हे समजत नव्हतं. ती शांतपणे सगळं ऐकत होती. आतून बेचैन होती. रंगलेल्या गप्पा संपल्या आणि पुन्हा प्रत्येकजण आपापल्या कामाकडे वळला. ती मात्र तेथेच बसून राहिली अस्वस्थपणे विचारांत बुडून गेली.

-------
तो त्याच्या खोलीत गेला. कोचावर रेलला आणि डोळे मिटून शांतपणे पडून राहिला. दिवसभराच्या पळापळीने त्याला शीण आला होता. काही वेळ गेला. जवळ हालचाल जाणवल्यानं त्यानं डोळे उघडले. त्याची छोकरी त्याच्या जवळ येऊन बसली होती; पण तिचे डोळे पाण्याने भरलेले होते. तो झटकन सावरून बसला.
""काय झालं बेटा? मघाशी तर तू खूश होतीस. आज सगळ्यांनी तुझं कौतुक केलं. मग आत्ता का तुझा चेहरा असा रडवेला?''
बाबांच्या या प्रश्‍नावर बळ एकवटून ती म्हणाली, ""बाबा, एक विचारू?''
""बोल बेटा, अगदी बिनधास्तपणे विचार'', असं म्हणत त्यानं तिला जवळ ओढून घेतलं.
""बाबा मी खरंच खूप काम केलं आज?''
""हो बेटा. अगदी खरंच तू खूप काम केलंस. म्हणून तर तुझं कौतुक केलं सगळ्यांनी. का काय झालं?''
""माझ्याबरोबर शेजारच्या त्या चिंगीनंपण किती काम केलं. उलट माझ्यापेक्षा जास्तच काम केलं तिनं. तिची आई भांडी घासत होती तेव्हा ती सगळी भांडी विसळून घेत होती. त्यानंतर तिनं सगळा हॉल झाडून काढला. नंतर तो पुसून काढला. सगळ्या खुर्च्या एका बाजूला लावल्या. सगळी भांडी मोजली. त्यांचा हिशेब आम्ही दोघींनी मिळून केला. माझ्यापेक्षाही तिनं किती तरी काम केलं आणि सगळ्यांनी माझं कौतुक केलं. तिचं कौतुक कोणीच केलं नाही. मघाशी सगळे माझे कौतुक करत होते. तेव्हा ती कोपऱ्यात उभं राहून ऐकत होती. माझं कौतुक ऐकून तिच्या चेहऱ्यावर कसला आनंद दिसत होता. तिचं कौतुक मात्र कोणीच केलं नाही. बाबा आपण तिचं कौतुक का नाही केलं? का कोणालाच तिचं काम दिसलं नाही? तिची आई आपल्याकडे कामाला होती हे मान्य; पण चिंगी माझ्याबरोबर नेहमी खेळते. माझी मैत्रीणच आहे ती. मी करते म्हणून तिनं काम केलं. तिचं मात्र कोणीच कौतुक केलं नाही.'' एवढं म्हणताना तिच्या डोळ्यांतून पाणी येऊ लागलं.

आता तो गहिवरला. आपल्या संवेदनशील लेकीचा त्याला अभिमान वाटला. ""ए वेडाबाई...'' म्हणत त्यानं तिला जवळ घेतलं आणि मायेनं कुरवाळलं.

------
मनाशी काहीतरी ठरवून तो उठला आणि बाहेर गेला. जाऊन आल्याबरोबर सर्वांना बोलावून घेतलं आणि लेकीला हाक दिली. चिंगीलाही बोलावून आणायला सांगितलं. त्याच्या लेकीबरोबरचीच ती पोर. त्यानं बोलावले म्हटल्यावर जरा दबकतच आली.
""ये चिंगी...'' त्यानं प्रेमळपणे हाक मारली.
चिंगी समोर आली. त्यानं लेकीच्या हातात एक बॉक्‍स दिला आणि चिंगीला द्यायला सांगितले.
तिनं तो बॉक्‍स चिंगीला दिला.
""काय हाय. मला नको ते...'' चिंगी म्हणाली.
""अगं चिंगी घे... तुच्या मैत्रिणीची ही तुझ्यासाठी भेट आहे बेटा. बघ उघडून.''
चिंगीनं बॉक्‍स उघडला आणि त्यातून सुंदरसा ड्रेस बाहेर काढला...""माझ्यासाठीऽऽऽ'' तिच्या डोळ्यांच्या बाहुल्या आनंदानं अगदी मोठ्या झाल्या.
""हो बाळा...''
""लय भारी हाय...'' म्हणत तिनं आपल्या मैत्रिणीला मिठी मारली.
दोन निर्व्याज, निष्पाप जिवांचा खराखुरा आनंदसोहळा तेथे रंगला.
---
तिच्या चेहऱ्यावरचा दिवसभराच्या कष्टाचा शीण कोठल्या कोठे पळून गेला. ड्रेसवरील सगळे सगळे रंग, प्रत्येक नक्षी तिच्या चेहऱ्यावर आनंदानं उमटून आली आणि मैत्रिणीवरील जीव आणखी घट्ट झाला.
---
चिंगीचंही कौतुक केल्याचं पाहून छोकरीला "त्या' मिठीत दिवसभराच्या कौतुकापेक्षा समाधानाचे मोठे बक्षीस सापडले आणि बाबांनी आपल्याला समजून घेतल्याचा आनंद तिच्या डोळ्यांतून अश्रू बनून घळाघळा ओघळला.
---
...आणि हे पाहून अभिमानाने त्याची छाती फुलून आली. लेकीच्या कौतुकाचा कढ दाटून आला. अश्रूंनी भावनांना वाट मोकळी करून दिली. पाणावलेल्या डोळ्यांनी त्यानं हे दृश्‍य साठवून घेतलं. लेकीच्या डोळ्यांतून ओघळणाऱ्या आनंदाश्रूंनी मिळालेली दिवसभरातील सर्वात मोठी "कॉम्प्लिमेंट' त्यानं हृदयाच्या कुपीत जपून ठेवली.