Sunday, May 6, 2012

दिल को लग गयी...


छायाचित्र संकेतस्थळाच्या सौजन्याने

दिल को लगेगी तभी तो बात बनेगी... हे वाक्‍य "सत्यमेव जयते' ही मालिका सुरू होण्यापूर्वी आमिरखान आपल्या जाहिरातीमधून सातत्याने ऐकवत होता. त्याच वेळी आमिरचा हा कार्यक्रम कोणत्या दिशेने जाणार हे स्पष्ट होत होते. रविवारी सकाळी अकरा वाजता कार्यक्रम जेव्हा एअरवर गेला त्यानंतरची 90 मिनिटे फक्त आमिरची होती. या नव्वद मिनिटावरील (निदान पहिल्या भागात तरी) त्याची हुकुमत अगदी स्पष्ट दिसून आली. तो परफेक्‍सनिस्ट आहे...ते का हे पुन्हा सप्रमाण सिद्ध झालं. कार्यक्रमाचा प्रत्येक मिनिट पुढे-पुढे सरकत राहिला आणि आमिरखान या माणसाचं भोवतालच्या परिस्थितीबाबत असलेलं अवधान स्पष्ट होत राहिलं.
आमिरने छोट्या पडद्यावर येण्याचा मोह सातत्याने टाळला. त्याला कित्येकदा विचारणा करूनही, पैशांच्या थैल्या रिकाम्या करूनही तो आपल्या भूमिकेवर ठाम राहिला. जेव्हा त्याच्या मनाने त्याला साद घातली तेव्हा त्याने छोट्या पडद्यावर यायचं ठरविलं मात्र तेही काहीतरी वेगळं करून दाखविण्याचा मनाशी चंग बांधूनच. त्यासाठी गेली दोन वर्षे त्यानं चौफेर अभ्यास केला. ....असं केलं तर कसं होईल? तसं केलं तर कसं होईल?...कार्यक्रम तर करायचा पण निव्वळ करमणूक म्हणून नाही. माझा कार्यक्रम वेगळा कसा होईल याचा ध्यास त्यानं घेतला. त्यासाठी भक्कम पूर्वतयारी केली. देशाच्या कानाकोपऱ्यात तो फिरला, सगळ्या टिमला त्यानं फिरवलं...आपण जे करणार आहे... त्यातून समाजाच्या भल्यासाठी काही करता येईल का? या एकमेव विचाराने तो झपाटला असावा... असं एकूण "सत्यमेव जयते' या कार्यक्रमाचा पहिला भाग पाहिल्यानंतर सारखं वाटत राहतं.
पहिल्या भागामध्येच त्याने देशापुढे आ वासून उभ्या असलेल्या "स्त्री भ्रूण हत्येसारखा' प्रचंड संवेदनशील विषयाला हात घातला आहे. हा विषय यापूर्वी वाहिन्यांवर, माध्यमांतून अनेकदा येऊन गेलेला आहे...तरीही आमिरने त्यासाठी घेतलेली मेहनत त्याच्या कितीतरी पट अधिक आहे हे जाणवत राहतं.
त्यानं मांडलेली तिन्ही उदाहरणे ही प्रतिकात्मक पण, तरीही अंगावर येणारी...पाहताना ऐकताना अंगावर काटा आणणारी...ज्यांनी भोगलं त्यांच्याविषयी अपार करुणा भरून आणणारी आणि ज्यांनी केली त्यांच्याविरोधात पेटून उठायला लावणारी आहेत...त्यांनी जे सोसलं ते पाहताना डोळ्यांच्या कडांवर अश्रू जमा करणारं आणि आपल्याच अवती भोवती हे सारं घडतंय हे जाणून अस्वस्थ करायला लावणारी होती.
हे सारं मांडताना आमिरचं थेट ह्रदयाला हात घालणारं निवेदन आणि प्रत्येक मुद्याशी प्रेक्षकांना जोडण्याचा त्याचा प्रयत्न पहिल्या भागात तरी नक्कीच यशस्वी झाला आहे असं म्हणता येईल. तो विषय मांडून थांबत नाही...त्यावरील उत्तर सांगण्याचा प्रामाणिक प्रयत्न तो करतो आहे. त्यासाठी तो पुढाकार घेणार आहे ही अत्यंत महत्वाची बाब. मी सांगतो तुम्ही करा...असा उंटावरून शेळ्या हाकण्याचा कोणताही प्रयत्न यामध्ये नाही...मी तुमच्यातलाच एक आहे आणि हा मुद्दा उपस्थित केला आहे. आपण मिळून त्यावर तोडगा काढायचा आहे हे अत्यंत संयमीत पण परिणामकारकरित्या सांगण्याचा त्याचा प्रयत्न म्हणूनच भावणारा आहे.
कार्यक्रम सुरू होण्यापूर्वीच त्याच्याबद्दलची उत्सुकता शिगेला नेण्यात तो यशस्वी झालाच; पण जेव्हा रविवारी सकाळी अकरा वाजता दूरचित्रवाहिनी संच सुरू करून प्रेक्षकांनी आपल्या सुटीमधील नव्वद मिनिटे घालविली तेव्हा ती वाया गेली नाहीत...याचं समाधान त्यानं दिलंच...वरपक्षी या नव्वद मिनिटांचं गारूड पुढचा एपिसोड येईपर्यंत कायम राखण्यात तो यशस्वी ठरला.
एरव्ही हाच विषय एक डॉक्‍युमेंटरी सारखा वाटला असता; पण आमिरच्या सादरीकरणाने त्याची दाहकता पाहणाऱ्याच्या काळजापर्यंत नक्कीच पोचली आणि हेच आमिरच्या मालिकेच्या पहिल्या भागाचे यश. कार्यक्रम पाहताना त्याला नक्की काय करायचं आहे? त्याला नक्की कोठे जायचं आहे हे स्पष्ट असल्याचं जाणवत राहतं. बरं हे मांडताना आपण हा प्रश्‍न सोडविणार आहे असा दिवास्वप्न दाखविणारा आव तो आणत नाही हे सर्वात महत्त्वाचे.
चला आता उत्सुकता आहे त्याच्या दुसऱ्या भागामध्ये काय असणार याची आणि खात्री वाटते तो भागही असाच वेगळा...ह्रदयाला हात घालणारा असेल...लेटस सी... 

5 comments:

Anagha said...

भारतातील प्रत्येक नागरिकाचा सहभाग ह्यात अपेक्षित आहे. आणि तरच हा कार्यक्रम यशस्वी होऊ शकेल. नाहीतर दर वेळेला जसे आपण 'समोरचा काही तरी करेल आणि आम्ही आमच्या घरात बसून टाळ्या वाजवू' असा जो आविर्भाव आपण आणतो तसेच ह्या कार्यक्रमाचे होईल. ह्या इथे देखील त्याने आपले एक मत मागितले आहे आणि निदान तेव्हढे तरी आपण केले पाहिजे....नाहीतर नेहेमीप्रमाणे शिवाजी जन्माला येण्याची आपण वाट पहात राहू.

Unknown said...

sachii..dil ko lag gayi....

विनायक said...

True ..:)

neeta said...

he's is not merely an entertainer like srk...whtever is said even if 1percent affects people, too bee bohat hai..well done amir.

bhanasa said...

त्याची कळकळ प्रत्येक भागात तितकीच दिसून येते आहे. सगळ्यांवर परिणाम होईल ही आशा करणे व्यर्थ असले तरीही काहींवर नक्कीच सखोल छाप सोडेल... हे ही नसे थोडके. शेवटी, " दिल पे लगेगी तोही बात बनेगी! "