Wednesday, February 15, 2012

मैत्रीण...

मोबाईलची रिंग वाजली, झोपेतच त्यानं मोबाईल उचलला... कानावर आवाज पडला, "आज आपण भेटायचं नक्की नं?' तिच्या किणकिणत्या प्रश्‍नानं त्याची झोप उडाली. 
"भेटायचं म्हणजे काय भेटायचंच! मी अगदी वेळेत पोचतो.' 
गेले सहा महिने आपण ज्या क्षणाची वाट पाहत होतो तो क्षण आज आयुष्यात येणार. वर्षभर ज्या आवाजावर आपण फिदा आहोत त्या आवाजाच्या गळ्यासोबत आपली पहिली भेट होणार. कशी असेल ती? कशी दिसेल ती? आवाजाप्रमाणेच गोड असेल का? किती प्रश्‍न. 
आकाशवाणीवर जेव्हा कार्यक्रमांचे सूत्रसंचालन, निवेदन करते तेव्हा ऐकत राहावे वाटते. पत्रमैत्री आणि फोनवरून संवाद सुरू झाल्यानंतर तिनं मला कधी झिडकारलं नाही. अनेक गोष्टी शेअर केल्या. मैत्रीण बनून अनेक चांगले सल्ले दिले. जेव्हा जेव्हा त्रास झाला तेव्हा हक्काने तिला सांगितले आणि तिनेही आपुलकीने प्रत्येक बाबीची चौकशी करून त्यावर सल्ला दिला. मध्यंतरी महिनाभर जेव्हा काही कारणाने फोनवर बोलणे होऊ नाही शकले तेव्हा आपण तिला किती "मिस' केलं. काहीतरी प्रॉब्लेम झाला असं सांगून मला फार चौकशीही करू दिली नाही. आत्ताही मी गेले पंधरा दिवस भेटण्याचा आग्रह धरल्यानंतर मोठ्या मुश्‍किलीने तयार झाली भेटायला. कधी एकदा पुणे गाठतो असं झालंय. 
विचारांच्या लयीत त्यानं आवरलं. धावत-पळत रेल्वे गाठली. गाडी हलली आणि पुन्हा एकदा भोवताल विसरून त्याच्या विचारांची फुले उमलू लागली. 
गेले सहा महिने आपण तिच्यासोबत फोनवरून बोलतोय. किती बोलते. आपलेपणानं चौकशी करते. आश्‍वासक बोलते. समजून सांगते. अनेक प्रश्‍नांची उकल पटकन्‌ करते. तिची वैचारिक प्रगल्भता जाणवत राहते. माझ्यापेक्षा तीच मला मॅच्युअर वाटते. रोज फोनवर बोलणं होतं. मग तिचा आवाज दिवसभर मनात किणकिणत राहतो. तिचा आवाज आपल्याला जाम आवडतो बुवा आणि...ती....? 
गाडी स्टेशनात शिरली आणि थांबतानाचा धक्का बसला तशी त्याची विचारांची तंद्री भंगली. स्टेशनमधून बाहेर येताच त्यानं रिक्षाला हात केला. "बालगंधर्व...' सांगत तो रिक्षात बसला... रिक्षा चालू पडली आणि याची विचारांची गाडीही सुटली सुसाट... 
...कशी असेल ती? कशी दिसेल ती?....काही वेळातच आपल्यासमोर तिचं सगुणसाकार रूप उभं राहील. आतापर्यंत फक्त आवाज ऐकून आपण तिला भेटायला एवढे आतूर झालो ती नेमकी कशी असेल...दिसायला सुंदर असेल की...?आणि सुंदर नसली तर...?छे, छे...ती सुंदरच असणार...एवढा गोड गळा आणि चेहरा कसलातरी कसा असेल...काही का असेना...जशी असेल तशी असेल...मैत्रीण आहे ती. मग दिसण-बिसणं फिजूल... 
...आयला पण उद्या तिला गाडीवरनं फिरवायचं म्हटलं तर... जरा तरी बरी असावी बुवा...हे....हे... हे... जशी असेल तशी घेऊन फिरू...आपली सख्खी मैत्रीण आहे हे महत्त्वाचे. भेटीच्या ओढीने...लागलेली हुरहूर त्याला दोन्ही बाजूंनी विचार करायला भाग पाडत होती. आता बास.. फार विचार नाही...जशी असेल तशी...ती आपली मैत्रीण...सखी! 
रेस्टॉरंट आलं... तो रिक्षातून उतरला. भेटायचं ठरलेल्या रेस्टॉरंटच्या पायऱ्या चढून आत जाताना धडधड वाढली. वाढत्या हार्टबिट्‌सना "ऑल इज वेल' समजावत तो आत गेला... त्याच्या भिरभिरत्या नजरेनं तिचा शोध सुरू केला. एका टेबलवर त्याची नजर स्थिरावली आणि त्याचा शोध बहुधा संपला. तो त्या टेबलजवळ जाऊ उभा राहिला... 
"मी...अमेय? तनया? 
"या नं बसा!' दोघीही म्हणाल्या. 
(हुश्‍श एक टेन्शन संपलं...दोघींपैकी कोणही असो. दोघीही दिसताहेत गोड..फाजील मनाचा कौल) 
तिघंही एकत्र बसूनही कमालीची शांतता. गर्दीतलं एकटेपण त्यानं अनुभवलं. मौनाला वाट मोकळी करून देत "काय घ्यायचं आपण?' त्यानं विचारलं. 
"काहीही' दोघीही बोलल्या. (किणकिणता आवाज आला; पण नेमका कोणाचा? पुन्हा त्याच्या डोक्‍यात प्रश्‍न) 
त्यानं वेटरला बोलावलं. काहीबाही ऑर्डर दिली. पुन्हा शांतता. 
तेवढ्यात दोघींपैकी एक उठली, "बराय, तनया मी येते जाऊन...तुम्ही बसा बोलत' असं म्हणत ती त्याच्याकडे पाहून हसली आणि जाऊ लागली. 
"अहो बसा हो...मिस...' 
तिनं काहीसं नाव सांगितलं. "आपण असेच न बोलता बसून राहायचं? एरव्ही फोनवर किती सुरेख बोलतेस आणि आज काय मौन व्रत, का मी भेटायला आलेलं आवडलं नाही तुला?. 
"नाही नाही तसं नाही...' तिचा किणकिणता आवाज कानावर पडला आणि दूरवर मंदिरात घंटा वाजल्याचा भास झाला. एवढ्यात वेटरने पदार्थ आणून ठेवले. पुन्हा संवाद बंद. फक्त काटेचमच्यांचा आवाज. ती मैत्रीणच काहीबाही विचारत होती आणि तो तिला उत्तरे देत राहिला. फोनवर अखंड बडबडणारी "तनया' त्यांना ऐकत होती गप्प राहून. 
न राहवून तो म्हणालाच 
"मला वाटतं मी आता निघावं!' 
त्याच्या चेहऱ्यावरील भाव पाहून मैत्रीण उठली, "चालू दे तुमचं!' मी आहे येथेच...'म्हणत ती बाहेर पडली. 
आता तो रिलॅक्‍स झाला. 
"खूप छान दिसतेस तू...पण आज काय बोलायची इच्छा नाही काय? आणि हे काय मला तुझ्या डोळ्यांत मला पाहायचंय. पाहायचंय माझ्या मैत्रिणीचे डोळे कसे आहेत ते?' 
ती काहीच बोलली नाही... 
"ओ बाईसाहेब, मी तुमच्याशी बोलतोय...' 
तिने गॉगल काढला. तिच्या दोन्ही डोळ्यांवर लावलेल्या पट्ट्या इतका वेळ गॉगलमुळे त्याला दिसल्या नव्हत्या. 
"हे काय? कशाने झालं हे?' 
ती सांगू लागली, ""महिनाभरापूर्वी ऑफिस सुटल्यानंतर बसमधून येत होते. कोणी तरी फुगा फेकून मारला. नेमका चेहऱ्यावर आदळला. त्यात कसलंतरी रसायनमिश्रित पाणी होतं. आग-आग झाली. मी ओरडले, किंचाळले. बेशुद्ध पडले. कोणीतरी मला दवाखान्यात नेलं. डॉक्‍टरांनी तपासणी केली. तातडीनं ऑपरेशन केलं...पण डोळ्यांविषयी खात्री नसल्याचं मला सांगितलं. अशा अवस्थेत मला तुला भेटायचं नव्हतं. तुला वाईट वाटेल म्हणून मी तुला टाळत होते. मित्र म्हणून तुला सांगायला हवं होतं, पण... 
तिला त्याची काहीच हालचाल ऐकू आली नाही..."अमेय...अमेय...' तिच्या हाकांना प्रतिसाद आलाच नाही.... 
तो हादरला...तिची कहाणी ऐकून तो बाहेर पडला...सगळा परिसर भोवताली फिरतोय असं त्याला वाटलं. सकाळपासून पाहिलेल्या सगळ्या स्वप्नांचा चक्काचूर झाला...तिच्यासोबत सहजीवनाची पावले चालण्याचा विचारही संपला. ती दिसते गोड...आपल्याला शोभलीही असती...माझ्यासोबत सहजीवनाचं राहू दे पण, तिच्या आयुष्याचं काय? काल-परवापर्यंत बहुरंगी असलेलं तिचं आयुष्य एकदम काळवंडलं...तिच्या आयुष्यातले सगळे रंग उडून गेले एका क्षणात. ज्या हरामखोराने फुगा मारला त्याला कल्पनासुद्धा नसेल किती भयानक परिणाम भोगावा लागतोय एका जीवाला. डोळे बरे होईपर्यंत तिला काम नाही. नंतरचं माहीत नाही. आता फक्त नरकयातना. नियती...नियती म्हणतात ती हीच का? परमेश्‍वराऽऽऽ. तो तेथेच कट्ट्यावर बसून राहिला अस्वस्थ, असहाय्य...... 
काही वेळ गेला. मैत्रिणीसोबत तनया रेस्टॉरंटमधून बाहेर पडली. बससाठी रस्ता ओलांडला. समोर कट्ट्यावर अमेय. दोघींना पाहून तो समोर आला. त्याला पाहून मैत्रीण सटकली. काही बोलण्यापूर्वी अमेयनं तनयाचा हात हातात घेतला. 
"कोण...कोण आहे?' 
"मीच आहे अमेय... तू जशी आहेस तशी मला मैत्रीण म्हणून हवी आहेस...माझी मैत्री तुला आवडेल? असं म्हणत त्यानं गिफ्ट म्हणून आणलेली अंगठी तिच्या हातात ठेवली. 
-- 
त्याच्या या कृतीने पट्ट्यांआड तनयाचे डोळे पाणावले...आणि मैत्रिणीच्या चेहऱ्यावर एकाचवेळी आनंद आणि अश्रू चमकून उठले.

Friday, January 13, 2012

'कॉम्प्लिमेंट'

दिवसभराच्या धावपळीमुळे सगळेच जाम थकले होते. कार्यक्रम नेटका झाल्यामुळे सगळे आनंदी होते. कोणतंही मंगलकार्य ठरवणं सोपं असतं; पण ते तेवढ्याच ताकदीनं पार पाडणं आणि पार पडणं दोन्हीही अवघड. सगळ्याच बाबी जुळून याव्या लागतात. आजच्या कार्यक्रमाचंही तसंच होतं. गेले पंधरा दिवस "त्याचं' कुटुंब हा कार्यक्रम निर्विघ्नपणे पार पडावा यासाठी प्रत्येक बारीक-सारीक गोष्टीचा विचार करून तयारी करत होतं. घरातील प्रत्येकाला कामे नेमून दिलेली होती. त्यामुळे गोंधळ असा फारसा झाला नाही. कार्यक्रम अगदी आनंदात, उत्साहात पार पडला.

सायंकाळी सगळं आवरल्यानंतर दिवसभराच्या कामाचा आढावा घेण्याचं काम सुरू झालं. प्रत्येकानं नेमून दिलेली कामं चोख केल्यानं तो प्रत्येकाचं कौतुक करत होता आणि त्याच्या कौतुकाने सगळे सुखावत होते. आता त्याच्याकडे पार्टीची जोरदार मागणीही केली गेली. त्यानं ती लगेच मान्य केली. सगळ्या थोरल्यांनी भरपूर कामं केली असली तरी आज प्रत्येकाच्या तोंडात "तिचं' नाव आवर्जून येत होतं.

"लहान असून किती समज आहे. प्रत्येक काम तिनं अगदी मनापासून, तिच्या वकुबाला पेलेल असं केलं. तिच्या वयाला न शोभेल आणि न झेपेल अशी पळापळ तिने दिवसभरात केली,' असं कौतुक ऐकत ती आत्ता बाबाच्या जवळच बसली होती आणि तो लेकीच्या कौतुकानं मनोमन सुखावला होता. दहा वर्षांच्या आपल्या चिमुरडीचं भविष्यात कोठेच अडणार नाही या जाणिवेनं त्याला आणखीनच बरं वाटलं. लेकीबद्दलचा अभिमान त्याच्या चेहऱ्यावर काठोकाठ भरून राहिला. त्याच्या बायकोचे डोळे तर आनंदाने अगदीच भरून आले. खरंच पोरगी मोठी व्हायला लागली आहे. प्रत्येक गोष्ट समजून उमजून करत आहे, याचे समाधान तिच्या चेहऱ्यावर दिसत होतं. पोरीची दृष्ट काढायची, असं तिनं मनोमन ठरवून टाकलं...

छोकरी तिथंच बसलेली कौतुक ऐकत. तिलाही सगळं छान-छान वाटत होतं. आपण दिवसभर जे काय केलं त्याचं सगळी कौतुक करत आहेत, हे ऐकून तिला मजा वाटत होती; पण तरीही ती काहीशी अस्वस्थ होती. कौतुकाने आनंद होतानाच कोठेतरी एक सल तिला जाणवत होती. पण, तिला नेमकं काय करावं हे समजत नव्हतं. ती शांतपणे सगळं ऐकत होती. आतून बेचैन होती. रंगलेल्या गप्पा संपल्या आणि पुन्हा प्रत्येकजण आपापल्या कामाकडे वळला. ती मात्र तेथेच बसून राहिली अस्वस्थपणे विचारांत बुडून गेली.

-------
तो त्याच्या खोलीत गेला. कोचावर रेलला आणि डोळे मिटून शांतपणे पडून राहिला. दिवसभराच्या पळापळीने त्याला शीण आला होता. काही वेळ गेला. जवळ हालचाल जाणवल्यानं त्यानं डोळे उघडले. त्याची छोकरी त्याच्या जवळ येऊन बसली होती; पण तिचे डोळे पाण्याने भरलेले होते. तो झटकन सावरून बसला.
""काय झालं बेटा? मघाशी तर तू खूश होतीस. आज सगळ्यांनी तुझं कौतुक केलं. मग आत्ता का तुझा चेहरा असा रडवेला?''
बाबांच्या या प्रश्‍नावर बळ एकवटून ती म्हणाली, ""बाबा, एक विचारू?''
""बोल बेटा, अगदी बिनधास्तपणे विचार'', असं म्हणत त्यानं तिला जवळ ओढून घेतलं.
""बाबा मी खरंच खूप काम केलं आज?''
""हो बेटा. अगदी खरंच तू खूप काम केलंस. म्हणून तर तुझं कौतुक केलं सगळ्यांनी. का काय झालं?''
""माझ्याबरोबर शेजारच्या त्या चिंगीनंपण किती काम केलं. उलट माझ्यापेक्षा जास्तच काम केलं तिनं. तिची आई भांडी घासत होती तेव्हा ती सगळी भांडी विसळून घेत होती. त्यानंतर तिनं सगळा हॉल झाडून काढला. नंतर तो पुसून काढला. सगळ्या खुर्च्या एका बाजूला लावल्या. सगळी भांडी मोजली. त्यांचा हिशेब आम्ही दोघींनी मिळून केला. माझ्यापेक्षाही तिनं किती तरी काम केलं आणि सगळ्यांनी माझं कौतुक केलं. तिचं कौतुक कोणीच केलं नाही. मघाशी सगळे माझे कौतुक करत होते. तेव्हा ती कोपऱ्यात उभं राहून ऐकत होती. माझं कौतुक ऐकून तिच्या चेहऱ्यावर कसला आनंद दिसत होता. तिचं कौतुक मात्र कोणीच केलं नाही. बाबा आपण तिचं कौतुक का नाही केलं? का कोणालाच तिचं काम दिसलं नाही? तिची आई आपल्याकडे कामाला होती हे मान्य; पण चिंगी माझ्याबरोबर नेहमी खेळते. माझी मैत्रीणच आहे ती. मी करते म्हणून तिनं काम केलं. तिचं मात्र कोणीच कौतुक केलं नाही.'' एवढं म्हणताना तिच्या डोळ्यांतून पाणी येऊ लागलं.

आता तो गहिवरला. आपल्या संवेदनशील लेकीचा त्याला अभिमान वाटला. ""ए वेडाबाई...'' म्हणत त्यानं तिला जवळ घेतलं आणि मायेनं कुरवाळलं.

------
मनाशी काहीतरी ठरवून तो उठला आणि बाहेर गेला. जाऊन आल्याबरोबर सर्वांना बोलावून घेतलं आणि लेकीला हाक दिली. चिंगीलाही बोलावून आणायला सांगितलं. त्याच्या लेकीबरोबरचीच ती पोर. त्यानं बोलावले म्हटल्यावर जरा दबकतच आली.
""ये चिंगी...'' त्यानं प्रेमळपणे हाक मारली.
चिंगी समोर आली. त्यानं लेकीच्या हातात एक बॉक्‍स दिला आणि चिंगीला द्यायला सांगितले.
तिनं तो बॉक्‍स चिंगीला दिला.
""काय हाय. मला नको ते...'' चिंगी म्हणाली.
""अगं चिंगी घे... तुच्या मैत्रिणीची ही तुझ्यासाठी भेट आहे बेटा. बघ उघडून.''
चिंगीनं बॉक्‍स उघडला आणि त्यातून सुंदरसा ड्रेस बाहेर काढला...""माझ्यासाठीऽऽऽ'' तिच्या डोळ्यांच्या बाहुल्या आनंदानं अगदी मोठ्या झाल्या.
""हो बाळा...''
""लय भारी हाय...'' म्हणत तिनं आपल्या मैत्रिणीला मिठी मारली.
दोन निर्व्याज, निष्पाप जिवांचा खराखुरा आनंदसोहळा तेथे रंगला.
---
तिच्या चेहऱ्यावरचा दिवसभराच्या कष्टाचा शीण कोठल्या कोठे पळून गेला. ड्रेसवरील सगळे सगळे रंग, प्रत्येक नक्षी तिच्या चेहऱ्यावर आनंदानं उमटून आली आणि मैत्रिणीवरील जीव आणखी घट्ट झाला.
---
चिंगीचंही कौतुक केल्याचं पाहून छोकरीला "त्या' मिठीत दिवसभराच्या कौतुकापेक्षा समाधानाचे मोठे बक्षीस सापडले आणि बाबांनी आपल्याला समजून घेतल्याचा आनंद तिच्या डोळ्यांतून अश्रू बनून घळाघळा ओघळला.
---
...आणि हे पाहून अभिमानाने त्याची छाती फुलून आली. लेकीच्या कौतुकाचा कढ दाटून आला. अश्रूंनी भावनांना वाट मोकळी करून दिली. पाणावलेल्या डोळ्यांनी त्यानं हे दृश्‍य साठवून घेतलं. लेकीच्या डोळ्यांतून ओघळणाऱ्या आनंदाश्रूंनी मिळालेली दिवसभरातील सर्वात मोठी "कॉम्प्लिमेंट' त्यानं हृदयाच्या कुपीत जपून ठेवली.

Friday, December 9, 2011

ये मौसम का जादू है...



...हे गाणं आणि अनेकांची ह्रदयं यांचं एक अतुट नातं आहे. या गाण्यातील मौसम अनेकांच्या मनात घर करून आहे. टवटवीत निसर्गाचे सानिध्य आणि त्या टवटवीतपणामुळे मनात उमटलेली लहर शब्दांच्या माध्यमातून ओठांतून बाहेर पडू लागते आणि हे गाणं रुंजी घालत रेंगाळू लागतं. नेहमी....
परवा नेमका हाच फिल मी घेतला...कधी नव्हे ते पहाटे जाग आली. मुड होता. बाहेर पडलो. रस्त्यावर आलो आणि गुलाबी थंडीने दोन्ही हात पसरून माझे स्वागत केले आणि याचवेळी धुक्‍क्‍यांचे नाजूक नाजूक तुषार भोवतीने रुंजी घालू लागले. त्याच्या स्पर्शाने चित्तवृत्ती मोहरल्या. हाताच्या तळव्यांवर हळू-हळू धुक्‍यातील कणांनी जागा पक्की केली आणि हळू हळू ओंजळ थंडीने भरून गेली. यथावकाश पूर्वेला रंगांची उधळण सुरू झाली, निशेची चादर हळू हळू बाजूला होऊ लागली; मात्र धुक्‍यांची दुलई अधिकच गडद झाली आणि तिने सारा भवताल आपल्या मिठीत घेतला. धुक्‍यांचे लोटच्या लोट विहरत राहिले आणि पानापानांवर दवबिंदूंचे सौंदर्य रेखत राहिले. सूर्यकिरणांनी खेळ मांडला आणि पानापानांवर कुबेराचा खजिना रिता झाला. या खजिन्याची मोजदाद अवघडच. माझ्या ओंजळीत सामावलेल्या थंडीनेही त्या खजिन्याला साठविण्याचा प्रयत्न केला...पण कंबक्त नशिब...त्याचं पाणी पाणी झालं; पण हे पाणी मौसमची जादू माझ्याजवळ सोडून गेलं...सगळा दिवस मस्त, प्रसन्न, तजेलदार बनून गेलं...मनात रेंगाळून राहिलं...

Saturday, November 26, 2011

ज्योत से ज्योत...



त्रिपुरारी पौर्णिमेला पहाटे कोल्हापुरातील पंचगंगा घाटावर सुमारे 51 हजारांवर पणत्या उजळल्या आणि त्याच्या मिणमिणत्या ज्योतीने सारा भवताल प्रकाशमान झाला. धुक्‍यांची शेला सोबतीला घेऊन येणाऱ्या मस्त थंडीची चाहूल, पंचगंगेच्या प्रवाहावरून हळूवार पुढे सरकणारे धुके. वाऱ्याच्या झुळकीसोबत लवलवणाऱ्या ज्योतींची आगळीवेगळी मैफल येथे सजली. या मैफलीमध्ये यथाशक्ती प्रत्येकाने ज्योतीतून ज्योत तेजवून प्रकाश भरला. उपस्थित कोल्हापूरकरांनी ही मैफल अगदी मनापासून अनुभवली आणि पंचगंगा फ्रेंडस सर्कल ग्रुपच्या पुढाकाराने आयोजित या उपक्रमाला धन्यवाद देत पावले आपसूक घराच्या दिशेने वळली.

Monday, October 31, 2011

"सृजन' दिवाळी अंकास उदंड प्रतिसाद

"सृजन' दिवाळी अंकास उदंड प्रतिसाद
नरकचतुर्दशीदिवशी "सृजन ई दिवाळी' अंक नेटवर आला आणि आत्तापर्यंत वाचकांनी त्याला उदंड प्रतिसाद दिला. त्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.
हा अंक आता.
https://docs.google.com/open?id=0B6FpjbggjhRAMDdmMzFmMDUtOTA2Mi00YjlhLWJlNjEtMWY2MjllMzk2NTJl
वरील लिंकसोबतच
http://ebooks.netbhet.com/2011/10/srujan-e-diwali-ank-2011.html
येथेही अपलोड केला असून तो येथेही वाचता येईल. असेच प्रेम वाढू द्यावे ही विनंती. प्रतिक्रिया आवर्जुन कळवा.

Tuesday, October 25, 2011

"सृजन ई दीपावली' अंक प्रकाशीत

दीपावलीच्या पहिल्या दिवशी सर्व वाचकांच्या हाती "सृजन' "ई दीपावली अंक' हाती देताना मनस्वी आनंद होत आहे. सकाळ वृत्तपत्रसमुहाचे उपमुख्य संपादक श्री. श्रीराम पवार यांनी क्‍लिक करून या "ई दीपावली अंकाचे प्रकाशन केले. वाचक भरभरून प्रतिसाद देतील ही अपेक्षा.

येथे वाचता येईल अंक.
https://docs.google.com/open?id=0B6FpjbggjhRAMDdmMzFmMDUtOTA2Mi00YjlhLWJlNjEtMWY2MjllMzk2NTJl

Sunday, October 23, 2011

ती सीता

नाटक संपलं, तिनं मेकअप उतरला, आवराआवर केली आणि गाडीत जाऊन बसली. सीटवर डोकं टेकून मागे रेलली आणि डोळे मिटून त्याची वाट पाहू लागली. तिच्या डोळ्यासमोर नाटकातील प्रसंग उभा राहिला.
---
तो म्हणाला,""सीते...मला माहित आहे, तू पवित्र आहेस. रावणानं तुझं हरण केलं होतं तो विधीचा संकेत होता. आपण त्या संकेतानुसार वागलो. आत्ताही मी ह्रदयावर दगड ठेऊन त्या संकेतानुसारच तुझा त्याग करणार आहे. मी तुझ्यावर अन्याय करतोय पण तू मला समजून घेशील...''
"माझी काहीच तक्रार नाही. तुम्ही आहात म्हणून मी आहे. माझा जन्मच मुळी सोसण्यासाठी झाला आहे. तुमचा जेवढा संग मला लाभला त्यावरच मी तृप्त आहे. तुमच्या सोबत असणाऱ्या आठवणी माझ्यासाठी खूप आहेत. तुम्ही नका वाईट वाटून घेऊ''

...पडदा पडला आणि टाळ्यांचा कडकडाट झाला. नाटक छान रंगलं. दोघांचं ट्युनिंग आजही प्रेक्षकांना आवडलं. दोघांमधील प्रसंग विशेष खुलत आणि ते पाहण्यासाठीच प्रेक्षक गर्दी करत असं बोललं जाई. दोघांच्या अभिनयाला रसिक प्रेक्षक अगदी मनापासून दाद देत. सातत्याने प्रयोग होऊनही हाऊसफुल्लचा बोर्ड काही हटलेला नव्हता. डिमांड शो वाढत होते आणि पैसा, प्रसिद्धीचा दोघांवरही वर्षाव होत होता. पुरस्कारांनी दिवाणखाना भरून गेला होता. जोडीलाच आणखीही दोन नाटकं सुरू होती. त्यांनाही प्रतिसाद मिळत होता. सर्व प्रकारच्या भूमिका "ती' उत्तम प्रकारे करू शकते असा विश्‍वास दिग्दर्शक, निर्मात्यांना असल्यामुळे ते पैसे लावायला तयार होते.
---
गाडीचे दार लावल्याचा आवाज आला आणि तिची तंद्री भंगली. तो येऊन शेजारी रेलला. दारूचा दर्प तिच्या नाकात घुसला.
"ड्रायव्हर चल' ती म्हणाली आणि गाडी मार्गस्थ झाली.
तो अर्धवट शुद्धीत होता. प्रयोग झाल्याबरोबर त्यानं मेकअप उतरवला आणि तेथेच बसून सुरवात केली. जणू प्रवेश संपण्याची तो वाटच पाहत होता. बराच वेळ तो पित बसला आणि ती त्याच्यासाठी गाडीत वाट पहात बसली. थिएटर बंद करण्याची वेळ झाली तशी तेथील पोऱ्याने त्याला धरून आणून गाडीजवळ सोडले.
गाडी सुरू झाली आणि तिच्या विचारचक्राने वेग घेतला.
चार वर्षांपूर्वी आपण रंगमंचावर पहिल्यांदा पाऊल ठेवले तेव्हा तो अगदी भरात होता. त्याच्यासोबत सीतेची भूमिका करताना मजा यायची. आपण अगदी समरसून सीतेची भूमिका साकारत असू. हळू हळू तो आपल्या प्रत्यक्ष जीवनातील "राम' आहे असेच वाटू लागले आणि पाहता पाहता आपण त्याचे कधी झालो हे समजलेच नाही. तो किती अदबीने वागायचा आपल्यासोबत. प्रयोग झाले की जेवण एकत्र घ्यायचा. विकेंडला फिरायला घेऊन जायचा. घरी येऊन आई-बाबांसोबत झकास गप्पा मारायचा. घरातला एक होऊन जायचा. वेगवेगळ्या वस्तू आणून द्यायचा आणि मुख्य म्हणजे किती प्रेमाने बोलायचा आपल्यासोबत. माझा होकार मिळविल्यानंतर आई-बाबांना म्हणाला,""फुलासारखं जपेन तुमच्या मुलीला. तिच्याशिवाय माझं जगणं अपुरं अपुरं आहे. मला ज्या जीवनसाथीचा शोध होता, ती तुमची मुलगीच आहे. तिच्या येण्याने माझ्या आयुष्याला पूर्णरूप येईल, नाही म्हणू नका.''
प्रतिथयश जावई मिळतोय आणि माझा होकार आहे हे लक्षात आल्यावर नकाराचा प्रश्‍नच उरला नाही. धुमधडाक्‍यात लग्न झालं. पहिले काही महिने अगदी मजेत, मस्त, फुलपंखी होते. सुख पायाशी लोळण घेत होतं. म्हणेल ती बाब समोर उभी राहत होती. त्याची बायको म्हणून मिरविण्यात पराकोटीचा आनंद मिळत होता. त्याच्यासोबत फिरणे, पार्ट्या, नाटकांच्या तालमी, दौरे सगळं कसं स्वर्गीय वाटत होतं. तो सुखांचा वर्षाव करत होता आणि आपली अवस्था "किती घेशील दोन करांनी' अशी झाली होती. माझ्यासाठी तो रामच बनला होता.
---
या सुखाला दृष्ट लागली. परगावी नाटकाच्या दौऱ्यावर असताना एकदा तो भरपूर प्याला आणि नाटकातल्या नायिकेसोबत लगट केली. त्याचा बभ्रा झाला. त्यानं प्रयत्न करूनही झाला प्रकार तिच्या कानावर आलाच. तो दौऱ्यावरून आल्यावर दोघांत "त्या' प्रकरणावरून भरपूर वाद झाला. काही दिवस अबोल्यात गेले. नाटक करतानाच काय ते दोघांचे बोलणे होई. एरव्ही संवाद बंद. असेच खूप दिवस गेले. मग तिनेच पडती बाजू घेतली. हळू हळू अबोला दूर झाला. तिनं सगळं पाठीवर टाकलं; मात्र अविश्‍वासाची एक फट दोघांत कायमची निर्माण झाली. करियरसाठी मूल होऊ न देण्याचा तिनं घेतलेला निर्णय आणखी ठाम झाला. त्याची "नट' म्हणून नव्याने ओळख झाल्याने ती मनोमन दुखावली; पण तरीही हे दुखावलेपण तिनं आत खोलवर ठेवलं. तिच्यापुढेही कितीतरी मोहाचे क्षण आले पण, तिने त्यावर प्रयत्नपूर्वक मात केली कारण नाटकातली सीता तिच्यात पुरेपूर भिनली होती; मात्र त्याच्या करणीने नाटकातली सीता आता ती यंत्रवत सादर करू लागली. त्या भूमिकेशी समरस होणं तिलां जड जाऊ लागलं. तिच्यातल्या अभिनेत्रीला मिळणारी दाद तिला स्वस्थ बसू देत नव्हती आणि म्हणून त्याला सहन करत ती स्टेजवर सीता साकारत राहिली.
---
गाडी बंगल्यात शिरली. तिच्या विचारांच्या गाडीला ब्रेक लागला. ती उतरून आत गेली. नोकराने त्याला आणून बेडवर झोपवलं. तिनं आवरलं आणि बेडवर पुन्हा विचारांत बुडून गेली. त्याच्या बरळण्यामुळे तिच्या विचारांना आणखी खाद्य पुरविलं. बराच वेळ तो बरळत होता आणि ती ऐकत राहिली. त्याचे शब्द तिच्या कानात शिशाचा रस ओतल्यासारखे शिरले. ऐकून ती खूप वेळ तशीच दगडासारखी बसून राहिली. बरळता-बरळता त्याची शुद्ध हरपली.
---
सकाळी उठल्याबरोबर त्यानं सवयीनं हाक मारली. प्रतिसाद आला नाही. त्याचा आवाज ऐकून नोकर चहा घेऊन आला. सोबत आणलेलं पत्र त्यानं त्याच्या हातात दिलं. म्हणाला "बाईसाहेब देऊन गेल्या.'
त्यानं पत्र फोडलं.
""...........
रात्री तू खूप बडबडलास. स्वतःबद्दल, माझ्याबद्दल. तू स्वतःबद्दल बडबडलास तेथपर्यंत सारं ऐकलं, सहन केलं कारण मला त्याची सवय झालीय; मात्र तू माझ्याबद्दलही गरळ ओकलीस. तुझी प्रत्येक चूक पोटात घालून तुझं असणं सहन करत राहिले. तुझ्या वागणुकीचे शिंतोडे माझ्या अंगावर उडूनही मी त्याबद्दल एक शब्दही काढला नाही. नाटकाच्या दौऱ्यांवर मी एकटी गेले त्यावर प्रश्‍नचिन्ह उभं केलंस. तू झोपेत का होईना पण माझ्या चारित्र्यावर शिंतोडे उडविलेसच. जे तू बोललास ते एक स्वाभीमानी स्त्री म्हणून सहन करण्यापलीकडचं आहे त्यामुळे मी तुझ्यापासून वेगळं होण्याचा निर्णय घेतलाय. वाईट एकाच गोष्टीचं वाटतं. नाटकात तू राम साकारायचास पण वास्तवात तू कधीच राम होऊ शकला नाहीस आणि मी मात्र नाटकात सीता झाले आणि वास्तवातही सीताच राहिले. खऱ्या रामायणात रामासाठी सीता धरणीच्या कुशीत लुप्त झाली. मी मात्र माझ्यातल्या स्त्रीसाठी तुझ्यापासून विभक्त होत आहे सीतेचा धर्म पाळण्यासाठी.''