Thursday, October 25, 2012

"एबीपी माझा'च्या "ब्लॉग माझा' स्पर्धेत बक्षिस


"एबीपी माझा'च्या "ब्लॉग माझा' स्पर्धेच्या चौथ्या पर्वाचा निकाल सोमवारी जाहीर झाला आणि विशेष आनंदाची बातमी म्हणजे माझ्या http://prajkta-prajkta.blogspot.in/ या ब्लॉगला उत्तेजनार्थ बक्षिस मिळाले. हा आनंद तुम्हा सर्वांच्या प्रेमामुळेच मला मिळाला असे मी मानतो. म्हणूनच हा आनंद मी तुमच्यासोबत शेअर करतो.
-----

Tuesday, October 23, 2012

"एबीपी माझा'च्या "ब्लॉग माझा' स्पर्धेत बक्षिस

"एबीपी माझा'च्या "ब्लॉग माझा' स्पर्धेत बक्षिस 
"एबीपी माझा'च्या "ब्लॉग माझा' स्पर्धेच्या चौथ्या पर्वाचा निकाल सोमवारी जाहीर झाला आणि विशेष आनंदाची बातमी म्हणजे माझ्या http://prajkta-prajkta.blogspot.in/ या ब्लॉगला उत्तेजनार्थ बक्षिस मिळाले. हा आनंद तुम्हा सर्वांच्या प्रेमामुळेच मला मिळाला असे मी मानतो. म्हणूनच हा आनंद मी तुमच्यासोबत शेअर करतो.
-----

Saturday, October 13, 2012

चैतन्याचं झाड...

डोक्‍यावरून हात फिरवत केस व्यवस्थित असल्याचा अंदाज घेत त्यानं पायात चप्पल सरकवली, खांद्याला अडकवलेली पिशवी पुन्हा एकदा सरळ केली आणि तो घरातून बुथकडे जाण्यास निघाला. त्याच्या नव्या दिवसाची सुरवात झाली. घरापासून साधारण किलोमीटरवर त्याचा बुथ होता. दिवसभर काम करायचं सायंकाळी घर गाठायचं हे त्याचं गेल्या कित्येक वर्षांचं रुटीन. या रुटीनला तो मुळीच कंटाळलेला नव्हता. त्याला कारण त्याचा रोजचा जाता-येता होणारा प्रवास. या किलोमीटरच्या प्रवासात तो रोजच्या आयुष्याला नव्याने सामोरा जात असे. आजचा दिवसही असाच. तो घरातून बाहेर पडला आणि त्याची पावलं नेहमीच्या दिशेने पडू लागली.
काही अंतर जाऊन तो कोपऱ्यावर वळला आणि डाव्या बाजूला पाहत त्यानं श्रद्धेने हात जोडले. काही क्षण रेंगाळला. मंदिरातील घंटा किणकिणली... एकापाठोपाठ तिची कंपनं त्यानं रोजच्या सवयीनं ऐकली. तो तोंडातच काहीतरी पुटपुटला... बहुधा "देवा मला सुखी ठेव' असं काहीसं म्हणाला. पुन्हा वळून चालू लागला. गेल्या कित्येक वर्षांची सवय. तो खास होऊन मंदिरात जात नसे; पण रोजचा नमस्कारही चुकवत नसे. मंदिरातल्या देवानंही ते ताडलं असावं. तो त्याच्या बाहेरून केलेल्या नमस्कारावरही खुश होत असावा. कारण गेल्या कित्येक वर्षात या मंदिरात न येणाऱ्या भक्ताला त्यानं फारसा त्रास दिलेला नव्हता. त्यामुळे त्याचा रोजचा नमस्कार देवापर्यंत पोचत होता आणि देव त्यावरच खुश होता.
काही अंतर पार केलं आणि मोगरा, गुलाब, चमेली, निशिगंध, सोनचाफ्याच्या फुलांचा मिश्रित गंध त्याच्या नाकाजवळ रेंगाळला. येथूनच घराघरांतील देव्हाऱ्यांत फुलं पोचतात आणि घरं सुगंधीत होतात. काही क्षण त्याचा चालण्याचा वेग मंदावला. त्यानं फुलांच्या दिशेने पाहत हा मिश्रीत गंध छाती भरून घेतला. हा गंध आता त्याला दिवसभर सोबत करणार होता. या गंधाच्या साथीने तो दिवसभराची कामे न कंटाळता करत राहणार होता. समाधानाने तो स्वतःशीच हसला आणि चालू लागला.
आता कपबशा विसळल्याचा, चहामध्ये घालायची सुंठ छोट्या खलबत्त्यात कुटल्याचा आवाज कानावर पडला आणि तळणीचा खमंग वासही त्याच्या नाकात शिरला. त्याची पावलं "तुकाराम'च्या चहाच्या गाड्याकडे वळली. समोर मांडलेल्या खुर्चीवर तो विसावला. "काय कसं काय?'ची चौकशी झाली. तुकारामनं चहाच्या पातेल्यात ओगराळं फिरवत "मस्त चाललंय' म्हणत त्याला प्रतिसाद दिला. जोडीला इतर विषयांवर चर्चा रंगली. बोलत बोलत चहा पिऊन झाला. त्याच्या पायाला विश्रांती आणि मनाला समाधान लाभलं. अमृततुल्यची चव ओठांवर रेंगाळली तिच सोबतीला घेऊन तो बाहेर पडला आणि पुन्हा बुथ जवळ करू लागला. आता एक चौक ओलांडला की पुढच्या चौकात बुथ. चालत चालत तो दिवसाच्या कामाची मनात आखणी करू लागला. अमूक पुस्तकांचे गठ्ठे बांधून ठेवायचे. उद्या उदबत्त्या आणायला हव्यात. काही ब्रॅंड संपलेत, कागदही संपत आलेत, ते ही आणून ठेवले पाहिजेत. पुढच्या महिन्यात कॅलेंडर लागणार तेही आणले पाहिजेत... विचारांच्या तंद्रीत तो चौकाजवळ पोचला.
---
तो चौकात पोचला खरां... पण त्याला चुकल्याचुकल्यासारखं वाटू लागलं. घरातून निघालेली वेळ, तुकारामच्या चहाच्या गाड्यावर घालवलेला वेळ आणि चौकात पोचायची वेळ यांचं गणित चुकल्यासारखं वाटू लागलं. का आपला रस्ता चुकला हेही त्याला समजेना. त्यानं हातातली काठी सवयीच्या पारावर आपटली तर तो पार तेथेच होता. तेथे नेहमी दोन वाहने उभी असतात ती पण त्याच्या जागी होती. तरीही त्याला काही तरी हरवल्यासारखं वाटत होतं. आपण चुकून विचारांच्या तंद्रीत भलत्याच रस्त्याला तर लागलो नाही ना! आता तो प्रचंड अस्वस्थ झाला. आता दुकानात पोचताना कसरत करावी लागणार, चार ठिकाणी विचारावं लागणार... विचारावं लागणार या विचारानं त्याची अस्वस्थता आणखी वाढली. परावलंबित्वाचा एक काटा त्याला टोचू लागला. इलाज नाही हे समजून अंदाज घेण्यासाठी त्यानं जाणाऱ्या एकाला हटकलं आणि विचारलं. दादा इथं कोपऱ्यात एक झाड....?
तो म्हणाला,"काय राव, रस्ता रुंदीकरणासाठी कार्पोरेशननं काल रात्रीच झाड तोडलं की... लाकडं पण गोळा करून नेली!'
--
...आता मात्र तो आतून कोसळला. आधार घेत बाजूच्या पाराला टेकला. पोचेल तिथपर्यंत हात फिरवत राहिलां. बुंधा हाताला लागेल या वेड्या आशेने चाचपत राहिला. झाडच नसल्यामुळं बुंधा असण्याचा प्रश्‍नच नव्हता. रोजची त्याला परिचित असणारी पक्ष्यांची किलबिलही नव्हती... तिथून जाताना रोज अनुभवण्यास मिळणारी वाऱ्याची झुळुक नव्हती...
रोज किलबिलाटाचा आवाज कानी पडला की रस्ता बरोबर असल्याची खुण त्याला पटायची आणि पक्ष्यांच्या आवाजानं त्याच्या मनावरील निराशाही दूर होत राही. तो किलबिलाट त्याच्या अंधारल्या आयुष्यात चैतन्य निर्माण करत राही, जगण्याचं सूत्र समजावत राही. वाऱ्याची झुळुक मनाला आणि देहाला गारवा देत राही... पण आता हे झाड भेटणार नाही... पक्ष्यांचे हक्काचे घर हिरावले गेल्याने त्यांचा किलबिलाट नाही... वाऱ्याची झुळुक नाही... जाणाऱ्या-येणाऱ्यांना सावली नाही आणि आपल्या रस्त्यात रोज मिळणारं चैतन्यही नाही... त्यानं ओलावलेले डोळे पालथ्या हाताने कोरडे केले... पुन्हा एकदा दोन्ही हात पारावर फिरविले... हाताशी झाडाचं एक गळालेलं पान लागलं. ते हाताशी घेतलं... थरथरणाऱ्या काठीने अंदाज घेतला आणि तो भरल्या मनाने दुकानाच्या दिशेने चालू लागला... 

Sunday, September 30, 2012

सामान्य जनतेचं काय?

गेल्या पंधरा दिवसांमध्ये दोन प्रमुख घटनांनी भवताल ढवळून निघाला.
एक म्हणजे सबसिडीवरील घरगुती वापरासाठीच्या गॅस सिलिंडरची संख्या कमी करून फक्त सहाच सिलिंडर देण्याचा निर्णय झाला आणि सोबत डिझेलही प्रतिलिटर 5 रुपयांनी महाग करण्यात आले.
दुसरी म्हणजे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सिंचन प्रकल्पांमध्ये घोटाळा झाल्याच्या आरोपावरून दिलेला राजीनामा आणि त्यानंतर राज्यभर निर्माण झालेली राजकीय अस्थिरता.
---
या दोन्ही घटनांनंतर त्याच्या प्रतिक्रिया उमटणे अत्यंत स्वाभाविक होते. पहिल्या घटनेमध्ये थेट जनतेशी, मतदारांशी संबंधित विषय असल्यामुळे विरोधक रस्त्यावर उतरणार हे शंभर टक्के खरे होते. त्याप्रमाणे ते उतरलेही; मात्र त्यामध्येही आपलाच पक्ष कसा सामान्य माणसांचा कैवार घेण्यासाठी झटतो हे दाखविण्याचीच भूमिका जास्त होती. सर्व विरोधकांनी एकत्र येऊन सरकारला धारेवर धरून या वाढींविषयी फेरविचार करावयास लावण्याचा दबाव निर्माण करण्यात विरोधक सपशेल अपयशी ठरले. आपल्यामुळेच जनतेचा फायदा कसा झाला हे दाखविण्यासाठी स्वतंत्र ताकद दाखविण्याचा प्रयत्नच केल्याचे दिसून येते. त्यामुळे यातून ठोस असे काहीच बाहेर पडले नाही. दूरचित्रवाहिन्यांच्या पडद्यांवरून चमकण्याची संधी मात्र या निमित्ताने अनेकांनी पुन्हा एकदा साधून घेतली. बरं, महागाई वाढली काय आणि कमी झाली काय, याचा त्यांना काहीच फरक पडत नाही हे आता लपून राहिलेले नाही.
मुळात महागाईने पिचलेल्या जनतेवर सरकारने हे आणखी ओझे लादल्याने जनता पार पिचून गेली आहे. बरं, वाढ कशी अपरिहार्य आहे हे सांगत सत्ताधारी आपली बाजू ठाम करत आहेत. (मध्येच महागाई भत्ता वाढवून एक तुकडा जनतेच्या तोंडावर फेकण्यात आला आहे.) आणि विरोधक प्रसारमाध्यमांतून त्यांच्यावर तोंडसुख घेत होते. वाढ होऊन पंधरा दिवस होत आले तरी विरोधकांच्या विरोधाला काडीइतकेही यश आलेले नाही. बिचारी सामान्य जनता वाढत्या महागाईचे फटके सहन करत दिवस ढकलत आहे, हे कटू सत्य आहे.
-----
दुसऱ्या घटनेमध्ये अजित पवार यांच्या राजीनामानाट्यानंतर महाराष्ट्रात अस्थिरता निर्माण होण्याचे चित्र रंगवले गेले. दादांच्या मागे आम्ही कसे आहोत हे दाखविण्यातच "बळ' एकवटले गेले. हेच बळ सामान्य जनतेसाठी मात्र रस्त्यावर मुळी उतरलेच नाही. जनतेचे आम्ही "सेवक' आहोत, असा गळा काढून मतं मागणाऱ्या सत्ताधाऱ्यांना जनतेच्या यातना दिसत नाहीत, की त्यांनी गांधारीप्रमाणे डोळ्यावर पट्टी बांधलेली आहे? दादांप्रति निष्ठा दाखविणे हे पक्षात राहणे, व्यक्तिगत विकास साधणे यासाठी कदाचित बरोबर असेलही; मात्र याच वेळी ज्यांच्या जीवावर आपण निवडून येतो त्या जनतेच्या प्रश्‍नांसाठी आपणही रस्त्यावर उतरायला हवे याचा बरोबर विसर पडल्याचे दिसते. सिंचन घोटाळ्यातून जे निष्पन्न होईल ते होईल...; जो पैसा ज्याने कोणी खाल्ला, तो सामान्य जनतेकडून वसूल केलेल्या करांमधील आहे हे कोण, कधी विचारात घेणार की नाही? दादा सत्तेवरून पायउतार झाले, त्यांची खाती घेऊन अन्य कोणी तरी त्या खुर्च्यांमध्ये बसेल. आठवडाभर झालेल्या गोंधळाचा धुरळा खाली बसेल. मनोमीलनाच्या नावाखाली पुन्हा गळ्यात गळे घातले जातील आणि हताश जनता पाहण्याशिवाय काही करू शकणार नाही. तिच्या नशिबी महाग सिलिंडर, महाग डिझेल आणि महागाईचे आक्राळविक्राळ रूपच असेल. 

Monday, September 24, 2012

मांगल्यभरला भवताल!

विघ्नहर्त्याचे आगमन होऊन चार दिवस झाले. सगळीकडे वातावरण भक्तिमय बनलं आहे. खूप छान वाटतंय. सकाळी-संध्याकाळी आरतीचे सूर कानावर पडत आहेत. रेंगाळत राहिलेला फुले, धूप-अगरबत्तीचा सुगंध उत्सवाचा गंध मनापर्यंत पोचवत आहे. काही ठिकाणी ढोल-ताशे निनादत आहेत. कमी आवाजात का होईना डॉल्बीही वाजताना दिसत आहे. सगळं कसं प्रसन्न-प्रसन्न! मनामनांत ही प्रसन्नता तुडुंब भरलेली असल्यामुळेच सारा भोवतालही त्याच लाटेवर स्वार झाला आहे. 
निरनिराळ्या आकारांतील गणेश मूर्ती कलाकारांची कला जगासमोर ठेवत आहे. मूर्तींचे सौष्ठव पाहताना तल्लीन व्हायला होत आहे. भावगर्भ नेत्र, मस्तकावरील किरीट, आभूषणांनी युक्त असं मनमोही रूप आठवून आठवून मनात साठविलं जात आहे आणि मनोमन नमस्कारही पोचता केला जात आहे. 
पाऊस कमी पडलाय. महागाई वाढणार या नकारात्मक बाबीवर काही प्रमाणात का होईना हा उत्सव फुंकर घालत आहे. जगण्याची उमेद मनामनांत जागवत आहे. ऊर्जा निर्माण करून जगण्याची प्रेरणा पेरत आहे. मंगलमयी वाटेवरून चालताना अंतर्मुखही करायला भाग पाडत आहे. भोवताली घडणाऱ्या विविध घटनांचा मेळ घालण्यास भाग पाडत आहे. "मी- माझं' या चक्रातून बाहेर पडण्याविषयी सुचवून "आपण-आपलं'च्या दिशेने जाण्यासाठी थोडीफार तरी दिशा देत आहे. उत्सवाच्या निमित्ताने का होईना हातात हात गुंफून काही तरी विधायक घडविण्याच्या दिशेने पावले पडू लागल्याचे दिसते. भक्तीच्या वाटेवरचे प्रवासी होताना थोड्या प्रमाणात का होईना समाजाला माघारी काही तरी देण्याचं मन होत आहे. गणेशाप्रति काही तरी करताना ते ओझे न वाटता एक जबाबदारी पेलल्याचे समाधानही काही जण मिळवत आहेत. हे लाखमोलाचं समाधान त्यांना पुढे जाण्यासाठी प्रेरणादायी ठरत आहे

Saturday, September 22, 2012

मांगल्यभरला भवताल!


विघ्नहर्त्याचे आगमन होऊन चार दिवस झाले. सगळीकडे वातावरण भक्तिमय बनलं आहे. खूप छान वाटतंय. सकाळी-संध्याकाळी आरतीचे सूर कानावर पडत आहेत. रेंगाळत राहिलेला फुले, धूप-अगरबत्तीचा सुगंध उत्सवाचा गंध मनापर्यंत पोचवत आहे. काही ठिकाणी ढोल-ताशे निनादत आहेत. कमी आवाजात का होईना डॉल्बीही वाजताना दिसत आहे. सगळं कसं प्रसन्न-प्रसन्न! मनामनांत ही प्रसन्नता तुडुंब भरलेली असल्यामुळेच सारा भोवतालही त्याच लाटेवर स्वार झाला आहे.
निरनिराळ्या आकारांतील गणेश मूर्ती कलाकारांची कला जगासमोर ठेवत आहे. मूर्तींचे सौष्ठव पाहताना तल्लीन व्हायला होत आहे. भावगर्भ नेत्र, मस्तकावरील किरीट, आभूषणांनी युक्त असं मनमोही रूप आठवून आठवून मनात साठविलं जात आहे आणि मनोमन नमस्कारही पोचता केला जात आहे.
पाऊस कमी पडलाय. महागाई वाढणार या नकारात्मक बाबीवर काही प्रमाणात का होईना हा उत्सव फुंकर घालत आहे. जगण्याची उमेद मनामनांत जागवत आहे. ऊर्जा निर्माण करून जगण्याची प्रेरणा पेरत आहे. मंगलमयी वाटेवरून चालताना अंतर्मुखही करायला भाग पाडत आहे. भोवताली घडणाऱ्या विविध घटनांचा मेळ घालण्यास भाग पाडत आहे. "मी- माझं' या चक्रातून बाहेर पडण्याविषयी सुचवून "आपण-आपलं'च्या दिशेने जाण्यासाठी थोडीफार तरी दिशा देत आहे. उत्सवाच्या निमित्ताने का होईना हातात हात गुंफून काही तरी विधायक घडविण्याच्या दिशेने पावले पडू लागल्याचे दिसते. भक्तीच्या वाटेवरचे प्रवासी होताना थोड्या प्रमाणात का होईना समाजाला माघारी काही तरी देण्याचं मन होत आहे. गणेशाप्रति काही तरी करताना ते ओझे न वाटता एक जबाबदारी पेलल्याचे समाधानही काही जण मिळवत आहेत. हे लाखमोलाचं समाधान त्यांना पुढे जाण्यासाठी प्रेरणादायी ठरत आहे.

Saturday, June 23, 2012

पाऊस दोघांतला

तो गॅलरीमध्ये येऊन उभा राहिला... आभाळ गच्च भरून आलेलं... दूरवर कुठे तरी पाऊस पडत असावा... गार वारा त्याची साक्ष देत होता... आणि इथे तो कोणत्याही क्षणी अस्तित्व दाखवेल असं वातावरण तयार झालेलं... आतून अस्थिर असल्याने वाहणाऱ्या गार वाऱ्याचा स्पर्श त्याच्या मनापर्यंत पोचत नव्हता. दूरवरचे  ढगाळलेले क्षितिज न्याहाळताना त्याच्या मनावरही त्याची काही पुटे चढत राहिली. तो आतून भरून आलेला... आता कोसळायचा फक्त बाकी होता...
उद्या कोर्टात आपल्या सहा वर्षांच्या संसाराचा "निकाल' लागणार. गैरसमजाच्या झाडाला किती कडू फळं येतात हे इतके दिवस ऐकलं होतं, आता ती अनुभवावी लागणार. कितीही पटवून देण्याचा प्रयत्न केला तरी तिला पटत नाही आणि तिला ते पटावं असं तिच्याभोवतीच्या काहींना वाटत नाही. होत नाहीत का माणसाच्या हातून चुका? बरं, नसलेल्या चुकाही मान्य करून पुन्हा एक संधी मागतोय. ती देण्याचा मोठेपणा ना ती दाखवतेय ना तिच्या घरचे... का तिला जाणीवपूर्वक माझ्यापासून दूर केलं जात आहे? आठ वर्षांच्या सहवासाने दोघांमधील विश्‍वास, ओढ किती भक्कम आहे याची वेळोवेळी साक्ष पटली आहे. नेहमी ती माझ्यासोबत राहिली. मी कोसळताना ठामपणे पाठीशी उभी राहिली. मंदीने नोकरी हिरावल्यानंतर पुन्हा नवा जॉब मिळेपर्यंतचे दोन महिने दुप्पट राबली. मला जरासुद्धा त्याची झळ लागणार नाही यासाठी धडपडली. ओव्हरटाईम करताना चिन्मयकडे दुर्लक्ष होणार नाही याची काळजी घेतली. मी दिवसभर नोकरी शोधत भटकताना माझा खिसा हलका राहणार नाही हे पाहिलं. बरं, हे सर्व करूनही आपण काही वेगळं करतोय असा अभिनिवेशही दाखविला नाही. सगळं किती व्यवस्थित मॅनेज केलं; पण सहा-सात महिन्यांपूर्वी काय बिघडलं कोण जाणे... सगळे रंगच उडून गेले. मला जॉब मिळून सगळं सुरळीत सुरू झालं, असं वाटत असताना अचानक काहीतरी बिनसलं. आधी अबोला, मग वाद, नंतर भांडणं आणि थेट "वेगळं' होण्याची मागणी. बरं, कारण काय तेही सांगत नाही. कारण समजलं तर निदान त्यावर चर्चा तरी करता येईल. जॉब नसल्याच्या टेन्शनमध्ये मी कधी नव्हे ती "घेतली'... पण एकदाच. मला माझी चूक समजली. त्याबद्दल माफीही मागितली तिची. चिडचिड झाली तेव्हा एकदा तोलही गेला आणि बोललोही तिला वाट्टेल तसं; पण तरीही ही काही एवढी मोठी कारणं नव्हती, की लगेच वेगळं व्हावं... मग नेमकं झालंय तरी काय? कसं कळणार? एक मात्र खरं, गैरसमजातून... कायद्याच्या तडाख्याने काडी काडी करून उभं केलेलं घरटं मोडलं जाणार हे नक्की... जरा आपणच माघार घेतली असती तर...
ें----
पाऊस येणार का?... येईल बहुधा... भरून तर आलं आहे. कोणत्याही क्षणी तो कोसळू लागेल; पण तोपर्यंत घालमेल होत राहणार... वारा सुटलाय खरा; पण त्यामध्ये फारसा दम नाही. एकदाचा कोसळून जाऊ दे... म्हणजे सगळं मोकळं मोकळं होईल... सभोवार आणि मनावरही दाटलेलं मळभ एकदाचं दूर होईल... रितं झाल्याशिवाय नव्या विचारांना धुमारे कसे फुटणार? उद्या आपल्या मनावर साठलेलं मळभही दूर होईल कदाचित... काय माहीत काय होतं ते...? विचारांनी तिच्या डोक्‍यात नुसता चिखल झाला होता...
उद्या कोर्टात काय होणार? चिन्मयची कस्टडी मिळणार का आपल्याला? तोच तर एक आधार आणि त्याची आपल्याकडे राहणारी एकमेव आठवण. जर कस्टडी नाही मिळाली तर... तर... आपल्या जगण्याला काही अर्थच उरणार नाही. माझं असं कोण उरणारच नाही. काही प्रश्‍न आपले आपणच सोडवायचे असतात हेच खरं... पण, आपल्याला हे समजलंच नाही. तो माफी मागत होता... त्यावेळीच आपण त्याला माफ करून या विषयावर पडदा टाकायला हवा होता (बहुधा त्याची चूक नव्हती. आपणच आक्रस्ताळेपण केला... कोणाच्या तरी.. काहीबाही सांगण्यावरून... शहानिशा न करता) पण त्यानं तरी असं का वागावं? वाटेल तसं बोलला.. "घेऊन' आला... हे म्हणजे अतिच झालं. खरं तर त्याची चूक नेमकी काय झाली आणि आपण त्यावर का रिऍक्‍ट झालो तेही आता लक्षात नाही. गैरसमज झालाय खरा. तो दूर करण्याचा प्रयत्न केला तर त्याच्या जवळच्यांनी तो दूर करूच दिला नाही. उलट दोघांत दुरावा वाढेल असंच पाहिलं. तोही मोकळेपणाने बोलला नाही... घातला मी वाद तर प्रतवादच करत राहिला. गैरसमजाचं विष उतरण्याऐवजी पसरत राहिलं. काय अवदसा आठवली आणि कोणताही विचार न करता वेगळं होण्याच्या अर्जावर सह्या केल्या. चुका कोणाच्या हातून होत नाहीत; पण त्यानं जरा पडती बाजू घेतली असती तर... मीच का पडती बाजू घ्यायची? ...स्त्री आहे म्हणून...? पण उद्या आपलं घर मोडणार हे नक्की. सहा वर्षे प्रत्येक क्षण जपत दोघांनी उभं केलेलं... दोघांनी कष्ट सोसून भक्कम केलेलं... मग ते डगमगलं कसं?... गैरसमजाच्या वादळाने विश्‍वासाला धक्का लागलाच कसा?....आपलंच काही चुकलं नाही ना?
ें----
""बाबा, तू कुठे निघालास... मला सोडून.. आईला सोडून? माझ्याशी कट्टी केलीस का तू? ए, जाऊ नको ना तू आम्हाला सोडून...''
चिन्मयच्या बोबड्या बोलांनी तो थबकला... "मी'पणा गळून पडला... आतून कोसळला... वळला आणि चिन्मयला येऊन बिलगला... ढसाढसा मोकळा होऊ लागला...
""मला नाही रे जायचं तुम्हा दोघांना सोडून...'' एवढंच म्हणाला...
त्याच्या या वाक्‍याने ती थिजली... त्या दोघांशिवाय आपण अपूर्ण आहोत... या जाणिवेनं कोलमडली... कमीपणा घेण्यातलं सुख तिला जाणवलं... ती पुढे झाली, चिन्मयच्या पाठीवर हात ठेवत म्हणाली, ""...चला "आपल्या' घरी जाऊ आपण!''
त्याच वेळी दाटून आलेलं गच्च आभाळ सुटलं... जलधारांतून बरसू लागलं... अश्रूंमधून वाहू लागलं... गैरसमजाने मोडू पाहणारं घर... समजुतीनं सावरलं. दोघांच्याही मनावरचं मळभ दूर झालं... आनंदभरला पाऊस... डोळ्यांतून अखंड झरझरत राहिला...