Tuesday, December 14, 2010

सैर माडबनची


ही वाट दूर जाते... स्वप्नामधील गावा...
जैतापूरला अणुऊर्जा प्रकल्प होण्याचे नक्की काय झालं आणि "माडबन' साऱ्या जगभर प्रकाशझोतात आलं. कारण हा प्रकल्प होणार आहे माडबनच्या हद्दीमध्ये. कोकणातील टिपीकल छोटंसं खेडं असलेल्या माडबन आणि परिसरावर निसर्गानं सौंदर्याची अगदी मुक्त हस्ते उधळण केलेली आहे. माडबनच्या किनाऱ्यावरून पश्‍चिमेकडे समुद्राच्या लाटांशी झुंजणारा विजयदुर्ग पहावयास मिळतो. तर येथील समुद्र किनाऱ्याला असलेल्या सुरूच्या बनातूनच किनाऱ्यावर छोट्याशा पायवाटेच्या साथीने येता येते. पायवाट संपून जेव्हा आपण किनाऱ्यावर पोचतो तेव्हा आपले स्वागत स्वच्छ, शांत, सुरक्षीत मऊशार वाळूंचा किनारा करतो. या वाळूच्या अंगणात ठिकठिकाणी खेकड्यांनी रेखाटलेली नक्षी पहावयास मिळते. छोट्या छिद्रांभोवती रेखलेली ही नक्षी पाहण्याची मौज काही औरच. शांतपणे काठावर बसून पहात राहिलं तरी आपल्या डोळ्यांदेखत अशा नक्षी उमटून येताना पहावयास मिळते. तुरूतुरू धावणारे लहान-मोठे खेकडे या वाळूवर एकसे एक नक्षी रेखाटतात आणि त्यांच्या कलाकारीला दाद दिल्याशिवाय राहवत नाही. साधारण किलोमीटरभर लांबीच्या या किनाऱ्यावर अगदी निर्धोकपणे फिरण्याचा आनंद घेता येतो, तर कंबरेएवढ्या पाण्यात जाताना कसलीही भीती वाटत नाही. येथील पाण्याला तुलनेत ओढ कमी असल्यामुळे अगदी बिनधास्त पाण्यात फिरता येते; मात्र सोबत गावातील कोणीतरी असणं आवश्‍यक आहेच बरं. जर वातावरण स्वच्छ असेल तर विजदुर्ग किल्ल्याच्या परिसरातील हालचालीही आपण सहज पाहू शकतो.
साधारण साडेसातशे लोकसंख्या असलेलं माडबन टिपीकल कोकणी गाव. चिऱ्यातील घरे, त्यावर कौलारू छत, अंगणात आणि परसात माड, सुपारी, आंबा, काजू, रातांब्याची झाडे. स्वच्छ अंगण आणि प्रत्येक अंगणाला चिऱ्याच्या भिंतीचे कुंपण, त्याला लावलेला कुडाचा दरवाजा. गावाला लागूनच असलेली भाताची खाचरे. त्यातल्या त्यात सधन घरापुढे उभ्या गाड्या. भगवतीचे सुरेख मंदिर आणि तिची तेवढीच सुंदर, सुबक मूर्ती. उतारावरून गावात आल्यानंतर साऱ्या जगाशी कसलाही संपर्क नसलेलं सुंदर देखणं गाव. यावं प्रेमात पडावं आणि येथील होऊन जावं असं मनात रुतून बसणारं माडबन. (सध्या जैतापूर अणूऊर्जा प्रकल्पविरोधातील हालचालींचे प्रमुख केंद्र बनल्याने गाव शांतता हरवून बसले आहे)

हे आहे खेकड्याचे घर

खेकड्यांनी मिळून नक्षी काढून सजवलेला रुपेरी वाळूचा किनारा

हा सागरी किनारा...

कोकणातलं टिपीकल घर आपुलकीनं बोलावणारं

Thursday, November 11, 2010

मोगरा फुलला


टेरेसचा दरवाजा उघडून सवयीप्रमाणे दूरवर दिसणाऱ्या पन्हाळ्याच्या डोंगररांगेकडे पाहिले तर धुक्‍याच्या पडद्याआड ती हरवून गेलेली; पण वातावरण एकमद मस्त. माझ्याभोवतीही धुक्‍याचे काही कण रेंगाळत-रेंगाळत पुढे चाललेले. त्याच्या स्नेहार्द स्पर्शाने सकाळ आणखीनच प्रसन्न झाली. नेमका हाच मोका साधून मोगऱ्याच्या हळूवार गंधाने नाकाशी येऊन साद घातली. डोळे आपोआप वळले मोगऱ्याच्या कुंडीकडे तर हिरव्याकंच पानांच्या पार्श्‍वभूमीवर पांढऱ्या शुभ्र शलाका उमटून आलेल्या. वाऱ्याच्या मंद झुळकीशी मस्तपैकी खेळत असलेल्या. पाच टप्पोऱ्या शलाका.
वर्षभरापूर्वी लावलेला मोगरीचा वेल त्याच्या वकुबानुसार फुलला. माझे प्रयत्न सुरूच होते; पण या वेलीचं वैशिष्ट्य असं की हिला नवी फांदी फुटली की पहिल्यांदा त्यावर कळी डोले आणि मगच फांदी वाढे. बरं कुंडीतली वेल ती कितीशी वाढणार? तिला फारसं बाळसं नाही; मात्र असलेल्या चार पाच छोट्याश्‍या फांद्यांवरही सातत्याने फुले उमललीच. परवा मात्र या वेलीनं एकाच दिवशी चक्क ओंजळभर फुलांचं दान आम्हाला दिलं; मग मात्र मोह आवरला नाही. आमच्या मित्रवर्यांना आमंत्रित करून छानसं फोटो सेशन उरकलं. (आमचं त्याबाबतीतल ज्ञान जरा तुटपुंजंच आहे) आमच्या कुटुंबानेही त्यादिवशी समजुतदारपणा दाखवताना या फुलांचा वेलीवरच डोलण्याचा आनंद मुळीच हिरावून घेतला नाही, त्यामुळे संपूर्ण दिवस या शुभ्र शलाकांच्या सुगंधाने घराचा परिसर भरून राहिला.

Thursday, November 4, 2010

स्वागतिका


आश्‍विन महिन्याला सोबतीला घेऊन धुक्‍यासोबत हातात हात घालून थंडीचे आगमन होतं आणि पांढुरक्‍या धुक्‍याची दुलई साऱ्या सृष्टीवर अलगद पांघरली जाते. सारे चराचर दबबिंदूंचे कण टिपून घेण्यासाठी उतावीळ असते. पाऊस पिलेला निसर्गही थंडीचे अमृत पिण्यासाठी आसुसलेला असतो. खळ्यावरून घराच्या अंगणात आलेल्या समृद्धीच्या सोन्यामुळे बळिराजाही मनोमन आनंदलेला असतो. नोकरदारांच्या हातात खुळखुळणारा ज्यादाचा पैसा सुखाची सोबत करतो. मनामनांचे गाभारे आनंदाच्या दीपोत्सवाने उजळून निघालेले असतात. नव्या नवलाईमुळे घराघरांतून आनंदाचे दीप प्रकाशमान होऊन सुखाच्या रेशीमलडी उलगडतात. हे रेशीम आणखी चमकदार बनविण्यासाठी दिवाळी येते. अशा वेळी पहाटे गाणं कानावर पडतं ...
उठी श्रीरामा पहाट झाली...
पूर्व दिशा उजळली...
उभी घेऊनी कलश दुधाचा
कौसल्या माऊली!
आणि दिवाळीची जाणीव भोवती रुंजी घालू लागते. भल्या पहाटे काकणभरले हात अंगणावरून फिरू लागतात आणि पाहता-पाहता सारे अंगण सजीव होतं, आपल्याशी बोलू लागतं. सारवलेल्या, स्वच्छ अंगणात किणकिण नाद येऊ लागतो आणि एक-एक नक्षी उमटून येऊ लागते. बोटांच्या चिमटीतून लोभस, गहिरे, मनाचा ठाव घेणारे, रंगबिरंगी रंग एकापाठोपाठ एक धरतीशी नातं जोडू लागतात आणि नक्षीची सुरेल मैफल आकार घेऊ लागते. त्या किणकिणणाऱ्या हातांची नजाकतभरी हालचाल एखाद्या चतुरस्त्र चित्रकाराची आठवण करून देतात. (तशी रांगोळी रेखणारी "ती' यजमानांच्या आयुष्यात रंग भरणारी चित्रकारच असते) रांगोळीची शुभचिन्हे गंधभरल्या अंगणावर झर-झर उतरतात आणि सारा माहौल बदलून जातो. कधी हा माहौल ठिपक्‍यांतून बोलतो, तर कधी त्यातील नक्षी तुमच्यासोबत संवादाचा पूल बांधते. कित्येक ठिकाणी फुलांच्या पाकळ्याही सोबतीला येऊन रांगोळीची श्रीमंती अधिक वाढवितात. दिवाळीसाठी घरोघरी येणारी लक्ष्मी अंगणातून प्रसन्न होऊन यावी आणि आपल्या घरीच तिने राहावे, या साठीची ही तयारी.
गारगोटीच्या चुऱ्यापासून बनविलेली पांढरीशुभ्र रांगोळी आणि रंगांची सोबत यांमुळे रांगोळी रेखलेले अंगण, येणाऱ्या प्रत्येकाशी आपसुक संवाद साधते. एरव्ही देव्हारा, तुळशीवृंदावन, जेवणाच्या ताटाभोवती रेखली जाणारी रांगोळी ऐन दिवाळीत मात्र साऱ्या अंगणाची आणि घराची शोभा अगदी काठोकाठ वाढवतं. रंगांच्या या ओळी पवित्रतेचे प्रतीक मानल्या जातात आणि म्हणूनच त्या घराघरांत रेखल्या जातात. सारं अंगण सजिव करून टाकणारी ही रांगोळी असते फक्त गारगोटीचा चुरा पण ती रेखतानाची भावना चैतन्य निर्माण करते. ही रांगोळी बंगालमध्येअल्पना म्हणून, बिहारमध्ये ती अरिपना म्हणून, राजस्थानात मांडना म्हणून, तर दक्षिण भारतात ती कोलाम म्हणून भेटते. केरळात ती पाकल्लम म्हणून समोर येते. महाराष्ट्राशिवाय इतरत्र रांगोळीसाठी तांदळाचे पीठ, फुले, फुलांच्या पाकळ्या, विटकरीचे तुकडे, नैसर्गिक रंग यांचाही उपयोग करतात; तर दक्षिणेत फुलांचा उपयोगाने रांगोळ्यांच्या पायघड्या, गालीचे अंथरले जातात; मात्र गारगोटीचा चुरा आणि रंग हे मात्र कॉमनच.
चिमटीतून सारं भावविश्‍व साकारण्याची किमया साधणारी रांगोळी मनांचा ठाव घेते आणि समृद्धीचा आनंदोत्सव साजरा करण्याचा पवित्र भाव साऱ्या अंगणभर मिरवते, सारा भवताला आनंदी, पवित्र बनवून स्वागतिका बनते.

Saturday, October 30, 2010

ती दोघं

सिग्नल लागला आणि त्यानं गाडी उभी केली. उन्हाच्या तडाख्याने तो जाम वैतागला होता. हातातलं काम उरकून केव्हा एकदा ऑफिसच्या एसीमध्ये शिरतोय असं त्याला झालेलं; पण अजून दोन तास तरी त्याला उन्हात फिरावेच लागणार होते. तो दीड मिनिटे संपण्याची वाट पाहू लागला. टळटळीत उन्हातला प्रत्येक सेकंद त्याला शिक्षा वाटत होती.
"सालं काय आपलं नशिब! दिवसभर वणवण फिरा, क्‍लायंटना कन्व्हीन्स करा. जास्तीत जास्त बिझनेस होण्यासाठी प्रयत्न करा. बॉसपुढं रेकॉर्ड चोख राहील म्हणून धडपडा. करीयर ग्राफ वाढता रहावा, जास्त पैसा मिळावा म्हणून धडपडा. घरतल्यांच्या आनंदासाठी उन्हा-तान्हात हिंडा. चेहरा काळवंडून जातो. संध्याकाळी जीव नकोसा होतो. तरी बरं पैसे बरे सुटतात, नाहीतर...'
खण-खण आवाजाने त्याची विचारांची तंद्री भंगली. त्यानं आवाजाच्या दिशेने नजर टाकली.
फाटके कपडे घातलेली दोन पोरं जीव खाऊन खाली पडलेल्या सिमेंटच्या पिलरवर हातोड्याने घाव घालत होती.
"काय पोरं आहेत! उन्हा-तान्हात कशाला खेळत असतील? असा प्रश्‍न त्याच्या डोक्‍यात वळवळला.
तेवढ्यात पाठीमागून कर्कश्‍श हॉर्न वाजला आणि त्याची विचारांची तंद्री भंगली. सिग्नल सुटला होता. त्यानं किक मारली आणि वाहनांच्या गर्दीतून वाहून जाऊ लागला.
----
तासाभराचे काम आटोपून तो पुन्हा मघाच्याच चौकात आला आणि पुन्हा सिग्नल लागला. आता तो स्वतःवरच वैतागला. दीड मिनिटे पुन्हा रणरणत्या उन्हाची शिक्षा. पुन्हा घाम, चिक-चिक. वैताग साला! एवढ्यात त्याच्या कानावर पुन्हा खण-खण आवाज आला. त्याचे लक्ष तिकडं गेलं. मघाची तीच पोरं जीव खाऊन त्याच पिलरवर हातोड्याने घाव घालत होती.
आता त्याचे कुतुहल जागे झाले. त्याने गाडी वळविली आणि तो त्या पोरांच्या बाजूला जाऊन उभा राहिला.
"काय करताय रे पोरानो?'
त्याच्या प्रश्‍नाने ती पोरं दचकली. त्यांचे हातोडे थांबले. चेहऱ्यावर अनामिक भीती तरळली.
"काही नाही...काही नाही! आम्ही आपलं हे...' असं म्हणून ती पोरं अडखळली.
"अरे घाबरू नका, उन्हा-तान्हात काय खेळताय हे बघायला मी आलोय बाकी काही नाही'
"हात तुझं! असं म्हणून त्यातल्या एकानं पुन्हा हातोडा सरसावला आणि खाणकन पिलरवर घाव घातला.'
दुसरा त्याच्या तोंडाकडं बघत म्हणाला, ""साहेब खेळत नाय काय, या पिलरमधनं लोखंडाचं तुकडं काडतुय.''
"लोखंडाचे तुकडे? आणि त्याचं काय करता?'
"ओ साहेब जाऊ द्या नां! ए वश्‍या आटप लवकर. उगच नको बोलत बसू. त्यांना न्हाई काम. तू मार फटके.'
दुसरा म्हणाला,"" साहेब जावा तुम्ही ह्यो शिवज्या न्हाई शाना, उगीच काय तरी बोलंल तुम्हाला जावा तुम्ही.'
""अरे पण तुम्ही उन्हा-तान्हात या पिलरमधून लोखंडाचे तुकडे का काढत बसलाय? आणि तुम्हाला शाळा नाही?''
""शाळा आणि आमी, काय साहेब चेष्टा करताय काय गरिबाची? आवं हिथ दोन येळचं जेवण मिळावं म्हनून आख्खा दिस उन्हा-तान्हात घालवावा लागतूय. आसं पडक्‍या ठिकाणचं सिमेंटची दगडं, पिलर हुडकायची, दिवसभर हाताला फोड येईस्तवर फोडून त्यातनं लोखंड काढायचं. राती भंगारचं दुकान बंद व्हायच्या आत तिथं जायाचं. फोडून काढलेलं लोखंडाचं तुकडं तिथं द्यायचं. त्याचं वजन करायचं. पाच-पंचवीस रुपये मिळतात. ते घ्यायचं आनी घर गाठायचं. साला तो भंगारवाला त्यात पण काटा मारतोय, पण करणार काय? गुमान दिल ते पैसे घ्यायचं. पैसं आसलं, तर आई घरात घेती, नायतर बोंब मारती. शिव्या घालती''
""का?'' आता त्याची छाती भरून आली. दाटलेल्या आवाजात न राहवून त्यानं मध्येच प्रश्‍न विचारला.
""सावत्र हाय न्हवं! बाचा पत्त्या नाय; पण घरात ठिऊन घेतीया हेच लय झालं. ती पण काय करणार म्हणा. ती चार घरची धुणी भांडी करती. आणखी दोन भनी हायेत. पाच जणांच्या पोटाची खळगी तिला भरायची हाईत. दोनी पोरींना उजवायचं हाय. मग आमी नाय पैसै मिळवायचं तर कुनी, तुमीच सांगा सायेब?''
त्याचं लक्ष दोघांच्या हाताकडं गेलं. हात पार सोलवटून निघालेले; पण डोळ्यात जगण्याची चमक आणि दोन पैसै मिळवायची धमक स्पष्ट.
""आपल्याला जरा ऊन लागलं तर मघाशी आपण स्वतःवरच चरफडलो आणि ही पोरं...
त्याचे डोळे भरले. त्यानं पाकिट काढलं हाताला लागतील तेवढे पैसै घेतले आणि त्या पोराच्या सोलवटलेल्या हातावर ठेवले. दोघांच्याही डोक्‍यावरून हात फिरवला आणि काहीही न बोलता गाडीला कीक मारली.''
""पोरांचे डोळे चमकले. ऊन थंड वाटू लागलं, हातात आणखी बळं आलं. त्यांनी आणखी जोमाने हातोड्याचे घाव घालायला सुरवात केली. आज पोटभर अन्न मिळणार याची त्यांना मनोमन खात्री पटली होती.''

Monday, October 4, 2010

आठवणींचा दरवळ


कोणी येतं आयुष्यात
एक झुळुक बनून!
रेंगाळून राहतं सभोवती
आश्‍वासक होऊन!
स्वप्ने वेडी खुळावती
गुंफल्या मनांतून!
झंकारून उठताती मग
सूरही ह्रदयातून!
ताऱ्यांचा चमकता गावही
मावतो ओंजळीतून!
आणाभाकांचा पर्वत राहतो
उभा शब्दांतून!
---
हाय... दुर्दैव आणते
अघटीत घडवून!
कोसळती स्वप्ने, इमले
पडते सारे मोडून!
फुलणारे नाते कोमेजते
आठवणींचा दरवळ
मागे ठेऊन!

Tuesday, August 10, 2010

म्हणूनच...

केबीनमधून खाडकन आवाज आल्याने बाहेरचे सगळे काम टाकून केबीनच्या दिशेने धावले. तेवढ्यात केबीनचे दार धाडकन ढकलून "तो' रुबाबदार तरूण बाहेर आला. त्याने बाहेर जमलेल्यांवर तुच्छतेने एक नजर टाकली आणि तो तडक तेथून बाहेर पडला. त्याला पाहत पाहत केबीनबाहेर जमलेही आपापल्या जागेवर जाऊन बसले.
--
"तो' घरी आला. कोपऱ्यात शुज काढत त्याने हातातली फाईल टेबलवर ठेवली. कानावर आई म्हणत असलेला श्‍लोक पडल्याने त्याला जरा बरे वाटले आणि मघाच्या प्रसंगाने तापलेलं डोकं काहीसं शांत झालं. त्यानं कपडे काढले आणि तो फ्रेश झाला. त्याच्या येण्याची चाहूल लागल्याने आईने त्याचा अंदाज घेतला आणि अटोपते घेत चहा टाकला.

कशी काय झाली मुलाखत?
ठीक. (आईच्या प्रश्‍नावर त्याने रुक्षपणे उत्तर दिलं)
आज पण काही....म्हणत आईनं त्याच्या चेहऱ्याकडे पाहिलं आणि तिचं वाक्‍य अर्धवटच राहिलं...
आई! तुला माहित आहे...तरी तू मला तोच प्रश्‍न का विचारतेस?
राहिलं बाबा ! तुला जे योग्य वाटेल ते कर!
---
लक्ष्मीकांत येथेच राहतात का? बाहेरून कोणीतरी विचारले.
आईने बाहेर जाऊन पाहिले. दारात पोलिस.
हो..येथेच राहतो? काय झालं? काय काम आहे?
साहेबांनी त्यांना पोलिस ठाण्यात घेऊन यायला सांगितलंय!
आई कोण आहे गं?
अरे हे पोलिस तुला न्यायला आलेत बघ!
आई अगं घाबरू नकोस, मी पाहतो काय झालं ते!
तो बाहेर गेला, पुन्हा आत आला, "" आई तू जेवून घे, तो पर्यंत मी आलोच! चला!
"तो' पोलिसांबरोबर निघाला. त्याला आपण पोलिस ठाण्यात का निघालो आहोत याचा अंदाज आला; पण आईला त्याने काहीच सांगितले नाही. काही उपयोग होणार नव्हता त्याचा!
-----
या साहेब...बसा ! त्या कॉन्स्टेबलच्या कुत्सीत बोलण्याने त्याची विचारांची मालिका खंडित झाली. "तो' काहीसा दुखावला.
"मला येथे का बोलावलंय?'
आम्हाला वेळ जात नाही, वाईच गप्पा मारायच्या म्हणून ...(ही ही ही.)
त्याच्या हसण्याने खरंतर तो संतापला; पण त्याने संताप आवरला. कारणही तसंच होतं. त्याला पलीकडच्या मुख्य टेबलासमोर खुर्चीत बसलेला पाठमोरा माणूस दिसला.

"बसा! साहेब येऊ देत मग बघू तुमच्याकडे!'
"तो' काही बोलला नाही. शांत बसून राहिलां.
---
तेवढ्यात तेथील वरिष्ठ अधिकारी आले आणि खुर्चीत बसले! समोरच्या व्यक्तीबरोबर त्याचं काहीतरी बोलणं झालं.
तुकाराम..त्यांना घेऊन ये इकडं.
साहेबांनी बोलावलंय.
तो उठला आणि साहेबांपुढे जाऊन उभा राहिला?
""अरे लक्ष्मीकांत तू आणि इथं !''
"सर...मला घरातून बोलावून आणलं म्हणून आलो'
अरे तू आहेस... यांची तुझ्याबद्दल तक्रार आहे...तू म्हणे यांना मारहाण केलीस?
होय सर..मी यांच्या थोबाडीत दिली. त्याने थंडपणे सांगितले.
काय ऽऽऽ तुझ्याकडून अशा अपेक्षा नाहीत आणि तुला याचे परिणाम काय होतील याची कल्पना आहे नं! आणि तरीसुद्धा तू असं टोकांच पाऊल का उचललंस?
"सर तुम्ही द्याल ती शिक्षा भोगायला मी तयार आहे; पण आधी त्यांना कारण तरी विचारा'
"काय झालं म्हणून याने तुम्हाला थोबाडीत मारली' त्यांनी त्या व्यक्तीला विचारलं.
...मी यांची मुलाखत घेत होतो? काही प्रश्‍न विचारले बस्स! आणि याने मला थेट मारहाण केली.'
"सर एक मिनिट मी यांना मारहाण केलेली नाही. फक्त एक थोबाडीत लगावली आहे आणि ते ही मला नको तो प्रश्‍न विचारला म्हणून!'
असा काय प्रश्‍न विचारला म्हणून तू त्यांना मारलेस?
"सर विचारा त्यांनाच, त्यांच्या सडक्‍या मेंदूत काय शिजत होतं त्यांनाच माहित!'
"सर काय विचारलंत तुम्ही'
.............(काही वेळ शांततेत गेला)
सर ते काय बोलणार? साऱ्या जगाला ते तत्वज्ञान सांगतात आणि स्वतः वागताना मात्र खालची पातळी गाठतात.' माझी सर्व सट्रीफिकीट यांनी पाहिली. माझे मार्क्‍स पाहिले. ते पाहिल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की यांचा "कॅंडीडेट' माझ्यापुढे टिकाव धरू शकणार नाही. मग यांनी माझ्या सर्टीफिकीटवर वाचून पुन्हा-पुन्हा माझी "जात' विचारली. मी एकदा सांगितले तर मला ऐकू कमी येतं जरा मोठ्यानं सांगा म्हणत पुन्हा पुन्हा विचारलं ! मग मी मोठ्यानं सांगितलं. त्यानंतर त्यांनी माझ्यावर जातीवाचक शेरेबाजी केली. मग माझं डोकं फिरलं आणि दिली ठेऊन कानाखाली आता ते नक्कीच पुन्हा कधीच कोणाची "जात' विचारणार नाहीत. विचारा त्यांना.
-----
काय हे खरंय हे?
ती व्यक्ती काहीच बोलली नाही.

लक्ष्मीकांत जा तू... पुन्हा असे करू नकोस. रागावर कंट्रोल कर.
(थॅंक्‍यू सर म्हणून तो बाहेर पडला)
सर तुम्ही असं का केलंत? तुम्ही उच्चविद्याविभूषीत...तुम्ही या पदापर्यंत पोचलात ते कष्टाने, तुमच्या कर्माने. कधी तुमची "हलकी' जात तुमच्या आडवी आली नाही. तुम्हाला सुविधा मिळाल्या, तुम्हाला फायदा झाला म्हणून कोणीही तुमच्या विरोधात बोलल्याचं ऐकिवातही नाही. आम्ही सर्वच तुमचा आदर करतो. तुम्हीही "त्याच' चुका करू लागलात तर कशी सांधणार दुरावलेली मनं?
या तुम्ही. मला वाटतंय आता तुमची काही तक्रार उरली नसले. त्यांच्या उत्तराची अपेक्षा न करता त्यांनी दुसरी फाईल उघडली.

Monday, August 2, 2010

मनातला विठ्ठल!

पहाटे आजी नेहमीप्रमाणे मंदिरात गेल्या, पूजा झाली, काकड आरती झाली. मनोभावे त्यांनी विठ्ठलमूर्तीला नमस्कार केला; मात्र आज पुन्हा त्यांना विठ्ठलाच्या चेहऱ्यावर नेहमीचे तेज दिसलेच नाही. त्या पुन्हा अस्वस्थ झाल्या. गेल्या काही दिवसांत त्यांना विठ्ठलाच्या चेहऱ्यावर तेजच दिसत नव्हतं आणि असं का व्हावं हा विचार त्यांचा पिच्छा सोडत नव्हता. या विचारांच्या तंद्रीतच त्या मंदिरातून बाहेर पडल्या. रेंगाळतच पायऱ्या उतरून चालू लागल्या. पावसाची रिपरिप सुरू झाल्याने चालण्याचा वेग त्यांनी जमेल तसा वाढविला. दोन-चार मिनिटे चालल्यानंतर त्या राहत असलेल्या इमारतीजवळ आल्या. पायऱ्या चढून घरात गेल्या. काहीसा दम लागल्याने दाराजवळच खुर्चीत बसल्या. वेग घेतलेला श्‍वास लयीत येत असताना पुन्हा विठ्ठलमूर्ती आठवू लागल्या.
...पहाट असूनही आज एकादशीमुळे मंदिरात गर्दी होतीच; भक्तांची ये जा सुरू होती; बाहेर भिकारीही नेहमीपेक्षा जास्त दिसत होते. एखादा दुसरा भक्त त्यांच्या हातात चिल्लर भिरकावून निघून जात होता एवढंच. आज आपण पूजेला नेहमीपेक्षा जास्त वेळ दिला. प्रार्थना, अभंगही व्यवस्थीत म्हटले. निदान आज तरी गेले काही दिवस मनात सुरू असलेली अस्वस्थता कमी होईल असं वाटलं होतं, पण छे! असं का व्हावं? याचा विचार करताना त्यांच्या सुरकुतल्या चेहऱ्यावरील चिंतेचं जाळं आणखी दाट होत गेलं. मग मनाशी काय वाटलं! आणि त्या खुर्चीतून उठल्या. स्वयंपाकघरात गेल्या. पातेलं ठेवून त्यात आदण ठेवलं, चहा-साखर घातली, गॅस बारीक केला आणि पिशवी घेऊन होता होईल तेवढ्या वेगाने जिना उतरून खाली आल्या. जवळच्या डेअरीमध्ये जाऊन दुधाच्या पिशव्या घेतल्या आणि पुन्हा घर गाठले. एव्हाना चहा चांगलाच उकळला होता. आणलेलं दूध त्यांनी त्यामध्ये ओतलं. पुन्हा एकदा चहा चांगला उकळून घेतला. हातावर थेंब टाकून चव पाहिली. "ठिक जमलाय' असं दर्शवणारी मान आपसूक हलली. चहा किटलीत ओतला आणि किटली पिशवीत ठेवून त्या पायऱ्या उतरल्या आणि झपझप पुन्हा मंदिर गाठलं!
आता पाऊस थांबला होता; पण गारठा जाणवत होताच. मंदिरातली लगबग सुरूच होती. त्या भिकाऱ्यांजवळ गेल्या आणि एकेकाला चहा देऊ लागल्या. वीस-पंचवीस भिकाऱ्यांना त्यांनी गरम-गरम चहा दिला. चहा वाटून झाल्यानंतर भिकाऱ्यांचे चेहरे पाहून त्यांच्या मनातला मघाचा विचारांचा कल्लोळ काहीसा कमी झाला. चेहऱ्यावरील चिंतेचं जाळं काहीसं सैलावलं. घरी जाण्यापूर्वी पुन्हा मंदिरात गेल्या. विठ्ठलाला हात जोडले आणि जायला निघाल्या. आता त्यांना विठ्ठलाच्या चेहऱ्यावर काहीसं स्मित दिसलं. त्यांना भास झाल्यासारखं वाटलं म्हणून त्यांनी निट निरखून पाहिलं, तर आज त्यांना खरंच विठ्ठलाचा चेहरा प्रसन्न दिसला. विठ्ठलाच्या चेहऱ्यावर त्यांना त्यांच्याच मनातले समाधान उमटून आलेलं दिसलं.