Saturday, July 23, 2011

द्रविड कृष्ण बनून आला (लंडन डायरी)


लॉर्डसच्या खेळपट्टीने तीन दिवसांत वेगवेगळे रंग दाखवले. पहिल्या दिवशी झहीर, दुसऱ्या दिवशी पीटरसन तर तिसऱ्या दिवशी तिने ब्रॉडला सहकार्य केलं. तिचा नेमका रंग काय या बाबत अंदाज बांधणेच अवघड बनले आहे. एकीकडे ब्रॉड आणि ट्रेम्पलेटला पूर्ण सहकार्य करत असतानाच तिने द्रविडचा हातही अखेरपर्यंत मुळीच सोडला नाही. म्हणजे जो कर्तृत्व दाखवेल त्याच्या पाठीशी "ती' असंच काहीसं दृष्य गेल्या तीन दिवसांत दिसलं आणि आपल्याला क्रिकेटची पंढरी का म्हणतात ते दाखविले.
झकास ओपनींग देऊन भारतीय सायबांना चोख उत्तर देणार असं वाटत असतानाच स्टुअर्ट ब्रॉडने खेळपट्टीला स्वींगची लालूच दाखविली आणि पाहता पाहता उभा राहू पाहत असणारा डाव पुरता विस्कटला. मुकुंद अर्धशतक पूर्ण करता करता राहिला तर गंभीरला लय सापडत असताना गेला. मुकुंदच्या रुपाने कसोटीसाठी आणखी एक सलामीवीर मिळू शकेल याची चुणुक दिसली. ज्याच्या महाशतकाची वाट क्रिकेटरसिक पाहत होते त्या सचिनने सुरवात झकास केली; मात्र ब्रॉडने या मैदानावरील आधीची सर्वोच्च धावसंख्याही त्याला गाठू दिली नाही. लक्ष्मण आणि रैना मैदानावर अगदी पाहुण्यासारखे आले. उपस्थिती लावली आणि विकेटचा आहेर देऊन गेले. कर्णधार धोनीने प्रयत्न केले; पण त्याची बॅटही शांत केली गेली. एकीकडून इंग्लीश गोलंदाजांकडून जगातल्या अव्वल संघाचे वस्त्रहरण सुरू असताना क्रिकेटरसिकांनी राहुल द्रविडचा धावा सुरू केला आणि द्रविड कृष्ण बनून धावला. त्याने भारतीय संघाची अब्रू झाकण्यासाठी मैदानावर घट्ट नांगर रोवला. एक-एक धावेचे वस्त्र तो भारतीय फलंदाजीभोवती गुंडाळत राहिला आणि फालोऑनची नामुष्की टाळून त्याने संपूर्ण वस्त्रहरण रोखले. शतकी खेळी करून या मैदानावर शतक ठोकण्याचा पंधरा वर्षांचा वनवासही त्याने संपविला. सचिन मैदानात आल्यानंतर ज्या प्रमाणे त्याच्याबद्दलच्या अपेक्षांनी टाळ्या वाजल्या. त्यापेक्षा जास्त टाळ्या द्रविडने मैदानातून बाहेर जाताना घेतल्या. एक दोन अपवाद वगळा पूर्णतः निर्दोष खेळी त्याने सादर करून लॉर्डसच्या यादीत नाव कायमचे कोरले. मैदानावर तो भींतीसारखा उभा राहिला आणि या भिंतीवर ब्रॉड, ट्रेम्पलेट प्रभूतींना डोके आपटण्यास भाग पाडले. पंधरा चौकारांची नजाकत, वेळेनुरूप संयम आणि समोरील जोडीदाराला बरोबर घेऊन जाण्याची धमक त्याने दाखवून दिली. झळकलेले शतक त्याच्या नावावर लागलेच पण संघाची अ
ब्रू वाचवली हीच फार मोलाची कामगिरी ठरली. ही कामगिरी करतानाच त्याने सर्वाधीक धावांच्या स्पर्धेत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या रिकी पॉंटींगला मागे टाकले. आता तो सचिनच्या धावांच्या एव्हरेस्टच्या पाठोपाठ आपले शिखर घेऊन उभा राहिला आहे.

Friday, July 22, 2011

पीटरसन पेटला (इंग्लंड डायरी)


पहिल्या दिवशी खेळ करणारा पाऊस दुसऱ्या दिवशी खुपसा शहाण्यासारखा वागला आणि नेमका त्याच वेळी झहीरखान मैदानाबाहेर राहिला. या दोन्ही बाबींचा पुरेपूर फायदा साहेबांनी विशेषतः पीटरसनने उठविला आणि भारतीय गोलंदाजीविरुद्ध धावांचा वणवा पेटवला. काल सावधपणे खेळून खेळपट्टीचा आणि भारतीय गोलंदाजीचा अंदाज घेतलेला केवीन पीटरसन आज चांगलाच पेटला. त्याने झहीरशिवाय भारतीय गोलंदाजी कशी तकलादू आहे हे दाखवून दिले. आपल्या डावात त्याने "पलटी' शॉट्‌सही अगदी लिलया खेळले. त्याने ट्रॉट आणि प्रायर यांना जोडीला घेऊन संघाची धावांची भिंत अगदी भक्कम बांधली. दिवसभरात झालेल्या 347 पैकी 180 धावा एकट्या पीटरसनने फोडून काढल्या. सामन्या दरम्यान त्याच्यात आणि प्रवीणकुमारमध्ये थोडी नोकझोंक झाली; पण त्याचा परिणाम केविनने आपल्या खेळीवर होऊ दिला नाही. उलट शतक पूर्ण केल्यानंतर आणखी आक्रमक होत द्विशतकही पूर्ण करून त्याने ऐतिहासीक कसोटीसोबत आपले नावही कायमचे कोरले. यशस्वी ठरत असलेल्या प्रवीणकुमारसह भारताच्या सर्वच गोलंदाजांना त्याच्या झळीचा चटका बसलाच. त्याने एक षटकारासह 21 चेंडू सीमापार करताना लॉर्डस्‌च्या खेळपट्टीला आपले गुलाम केले. काल झहीरच्या गोलंदाजीच्या प्रेमात पडलेली खेळपट्टी आज ऊन लागताच बदलली आणि पीटरसनवर फिदा झाली. तिने पीटरसनला पूर्णपणे साथ दिली आणि धावांचा किल्ला बांधण्यास हातभार लावला. संपूर्ण दिवसभराच्या खेळात तो दोनदाच बाद होता होता वाचला. विशेष म्हणजे या वेळी गोलंदाज होता भारतीय कर्णधार महेंद्रसिंग धोनी. हे दोन अपवाद वगळता पीटरसनने आपला फलंदाजीचा क्‍लास लॉर्डस्‌वर उपस्थित क्रिकेटप्रेमींपुढे पेश केला. संपूर्ण दिवसभर फलंदाजी केल्यानंतरही त्याची शरीरभाषा सकारात्मक होती. सहकारी टप्प्या टप्प्याने पॅव्हेलियनमध्ये परतत असताना. त्याने खेळपट्टीवर भ
क्कम नांगर टाकला तो अखेरपर्यंत काढलाच नाही. कर्णधार स्ट्रॉसनेही त्याच्या द्विशतकाची वाट पाहिली आणि ते पूर्ण होताच डाव घोषित केला आणि मानवंदना स्वीकारत पीटरसन दिमाखात परतला.

धोनीच्या हाती चेंडू
लंचनंतर भारतीय खेळाडू जेव्हा मैदानात उतरले तेव्हा यष्टीरक्षकाचे ग्लोव्हज द्रविडच्या हातात दिसले तेव्हा धोनी गोलंदाजी करण्याचा प्रयोग करतोय काय असा प्रश्‍न पडला आणि त्याचे उत्तर लगेचच मिळाले. लंचनंतरची पहिले षटक टाकून धोनीने सगळ्यांनाच आश्‍चर्याचा धक्का दिला. एवढ्यावरच न थांबता त्याने सलग पाच षटके टाकून आपल्या मुख्य गोलंदाजांना काहीशी विश्रांती दिली. दुसऱ्या ओव्हरमध्ये तर त्याच्या गोलंदाजीवर चेंडू पीटरसनच्या बॅटच्या जवळून द्रविडच्या ग्लोव्हजमध्ये विसावल्यानंतर बिली बॉडेन यांनी झेलबाद दिले; मात्र पीटरसनने त्याविरुद्ध रिव्ह्यू मागितला आणि तेथे तो नाबाद ठरला. धोनीने गोलंदाजीवरही हात साफ करताना आठ षटके टाकली आणि धावा दिल्या 23.

Thursday, July 21, 2011

पाऊसच जास्त खेळला! (इंग्लंड डायरी)


छायाचित्र संकेतस्थळाच्या सौजन्याने
----------------
कसोटी क्रिकेटमधील दोन हजारावी कसोटी खेळण्याचे सुवर्णपान लिहिले जात असताना वरुणराजालाही आवेग अनावर झाला आणि तो मुक्तपणे धारांतून लॉर्डस्‌वर बरसला आणि ऐतिहासिक क्षणांचा साक्षीदार बनला. दिवसभर प्रत्यक्ष क्रिकेटच्या बरोबरीने त्यानेही मैदानावर खेळ मांडून गोलंदाजांसाठी पोषक वातावरण बनविले. या पोषक वातावरणाचा फायदा उठविण्यासाठी भारताचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने टॉस जिंकून गोलंदाजी घेतली खरी; मात्र त्याचा फायदा झहीरखान वगळता इतर कोणालाही उचलता आला नाही. अर्थात त्यांनी प्रयत्न केलेच नाहीत असे नाही; पण बिचाऱ्यांना नशिबाची साथ काही लाभली नाही. प्रवीणकुमारचे चेंडू स्विंग झाले; मात्र त्याला खेळून काढण्यात साहेबांनी यश मिळविले; तर इशांतला त्यांनी खेळविले. इशांत प्रयत्नात कोणतीही कसूर करत नाही; पण आजचा दिवस त्याचा नव्हताच. हरभजनने सुरवातीपासूनच लय पकडून जोनाथन ट्रॉटला जाळ्यात अडकवण्याचा केलेला प्रयत्न अगदी थोडक्‍यात फसला. चेंडू द्रविडच्या हाताला लागून खाली पडला. त्यावेळी हरभजन द्रविडवर आणि द्रविड स्वतःवरच जाम वैतागलेला दिसला. एक संधी हुकल्याची खंत दोघांच्या चेहऱ्यावर उमटली. दुसरीकडे पहिल्या चेंडूपासूनच उत्तम लाईन आणि लेंथ पकडलेल्या झहीरखानने लॉर्डस्‌च्या खेळपट्टीला पहिल्या काही षटकांतच वश करून घेतले मग आधी कुकला आणि नंतर नेहमीचं गिऱ्हाईक असलेल्या स्ट्रॉसला बाद करून कर्णधाराचा विश्‍वास सार्थ ठरविला. त्या वेळी भारतीय संघ पहिल्याच दिवशी मजबूत पकड घेणार अशी हवा तयार झाली; मात्र ही हवा त्यानंतर पार विरून गेली.

स्ट्रॉसचा बळी पंचविसाव्या षटकात गेला आणि त्यानंतरच्या 24 षटकांत पीटरसन आणि दोनवेळा नशिबवान ठरलेल्या ट्रॉटने भारतीय गोलंदाजांना संधीच दिली नाही आणि धावांची भरही घातली. ट्रॉटला हरभजनच्या गोलंदाजीवर द्रविडने सोडल्या
नंतर झहीरच्या गोलंदाजीवरही पहिली स्लीप आणि यष्टीरक्षक यापैकी कोणी झेल घ्यायचा या संभ्रमात चेंडू सटकला. द्रविड आणि धोनी दोघेही चेंडू पकडण्यात अपेशी ठरले. यानंतरचा खेळ मात्र पीटरसन आणि ट्रॉटनेच केला. त्यांनी पावसाळी वातावरण इंग्लंडच्या पाठीराख्यांना आणखी बोचरे होऊ नये याची काळजी घेतली आणि डाव स्थिर केल्याचे समाधान दिले. ट्रॉटने अर्धशतकी खेळी करताना दोन जीवदानांचा पुरेपूर लाभ उठविला. प्रवीणकुमार, इशांत शर्मा आणि हरभजनने जाता जाता झटका देण्याचा केलेला प्रयत्न अपुरा पडलाच. चहापानाला खेळ थांबला आणि मग पुन्हा एकदा वरुणराजाने अस्तित्व दाखवताना मनसोक्त खेळ मांडला तो मांडलाच. आता उद्या भिस्त पुन्हा एकदा झहीरवरच, पण त्याला दुखापत झालीय. रात्रीत तो तंदुरुस्त व्हावा यासाठी धोनी देव पावसात न ठेवेल तर नवल.

Wednesday, July 20, 2011

क्रिकेट युद्धाला तोंड फुटणार


आज (ता. 21) सकाळी लॉर्डस्‌च्या हिरवळीवर भारत आणि इंग्लंड संघातील खेळाडू पाय ठेवतील तेव्हा क्रिकेटच्या इतिहासातील आणखी एक सुवर्णपान लिहिलं जाईल. 2 हजाराव्या कसोटीमध्ये वर्चस्वासाठी दोन्ही संघ आमने-सामने उभे ठाकतील तेव्हा या ऐतिहासिक घटनेसोबत धोनीब्रिगेड आणि स्ट्रॉस सेना आपसुक जोडली जाईल. सायबांना त्यांच्याच घरात पराभवाचे खडे चारण्यास धोनीसेना उत्सुक असताना प्रत्यक्ष लॉर्डस्‌वर उपस्थित राहून तसेच दूरचित्रवाणीच्या माध्यमातून कोट्यवधी क्रिकेटरसिक या क्षणांचे साक्षीदार होण्यासाठी नक्कीच प्रयत्न करतील.
15 ते 19 मार्च 1877 मध्ये पहिला कसोटी सामना खेळल्यानंतर गेली 144 वर्षे क्रिकेटच्या मैदानावरील हा सिलसिला अखंड सुरूच आहे. या प्रवासात क्रिकेटमध्ये आमुलाग्र बदल घडला असून आणि यापुढेही घडण्याची नांदी होऊ घातली आहे. कसोटी सामने दिवस-रात्र खेळविण्याविषयी गांभीर्याने चर्चा सुरू आहे. एकदिवसीय सामन्यांमुळे कसोटी क्रिकेटची लोकप्रियता काही प्रमाणात कमी झाली असली तरी गेल्या काही वर्षांत कसोटी सामने निकाली होऊ लागल्याने पुन्हा एकदा प्रेक्षक या सामन्यांकडे वळू लागला आहे. कसोटी खेळणे म्हणजेच क्रिकेट खेळणे ही भावना अद्यापही क्रिकेटपटूंमध्ये दृढ असल्याने कसोटी क्रिकेट जिवंत राहणार हे नक्की.
भारत आणि इंग्लंड यांच्यात शंभरावी लढत होत असताना इंग्लंड भूमीवर भारतीय संघाची कामगिरी म्हणावी तशी बहरलेली नाही. पंधरा लढतींपैकी अवघी एक लढत जिंकण्यात भारतीय संघ यशस्वी ठरला आहे, तर दहा पराभव पदरी पडलेत. तर 99 पैकी 19 लढतींमध्येच भारतीय संघ विजय मिळवू शकला आहे. इंग्लंडने 34 विजय मिळवताना 46 लढती अनिर्णित राखल्यात. सध्या भारतीय संघ कसोटी क्रमवारीमध्ये अव्वल स्थानी आहे. कॅप्टन कुल महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली इतिहास बदलण्यासाठी हा संघ उत्सुक आहे; मात्र स्ट्रॉसच्या नेतृत्वाखालील इंग्लंड संघाविरुद्ध त्यांच्याच मैदानावर खेळताना धोनीसेनेचा कस लागणार आहे हे नक्की.

लॉर्डसवर सचिन मोका साधणार?
ही कसोटी जशी ऐतिहासिक आहे. तसेच क्रिकेटच्या पंढरीत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर कारकिर्दीतील शंभरावे शतक झळकावून मणिकांचन योग साधण्यात यशस्वी होणार का, याकडेही क्रिकेटरसिकांचे लक्ष लागलेले आहे. यापूर्वी या मैदानावरील त्याची कामगिरी जरी सुमार असली तरी हा भूतकाळ पुसून हा मोका साधण्याचा प्रयत्न सचिन नक्कीच करेल अशी आशा आहे.

Thursday, July 14, 2011

तो एक पाऊस


आज दर्याचा नूर तिला नेहमीपेक्षा वेगळा जाणवत होता. जाऊ नको म्हटलं तरी त्यानं पहाटे होडी घातलीच समुद्रात. नको म्हटलं तर म्हणाला, "अगं आता तीन महिने नाहीच जायचं दर्यावर. आज मिळेल तेवढी मासळी आणतो. तेवढेच चार पैसे जादा होतील आणि दुसरं कोण नाही म्हटल्यावर मलाच जादा मासोली गावणार. तू नको काळजी करू. मी येतो सुखरूप' असं म्हणत त्यानं होडी समुद्रात लोटलीपण. पहाटेच्या अंधारानं त्याला लगेच कवेत घेतलं. होडीवरचा मिणमिणता कंदिल दिसला बराच वेळ आणि नंतर तो ही दिसेनासा झाला. तो गेला तेव्हा समुद्र अगदी शांत होता शहाण्या मुलासारखा. किनाऱ्यासोबत लाटांचा खेळ सुरू होता. फेसाळणाऱ्या लाटा तिच्या पायाला स्पर्शून जात होत्या. गाज कानाला गोड वाटत होती.
त्याचं अस्तित्वच धुसर झालं तशी ती माघारी वळून चालू लागली आणि विचारांच्या लाटा तिच्या मनात उसळू लागल्या.
"हा ऐकतच नाही माझं. तू देशील त्यामध्ये मी सुखी राहीन म्हटलं की म्हणतो, "अगं तू माझी राणी होणार. तुला अगदी फुलासारखं ठेवणार मी. पण त्यासाठी पैसे नको? नुसत्या प्रेमानं पोट नाही भरत. या चार दिवसांत वेगळी-वेगळी मासळी मिळाली तर पैसैही जास्त मिळतील आणि आपल्याला उपयोगही होईल.'
किती वेगळा आहे हा. शिकलाय चांगला, कोठेही शहरात नोकरी मिळू शकली असती, पण आई एकटी कशी राहणार म्हणून शहरात जात नाही. शेती, मच्छिमारी करतो. कोणाच्याही मदतीला हा पहिला. सगळ्या वाडीत त्याला नावाजतात. एरव्ही कोणाच्या अध्यात ना मध्यात. त्याच्या आईनं माझ्याबद्दल वडिलांना विचारलं तेव्हा आपल्या पदरात समुद्राच्या पोटात मावणार नाही एवढी खुशी पडली. अशा तरुणाबरोबर लग्न करणार या कल्पनेनेच आपण मोहरून गेलो.'
--
एकदम माडांची सळसळ वाढली आणि तिचे विचार थांबले. पाठोपाठ पावसाचे मोठे-मोठे थेंब येऊ लागले. पळत तिनं घर गाठलं. तरी ती भिजलीच. अवघ्या अर्ध्या तासात सगळा नूर पालटला. जोरदार वादळ सुरू झालं आणि जोडीला पाऊस धो धो कोसळू लागला. आता तिच्या मनातही विचारांचं वादळ थैमान घालू लागलं.
"जाऊ नको म्हटलं तरी ऐकलं नाही. आता काय करणार तो? दर्यापण खवळलेला असणार. हा घरी कसा येणार? कशा अवस्थेत असेल तो?'
तिच्या डोळ्यासमोर भर समुद्रात उधाणलेल्या लाटांसोबत झगडणारा तो दिसू लागला. हेलकावणारी होडी जीवाच्या कराराने सावरत पाण्याच्या माऱ्याला तोंड देताना त्याची होणारी दमछाक तिला दिसू लागली.
आता तिचा जीव कासावीस होऊ लागला. दोघांनी संसाराची पाहिलेली स्वप्ने तिच्या डोळ्यासमोर तरळू लागली आणि काही विपरीत घडलं तर... हा विचार येता क्षणी तिचा ठाव सुटला आणि धो-धो पावसात ती समुद्राच्या दिशेने धावत सुटली...
----
ठणकणाऱ्या डोक्‍यावर तिचा हात गेला आणि ती जागी झाली. तीन दिवसांनंतर. समोर आबा, त्याची आई आणि शेजाऱ्यांना पाहताच तिला काही कळेना. तिची नजर त्याला शोधू लागली.
"काकी तो आला का? कुठे आहे तो?'
तिच्या प्रश्‍नावर त्याच्या आईनं तोंडाला पदर लावला आणि ती मुसमुसू लागली.
म्हणजे, तो अजून आला नव्हता. कधी येणार तो? त्याला मी सांगितलं होतं जाऊ नकोस. ऐकल नाही माझं, येतो म्हणाला, काळजी करू नकोस. तो येईल, हो आत्ता. आत्ताशी सूर्य मावळतीला आला आहे. मला जायला पाहिजे. असं म्हणून ती उठू जाऊ लागली. तशी पाठीतून एक सणक आली. काकींनी तिला सावरून पुन्हा झोपवलं.

तिला आठवलं, पाऊस सुरू झाला म्हणून आपण समुद्राच्या दिशेने धावत सुटलो आणि पाण्यात शिरलो. समुद्राने आधी आत ओढून घेतलं आणि उसळलेल्या लाटेने आपल्याला पुन्हा बाहेर फेकून दिलं. त्यानंतर...
----
आज पंधरा दिवसांनंतरही भर पावसात तिचं समुद्राकाठी येणं आणि त्याची वाट पाहणं यात खंड पडलेला नव्हता. समुद्रातून त्याची होडी येतेय आणि आपण त्याच्याकडे धावतोय, हेच दृष्य सारखं तिच्या डोळ्यासमोर तरळत राही. तुफान पडणाऱ्या पावसामुळे त्याच्या शोधासाठीचे प्रयत्न बंद पडले आणि पंधरा दिवसानंतर सगळ्यांनी आशाही सोडून दिली. सगळी वाडी त्याच्याबद्दल हळहळत होती आणि हिच्या डोक्‍यावर परिणाम झालाय म्हणून कुजबुजत होती. पण, तिला त्याची कसलीच जाणीव नव्हती. ती ना सरळ जेवत होती, ना झोपत होती. संध्याकाळच्या वेळी ती समुद्राकाठी भर पावसातही फिरत राही. रात्र चढू लागली की कोणीतरी तिला घरी घेऊन जाई.
--
खोल गेलेले डोळे. नजरेत वाट पाहण्याची काठोकाठ भरलेली आर्तता. थकून गेलेलं शरीर आणि मनात फक्त तो नक्की येणार हा विश्‍वास घेऊन आजही ती किनाऱ्यावर फिरत होती. दिवस मावळला आणि ती ठरलेल्या खडकावर जाऊन त्याची वाट पहात बसली. रात्र चढू लागली. पाऊस सुरूच होता. एवढ्यात काठावर एका सावलीचा तिला भास झाला. ती निरखून पाहू लागली. देहयष्टी त्याच्या सारखीच वाटली. हळू-हळू ती आकृती पाण्यातून बाहेर आली आणि काठावर कोसळली. धप्प आवाजाने तिची तंद्री भंगली.
पायांत बळ एकटून ती उठली. हळू-हळू खडकावरून वाळूत उतरली. पडलेल्या व्यक्तीच्या दिशेने प्रचंड आशेने धावत सुटली. जवळ जाऊन त्याचा चेहरा अंधारात पाहण्याचा प्रयत्न केला. पण दाढीमुळे काहीच समजत नव्हतं. ती निराश झाली. त्याला सोडून उठली; मात्र तिच्या स्पर्शाने काहीशा भानावर आलेल्या त्या व्यक्तीच्या तोंडून तिचंच नाव बाहेर पडलं आणि... मग आनंदाश्रूंचा पाऊस अखंड कोसळू लागला...!

Thursday, June 23, 2011

'बाप' माणूस...

त्यांनी टोपी काढली, घाम पुसला. पायऱ्या चढून आल्यामुळे लागलेली धाप कमी होण्याची वाट पहात शांतपणे खुर्चीत बसून राहिले. वयाने बहुधा पासष्टी ओलांडली असावी; पण अगदी अपटुडेट होते.
"वयाच्या मानाने झेपत नाही. पायऱ्या चढल्या की धाप लागते'' स्वगत बोलावे तसे ते टेलीफोन ऑपेरटरशी बोलले. मग शांतपणे उठले. हळूहळू जाहिरात विभागात गेले.
जाहिरात घेणाऱ्याकडे पाहून ओळखीचं हसले. त्यानेही फोनवर बोलतच हसून दाद दिल्याने त्यांना जरा बरं वाटलं. त्याने आजोबांना खुर्चीकडे हात करून बसण्याची खूण केली. आजोबांनी खुर्चीवर बसून शरीर काहीसं सैलावलं आणि त्याच्या फोन संपण्याची वाट पाहू लागले.
फोन संपवून तो म्हणाला, ""बोला आजोबा. किती उन्हात आलात? काल रात्रीच नाही का यायचं? ऊन तरी लागलं नसतं''
"ठरवलं होतं यायचं, पण जमलंच नाही. आज येण्याशिवाय पर्याय नव्हता.''
मला त्यांचा संवाद ऐकू आला आणि माझं त्यांच्याकडे लक्ष गेलं. मी पाहतोय हे पाहिल्यावर ते माझ्याकडे पाहून ओळखीचं हसले. त्यांच्या नजरेत मला हरवलेपण जाणवलं. माझ्या चेहऱ्यावरील स्मित पाहून बहुधा त्यांनाही बरं वाटलं.
दोघांत काहीतरी बोलणं झालं. त्यांनी खिशातून कसलासा लिहिलेला कागद काढून त्याच्याकडे दिला. त्यानं खात्री केली आणि पैसै घेतले.
"बराय निघतो मी, पुढील आठवड्यात येणार आहेच''
"ओके, आजोबा ! बाकी कसं काय चाललंय?''
"खरं सांगू मरण येत नाही म्हणून म्हातारपणाचं ओझं जेवढे दिवस वागवता येईल तेवढे वागवतो आहे; मग जगतोच आहे, तर जास्तीत जास्त समाधानाने कसं जगता येईल ते पाहतो. रोज फिरायला जाऊन प्रकृती उत्तम राखण्यासाठी प्रयत्न करतो. दिवसभरात सोसायटीमधील लोकांची जमतील तेवढी कामं करतो. सायंकाळी लहान मुलांना घेऊन गोष्टी सांगत बालपण शोधतो. रात्री मंदिरात भजन-कीर्तनाला जातो. जेवढं म्हणून आनंदी राहता येईल तेवढा आनंदी राहतो. जगण्याची शिक्षा मिळालीच आहे तर ती आनंदानं कशी भोगता येईल हे पाहतो. बराय चलतो. फार वेळ घेतला तुमचा, येतो.'' असं म्हणून पिशवी सावरत ते दरवाजाबाहेर पडले.
त्यांचं बोलणं ऐकून मी त्याला विचारलंच कोण होते हे आजोबा आणि कशासाठी आले होते?
त्यानं जे सांगितलं ते ऐकून मी सुन्न झालो....
माझ्यासमोर आजोबांनी दिलेला फोटो धरत तो म्हणाला, "" हा फोटो पाहिलांत, हा त्यांच्या 20 वर्षांच्या मुलाचा आहे. त्याच्या श्रद्धांजलीची जाहिरात द्यायला आले होते ते. दरवर्षी येतात न चुकता''
"कशानं गेला तो?''
"इंजिनिअरींगच्या दुसऱ्या वर्षात शिकत होता. कॉलेजमध्ये गॅदरींग होतं. मित्रांसोबत राबून त्यानं त्याची तयारी केली. गॅदरींगच्या आदल्या दिवशी डिसेंट्री लागल्याचं निमित्त झालं आणि त्यातून तो उठलाच नाही. हाता-तोंडाशी आलेल्या लेकाचं निष्प्राण कलेवर थकलेल्या खांद्यावरून आजोबांना वहावं लागलं.''
"बाप रे, केवढा मोठा आघात!'' माझा स्वर जड झाला.
"सर ते मघाशी म्हणाले नं पुढील आठवड्यात येणार आहे, का माहित आहे?''
"का?''
"बायकोला आदरांजली वाहण्याची जाहिरात द्यायला''
"काय...?''
"हाता-तोंडाशी आलेला मुलगा गेल्याचा धक्का ती माऊली सहन नाही करू शकली. तिने अंथरूण धरलं आणि त्यातून ती उठलीच नाही. त्या दिवसापासून गेली काही वर्षे आजोबा आपल्या एका मुलीसह राहत आहेत. इतर दोन मुलींची चांगल्या घरात लग्ने झाली आहेत. घरी आहे त्या मुलीला फिट्‌सचा विकार आहे, त्यामुळे ती त्यांच्याबरोबरच राहते. दोघंच एकमेकांचे आधार.''
"काय सालं नशीब!' केवढे हे आघात आणि ते सर्व सहन करणारा पहाडासारखा बाप माणूस. अडचणींचे एवढे अडथळे येऊनही मोडून न पडता जगण्याशी दोन हात करून जगण्यावर विजय मिळविण्याचा प्रयत्न करणारा बाप माणूस... त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करताना माझ्या डबडबलेल्या डोळ्यांतून दोन थेंब ओघळलेच.

Sunday, June 19, 2011

बापपण अनुभवताना...

कानावर तुझा रडण्याचा पहिलावहिला ट्याहां ट्याहांचा स्वर पडला अन्‌ आनंदानं छाती गच्च भरून आली.
तुझा जन्मसोहळा सुखरूप पार पडावा म्हणून हातांची बोटे होती त्या वेळी एकवटलेली परमेश्‍वरचरणी.
दुपट्यात गुंडाळलेली मऊसुत सावरीपरी तू आलीस सामोरी खरी; मात्र तेव्हा पापण्यांवर थबकल्या थेंबांतून तू भेटलीस मला धूसर धूसर.
मला सुचलेच नाही तुला अनुभवण्याचे, ना हृदयाशी कवटाळण्याचे.
मग आलं भान जरा, इवल्याशा तुला मी धरलं
हृदयाला आणि बापपणाचा अर्थ पोचला पार मनाच्या तळाला.
तुझ्या लुकलुकत्या डोळ्यांनी, बालमुठीत एकवटलेल्या असंख्य स्वप्नांनी घातली मला साद आणि आनंदाने भरून वाहत राहिला माझा श्‍वास अन्‌ श्‍वास.

------------------------
आळसावलेलाच होता तो माझा दिवस जरा.
भोवताली तुझं रांगत-रांगत खेळणं, मध्येच येऊन पुस्तक ओढणं, मस्ती करणं आणि सुरू होतं खळाळून हास्यफुलं उधळणं.
खेळता खेळता एकवटलंस बळ आणि राहिलीस क्षणभरच पहिल्यांदाच उभी स्वतःच्या पायावर.
पाहिलंस माझ्याकडे तेव्हा डोळ्यांत तुझ्या उसळला होता आत्मविश्‍वासभरला सागर.
हसलीस छानसं गोड आणि टाकलंस पहिलं अडखळतं पाऊल.
गेला तोल तुझा, सावरलं मी तुला अलगद हातांवर.
तुझ्या चेहऱ्यावर आनंद उमटला आणि माझ्या विस्फारल्या बाहुल्यांनी साठविला तो क्षण डोळाभर.

------------------------
त्या दिवशी पोचलो पाऊसधारांना सोबत घेतच शाळेवर.
मस्त गुलाबी ड्रेस खुलला होता तुझ्या नाजुकशा अंगावर.
गोड-गोड बोलत, समजावून सांगत, कॅडबरीचं प्रॉमिस करत सोडलं तुला वर्गाच्या दारात.
बाईंनी तुला घेतलं आत आणि लावून घेतलं दार.
बंद होणाऱ्या दारांच्या फटीतून दिसली मला तुझी भरून आलेली नजर आणि जाणवली त्यामध्ये दूर जातानाची असहायता, माझ्यावर आलेला मोठ्ठा राग आणि व्यक्त न करता येणारी घुसमट. बोलत होती नजर, "बाबा, तू वाईट्ट आहेस, सोडून मला नको जाऊस...' आईशपथ सांगतो त्या नजरेनं कालवला जीव. शहारा उमटला देहभर.

------------------------
कॅलेंडरवरील तारखा राहिल्या फडफडत, अंगणातला पारिजातकही फुलत राहिला काठोकाठ.
उगवणाऱ्या प्रत्येक सोनेरी दिवसाचं बोट धरून तू आनंदाच्या किरणांनी शिंपलेस आपलं अंगण.
समाधानाचे क्षण गुंफत राहिलीस एक-एक आणि घट्ट होत गेले आपसुक सारे भावबंध.
तुझे यशाचे क्षण घेऊन आले आनंदसरींची बरसात आणि चिंब न्हात राहिलं आपलं घर.
कधी पुरवून घेतलास हट्ट, कधी रुसलीस, कधी लटक्‍यानेच रागावलीस, भांडलीसही, मोठी होऊनही "गट्टी फू' करताना तू माझ्यासाठी मात्र सानुलीच राहिलीस.
तुझ्या कर्तृत्वाने आकाश आमचे उजळले, यशाचे ते सोनभरले क्षण भरून ठेवले मनाच्या कुपीत.
वाटली जेव्हा काळजी पहिल्यांदा तुझ्याबद्दल, तेव्हा खांद्यावर हात ठेवून म्हणालीस, "पिलावर विश्‍वास नाही का तुमचा बाबा?'
गैरविश्‍वास नव्हता गं! आतून आलेले तुझ्याबद्दलचे काळजी वाहणाऱ्या बापाचे भेदरलेपण.
ते भेदरलेपण मोडताना भक्कम अस्तित्वाने तू घालत राहिलीस सतत फुंकर.
ओळखतात जेव्हा मला "तुझा बाबा' म्हणून, अभिमानाने भरलं माझं मन हिंदोळत राहतं वाऱ्याच्या लहरींवर.

------------------------
पाहू या- करू या... करत मी ढकलत राहिलो तुझ्या आयुष्यातला तो सोनेरी दिवस.
मात्र अखेर आलाच "तो क्षण', जो माहीत असूनही लपवत राहिलो स्वतःपासून आयुष्यभर.
सनई, चौघडे वाजू लागले, घर सजलं, अंगण मांगल्यानं काठोकाठ भरलं.
सनईच्या सुरावटीने भारला सारा भवताल. पळ भरले आणि आली लग्नघटिका समीप.
"शुभमंगल....' शब्द-सूर उच्चारत गेले आणि फुटणारा बांध कसा आवरू आवरू झाले.
...आठवला तुझा जन्मसोहळा, तुझा पहिला मृदू सहवास, लुकलुकणारे डोळे, तुझं पहिलं पाऊल, पहिलं यश.
आठवला तुझा मला धीर देणारा स्पर्श, मैत्रीण होऊन झेलताना लुटलेला बापपणाचा आनंद.
उभे राहिले डोळ्यांसमोर तुझ्यासोबतचे लटके रागाचे क्षण, कधी तरी चुकून उचलला गेलेला हात आणि मग कुशीत शिरून मुसमुसणाऱ्या तुला सावरताना माझ्यातला गळून पडलेला कठोर बाप.
"कन्यादानाचं पाणी सुटलं हातातून अन्‌ जाणवलं आपलं पिलू आपल्याला कायमचं दुरावलं...'
उंबरठा ओलांडण्यास निघाली अन्‌... "बाबा।।। म्हणून धावत शिरलीस आवेगाने माझ्या कुशीत...'
खरं सांगतो पोरी, तेव्हा कढ दाटल्या हृदयातलं बापपण धो धो रितं होत राहिलं अश्रूंमधून..
also on: http://72.78.249.107/esakal/20110619/5214167252538387743.htm