Thursday, December 27, 2012

चप्पल

online degree programs
मूर्तीला नमस्कार करून तो मंदिरातून बाहेर पडला. देवाचं नामस्मरण करत तो बाहेर पायऱ्यांवरच एका बाजूला काही वेळ तसाच बसून राहिला. काही वेळाने उठला. पुन्हा एकदा मूर्तीकडे पाहून त्याने नमस्कार केला आणि चप्पल घालण्यासाठी तो स्टॅंडजवळ आला तर ठेवल्या जागी त्याला त्याची चप्पलच दिसेना... तो अस्वस्थ झाला. अस्वस्थपणेच त्यानं सगळं चप्पल स्टॅंड तीन-तीनदा पाहिलं; मात्र चप्पल काही त्याला सापडली नाही. मघाशी देवाचं नामस्मरण करणारा तो अस्वस्थपणे आता मनातल्या मनात चप्पल नेणाऱ्याला "लाखोली' वाहू लागला. महिनाच झाला होता चप्पल घेऊन... आता पुन्हा भुर्दंड... एकदा चप्पल घेताना शंभरदा विचार करतो आम्ही आणि नेणारा... त्यानं पुढची वाक्‍ये मनातल्या मनात उच्चारली आणि दोन शिव्याही हासडल्या... वैतागून तो पुन्हा पायरीवर जाऊन बसला...काही वेळ गेला. मनाशी काही तरी ठरवून उठला. इकडं तिकडं बघत... त्यानं त्यातल्या त्यात बरी चप्पल पायात सरकवली आणि देवाकडं पाठ करून तो मंदिरातून बाहेर पडला. 

पायऱ्या चढून घरात येता-येता, चप्पल काढतच त्याने झाली हकीकत "कुटुंबा'ला सांगितली. 
त्याच्या पायाकडं पाहत त्याचं कुटुंब म्हणालं, "हे बरं झालं बाई, काहीतरी पायात घालून आलात ते! नाहीतर नेहमीप्रमाणे मंदिरात चप्पल गेली की पायात काहीही न घालता आला असता म्हणजे उद्या पहिली चप्पल खरेदी करावी लागली असती.'' 

तिचं ते बोलणं बहुधा त्याच्यापर्यंत पोचलं नसावं. तो कपडे काढून बेडवर आडवा झाला आणि चप्पल गेल्याचा विचार करू लागला. नेणाऱ्याला माझीच चप्पल दिसली काय? जरा नवी दिसली की घातली पायात. माणसांनी पुरती लाजच सोडली आहे. चपला पण सोडत नाहीत... अरे एखाद्याची ऐपत नसेल तर त्यानं काय अनवाणी फिरायचं? काय सालं जिंदगी...' तो चप्पलच्या विचारांतून बाहेरच यायला तयार नव्हता. एवढ्यात कुटुंब म्हणालं, "अहो तुम्ही ज्याची चप्पल घालून आलात तो बसला असेल की शोधत.'' 

झालं. तिच्या या वाक्‍यासरशी त्याच्या विचारांनी एकदम यु टर्न घेतला. अरेच्चा हा विचार मी केलाच नाही. मघाशी आवेगात चप्पल घालून आलो खरा पण, यापूर्वी मी जे अनुभवलं तोच अनुभव माझ्यामुळे एखाद्यावर येणार...आता तो आणखी अस्वस्थ झाला. त्याला आता अपराध्यासारखं वाटू लागलं. "माझी चप्पल गेली जाऊ दे... पण आपण दुसऱ्याची चप्पल घालून यायलां नको होतं. मी उद्या दुसरी चप्पल घेऊ शकतो; पण ज्याची चप्पल मी घालून आलो त्याची जर ऐपत नसेल तर... हे माझ्या लक्षात कसं आलं नाही. भावनेच्या भरात घातली चप्पल आणि आलो घरी. का मी भावनांवर नियंत्रण नाही ठेवू शकलो. काय अवदसा आठवली मला... विचारांचा भुंगा त्याला पोखरू लागला आणि त्याच्या अस्वस्थतेमध्ये भरच पडू लागली... 

त्याच अस्वस्थतेत त्यानं दिवसभर ऑफिसात काम केलं. पायातली चप्पल त्याला मनात टोचत राहिली. कधी एकदा घरी जातोय असं त्याला झालं. काम संपवून तो घरी आला... फ्रेश झाला. त्यानं पुन्हा "ती' चप्पल अडकवली आणि तडक मंदिर गाठलं. जेथून त्यानं "ती' चप्पल पायात सरकवली होती तिथंच ती काढून ठेवली. चप्पल पायातून काढताच त्याला एकदम हलकं-हलकं वाटू लागलं. डोक्‍यावरचं ओझं उतरल्याचं समाधान त्याला मिळालं. तो पुन्हा मंदिरात गेला. मूर्तीपुढे नतमस्तक झाला. यावेळी त्याच्या मनावरील मळभही बऱ्यापैकी दूर झालं. चप्पल कोणाची का असेना, आपण पुन्हा जागेवर आणून ठेवली. ज्याची आहे तो कदाचित चप्पल शोधण्यासाठी येईल आणि त्याला ती मिळूनही जाईल; पण आता किमान ती माझ्याकडे तरी नाही याचं समाधान. हा विचार करतच तो बाहेर पडला आणि पायऱ्यांवर येऊन बसला. आता पोखरणाऱ्या भुंग्याने त्याची पाठ सोडली होती. चप्पल हरवल्याचं वाईट वाटणं त्याच्या लेखी संपलं होतं. आपण घालून गेलेली चप्पल पुन्हा आणून सोडल्याचं समाधान त्याला जास्त समाधानी करत होतं. त्याच समाधानात तो बराच वेळ तसाच बसून राहिला. 

बराच वेळ गेला. आता तो पायऱ्यांवरून उठला. पुन्हा एकदा समाधानाने मूर्तीला नमस्कार केला आणि मंदिरातून बाहेर पडला. जाताना सहज त्याचं लक्ष चप्पल स्टॅंडकडे गेलं. पाहतो तर काय... त्याची काल कोणीतरी घालून गेलेली चप्पल आहे त्याच जागी आणून ठेवलेली त्याला दिसली. तो घाईने जवळ गेला. त्यानं निरखून पाहिलं तर ती त्याचीच होती म्हणजे ज्यानं नेली होती त्यानं ती पुन्हा आणून ठेवली होती तर.... त्यानं अगदी अधाशीपणे ती चप्पल पायात सरकवली. पुन्हा एकदा मंदिरातील मूर्तीकडे पाहिलं आणि मस्त शीळ वाजवत तो तिथून बाहेर पडला... पूर्ण समाधानाने!

Tuesday, November 13, 2012

"सृजन' ई दीपावली अंक प्रकाशित

दीपावलीच्या पहिल्या दिवशी "सृजन' ई दीपावली अंक' हाती देताना मनस्वी आनंद होत आहे. यंदाचे "सृजन'चे दुसरे वर्ष. "सकाळ' वृत्तपत्रसमुहाचे मुख्य संपादक श्री. श्रीराम पवार यांनी क्‍लिक करून अंकाचे प्रकाशन केले आणि अंक आंतरजालावर रसिकांसाठी वाचनासाठी खुला झाला. पहिल्यांदा ई दिवाळी अंक करण्याच्या गतवर्षीच्या प्रयत्नांना भरभरून दाद दिली होतीत, यंदाही तसाच प्रतिसाद द्याल ही अपेक्षा.
अंकाबद्दल जरूर कळवा.

Thursday, October 25, 2012

"एबीपी माझा'च्या "ब्लॉग माझा' स्पर्धेत बक्षिस

"एबीपी माझा'च्या "ब्लॉग माझा' स्पर्धेच्या चौथ्या पर्वाचा निकाल सोमवारी जाहीर झाला आणि विशेष आनंदाची बातमी म्हणजे माझ्या http://prajkta-prajkta.blogspot.in/ या ब्लॉगला उत्तेजनार्थ बक्षिस मिळाले. हा आनंद तुम्हा सर्वांच्या प्रेमामुळेच मला मिळाला असे मी मानतो. म्हणूनच हा आनंद मी तुमच्यासोबत शेअर करतो.
-----

Tuesday, October 23, 2012

Saturday, October 13, 2012

चैतन्याचं झाड...

डोक्‍यावरून हात फिरवत केस व्यवस्थित असल्याचा अंदाज घेत त्यानं पायात चप्पल सरकवली, खांद्याला अडकवलेली पिशवी पुन्हा एकदा सरळ केली आणि तो घरातून बुथकडे जाण्यास निघाला. त्याच्या नव्या दिवसाची सुरवात झाली. घरापासून साधारण किलोमीटरवर त्याचा बुथ होता. दिवसभर काम करायचं सायंकाळी घर गाठायचं हे त्याचं गेल्या कित्येक वर्षांचं रुटीन. या रुटीनला तो मुळीच कंटाळलेला नव्हता. त्याला कारण त्याचा रोजचा जाता-येता होणारा प्रवास. या किलोमीटरच्या प्रवासात तो रोजच्या आयुष्याला नव्याने सामोरा जात असे. आजचा दिवसही असाच. तो घरातून बाहेर पडला आणि त्याची पावलं नेहमीच्या दिशेने पडू लागली.
काही अंतर जाऊन तो कोपऱ्यावर वळला आणि डाव्या बाजूला पाहत त्यानं श्रद्धेने हात जोडले. काही क्षण रेंगाळला. मंदिरातील घंटा किणकिणली... एकापाठोपाठ तिची कंपनं त्यानं रोजच्या सवयीनं ऐकली. तो तोंडातच काहीतरी पुटपुटला... बहुधा "देवा मला सुखी ठेव' असं काहीसं म्हणाला. पुन्हा वळून चालू लागला. गेल्या कित्येक वर्षांची सवय. तो खास होऊन मंदिरात जात नसे; पण रोजचा नमस्कारही चुकवत नसे. मंदिरातल्या देवानंही ते ताडलं असावं. तो त्याच्या बाहेरून केलेल्या नमस्कारावरही खुश होत असावा. कारण गेल्या कित्येक वर्षात या मंदिरात न येणाऱ्या भक्ताला त्यानं फारसा त्रास दिलेला नव्हता. त्यामुळे त्याचा रोजचा नमस्कार देवापर्यंत पोचत होता आणि देव त्यावरच खुश होता.
काही अंतर पार केलं आणि मोगरा, गुलाब, चमेली, निशिगंध, सोनचाफ्याच्या फुलांचा मिश्रित गंध त्याच्या नाकाजवळ रेंगाळला. येथूनच घराघरांतील देव्हाऱ्यांत फुलं पोचतात आणि घरं सुगंधीत होतात. काही क्षण त्याचा चालण्याचा वेग मंदावला. त्यानं फुलांच्या दिशेने पाहत हा मिश्रीत गंध छाती भरून घेतला. हा गंध आता त्याला दिवसभर सोबत करणार होता. या गंधाच्या साथीने तो दिवसभराची कामे न कंटाळता करत राहणार होता. समाधानाने तो स्वतःशीच हसला आणि चालू लागला.
आता कपबशा विसळल्याचा, चहामध्ये घालायची सुंठ छोट्या खलबत्त्यात कुटल्याचा आवाज कानावर पडला आणि तळणीचा खमंग वासही त्याच्या नाकात शिरला. त्याची पावलं "तुकाराम'च्या चहाच्या गाड्याकडे वळली. समोर मांडलेल्या खुर्चीवर तो विसावला. "काय कसं काय?'ची चौकशी झाली. तुकारामनं चहाच्या पातेल्यात ओगराळं फिरवत "मस्त चाललंय' म्हणत त्याला प्रतिसाद दिला. जोडीला इतर विषयांवर चर्चा रंगली. बोलत बोलत चहा पिऊन झाला. त्याच्या पायाला विश्रांती आणि मनाला समाधान लाभलं. अमृततुल्यची चव ओठांवर रेंगाळली तिच सोबतीला घेऊन तो बाहेर पडला आणि पुन्हा बुथ जवळ करू लागला. आता एक चौक ओलांडला की पुढच्या चौकात बुथ. चालत चालत तो दिवसाच्या कामाची मनात आखणी करू लागला. अमूक पुस्तकांचे गठ्ठे बांधून ठेवायचे. उद्या उदबत्त्या आणायला हव्यात. काही ब्रॅंड संपलेत, कागदही संपत आलेत, ते ही आणून ठेवले पाहिजेत. पुढच्या महिन्यात कॅलेंडर लागणार तेही आणले पाहिजेत... विचारांच्या तंद्रीत तो चौकाजवळ पोचला.
---
तो चौकात पोचला खरां... पण त्याला चुकल्याचुकल्यासारखं वाटू लागलं. घरातून निघालेली वेळ, तुकारामच्या चहाच्या गाड्यावर घालवलेला वेळ आणि चौकात पोचायची वेळ यांचं गणित चुकल्यासारखं वाटू लागलं. का आपला रस्ता चुकला हेही त्याला समजेना. त्यानं हातातली काठी सवयीच्या पारावर आपटली तर तो पार तेथेच होता. तेथे नेहमी दोन वाहने उभी असतात ती पण त्याच्या जागी होती. तरीही त्याला काही तरी हरवल्यासारखं वाटत होतं. आपण चुकून विचारांच्या तंद्रीत भलत्याच रस्त्याला तर लागलो नाही ना! आता तो प्रचंड अस्वस्थ झाला. आता दुकानात पोचताना कसरत करावी लागणार, चार ठिकाणी विचारावं लागणार... विचारावं लागणार या विचारानं त्याची अस्वस्थता आणखी वाढली. परावलंबित्वाचा एक काटा त्याला टोचू लागला. इलाज नाही हे समजून अंदाज घेण्यासाठी त्यानं जाणाऱ्या एकाला हटकलं आणि विचारलं. दादा इथं कोपऱ्यात एक झाड....?
तो म्हणाला,"काय राव, रस्ता रुंदीकरणासाठी कार्पोरेशननं काल रात्रीच झाड तोडलं की... लाकडं पण गोळा करून नेली!'
--
...आता मात्र तो आतून कोसळला. आधार घेत बाजूच्या पाराला टेकला. पोचेल तिथपर्यंत हात फिरवत राहिलां. बुंधा हाताला लागेल या वेड्या आशेने चाचपत राहिला. झाडच नसल्यामुळं बुंधा असण्याचा प्रश्‍नच नव्हता. रोजची त्याला परिचित असणारी पक्ष्यांची किलबिलही नव्हती... तिथून जाताना रोज अनुभवण्यास मिळणारी वाऱ्याची झुळुक नव्हती...
रोज किलबिलाटाचा आवाज कानी पडला की रस्ता बरोबर असल्याची खुण त्याला पटायची आणि पक्ष्यांच्या आवाजानं त्याच्या मनावरील निराशाही दूर होत राही. तो किलबिलाट त्याच्या अंधारल्या आयुष्यात चैतन्य निर्माण करत राही, जगण्याचं सूत्र समजावत राही. वाऱ्याची झुळुक मनाला आणि देहाला गारवा देत राही... पण आता हे झाड भेटणार नाही... पक्ष्यांचे हक्काचे घर हिरावले गेल्याने त्यांचा किलबिलाट नाही... वाऱ्याची झुळुक नाही... जाणाऱ्या-येणाऱ्यांना सावली नाही आणि आपल्या रस्त्यात रोज मिळणारं चैतन्यही नाही... त्यानं ओलावलेले डोळे पालथ्या हाताने कोरडे केले... पुन्हा एकदा दोन्ही हात पारावर फिरविले... हाताशी झाडाचं एक गळालेलं पान लागलं. ते हाताशी घेतलं... थरथरणाऱ्या काठीने अंदाज घेतला आणि तो भरल्या मनाने दुकानाच्या दिशेने चालू लागला...