Thursday, August 11, 2011

धोनी धावला...एकदाचा (इंग्लंड डायरी)


भारतीय क्रिकेट संघाची अवस्था वादळात सापडलेल्या नौकेसारखी सध्या झालेली आहे. इंग्लंडमधील वातावरण, तेथील खेळपट्ट्यांना भारतीय संघ नेमका कधी जुळवून घेणार याचे उत्तर दौरा निम्म्यावर आला तरी अद्याप मिळालेले नाही. तिसऱ्या कसोटीमध्ये भारताने कसाबसा दोनशे धावांचा टप्पा ओलांडला. मोठ्या गाजावाजा करत संघात दाखल झालेला सेहवाग शुन्यावर बाद झाला. (याबद्दल त्याला दोष देता येणार नाही, कारण त्यालाही खेळपट्टीसोबत जुळवून घ्यायला थोडा वेळ लागणारच) गंभीरची सुरवात झकास झाली पण पुन्हा एकदा तो मोठी खेळी उभारण्यात अपयशी ठरला. मग भिंत स्वस्तात ढासळली आणि व्हेरी व्हेरी स्पेशल लक्ष्मण स्पेशल करण्यापूर्वीच परतला. महाशतकामुळेच गेले काही दिवस चर्चेत असलेला मास्टर ब्लास्टरने भोपळा फोडला पण त्यापेक्षा जास्त काही करण्यापूर्वी त्याची बॅट थंड करण्यात आली. रैनाची दैना याही सामन्यात संपली नाही आणि पाहता पाहता सहा फलंदाज शंभर धावांत तंबूत. ही अवस्था पाहिल्यानंतर एकवेळ भारतीय संघ दीडशे धावांचा टप्पा पाहील ही अपेक्षा चाहत्यांनी सोडून देऊन स्टॅंडमधून बाहेर पडायला सुरवातही केली; मात्र कसा कोण जाणे पण आज धोनी पेटला. दौऱ्यात प्रथमच त्याची बॅट मैदानावर चालली. "आक्रमण हाच उत्तम बचाव' हे सूत्र अंगीकारून धोनीने प्रवीणकुमारसह सायबांच्या गोलंदाजीवर हल्लाबोल केला आणि मग मात्र धावफलक वेगाने हलता झाला. धोनी दोन षटकार ठोकून मैदानात चैतन्य आणले. जो भारतीय संघ दीडशे धावांचा टप्पा गाठेल असे छातीठोकपणे सांगता येत नव्हते. त्या संघाने दोनशे धावांचा टप्पा ओलांडला तो धोनी आणि कुमारच्या धडाकेबाज खेळीमुळे. धोनीच्या खेळीमध्ये क्रिकेटमधील फारसे आदर्श फटके नव्हतेच पण तो खूप दिवसानंतर त्याच्या शैलीत खेळला आणि त्याच्या बॅटला धावांचा खुराक मिळाला. तो बाद झाला तेव्हा समोर त्याला ज
ोडीला फारशा आशा राहिलेल्या नव्हत्या; मात्र त्याच्या 77 धावांच्या खेळीने संघाची अब्रू काही प्रमाणात तरी झाकली. गेल्या काही सामन्यांत पूर्णतः सूर हरपलेल्या धोनीने बुधवारच्या खेळीने काही प्रमाणात पुन्हा एकदा लय पकडण्याचा प्रयत्न केला. गोलंदाजांनी गुरुवारी जर करामत दाखवली तर धोनीच्या 77 धावांचे मोल नक्कीच समजेल. तूर्त एवढेच म्हणता येईल. रथी-महारथींच्या बॅटा थंडावलेल्या असताना धोनीची बॅट तळपली. संघ अडचणीत असताना कर्णधाराने धावून जायचे असते, याला बुधवारी एकदाचा काही प्रमाणात का होईना न्याय दिला. आता इतर आघाड्यांवरही असाच आक्रमकपणा दाखवून भारतीय संघाची गेलेली पत, अब्रू काही प्रमाणात का होईना परत येऊ शकेल अर्थात त्याला इतर खेळाडूंचीही तेवढ्याच समरसतेने साथ मिळण्याची आवश्‍यकता आहे.

2 comments:

भानस said...

आधीच्या दोन्ही सामन्यातली आपली दैना पाहून पुढचे काहीच पाहू नये असे वाटू लागलेले असताना चक्क धोनी ला जाग आली. आता पुढे काय होतेय याची उत्सुकता लागण्यापेक्षा धडधडच जास्ती वाढली आहे. :(

आशा चिवट आहेच आपली तेव्हां... :)

प्रसाद तू नित्यनेमाने लिहीतोस त्यामुळे कळते तरी... :)

prajkta said...

thank u bhanastai