Thursday, August 18, 2011
शुक्लकाष्ठ सुरूच...
सायबांच्या भूमीवर उतरल्यापासून भारतीय संघाच्या पाठीमागे सुरू असलेले शुक्लकाष्ठ ओव्हलवरही कायम राहिले. सलग पराभवांमुळे गेलेली अब्रू काही प्रमाणात मिळविण्यासाठी गुरुवारी चौथ्या कसोटी सामन्यातून भारतीय संघ मैदानावर उतरला खरा पण, तो मैदानात उतरण्यापूर्वीच बऱ्यापैकी गोलंदाजी करणारा प्रवीणकुमार गमवावा लागला होता. या दुबळया गोलंदाजीचा समाचार घेत स्ट्रॉस आणि कुक यांनी संघाला नाबाद 75 धावांची सलामी दिली. पाऊस आला आणि दोन्ही संघांना पॅव्हेलियनमध्ये परतावे लागले. 75 धावांची सलामी देताना दोघांनीही भारतीय गोलंदाजीच्या सुमारपणावर शिक्कामोर्तब केले. पाऊस देवासारखा धावला आणि अब्रूच्या आणखी चिंध्या होण्यापूर्वी भारतीय संघ खांदे पाडून ड्रेसिंग रुममध्ये परतला. काहीच मनासारखं घडत नसल्याचे भाव त्या वेळी सर्वांच्या चेहऱ्यावर होते. सामन्यातील एक दिवस वाया गेल्यामुळे या सामन्यात यश मिळवून गेलेली पत मिळविण्याची संधीही काही प्रमाणात दुरावल्याचे दिसत आहे. शुक्रवारी गोलंदाजांची कामगिरी कशी होईल त्यावर भारतीय संघाचे यशापयश अवलंबून असेल.
Subscribe to:
Post Comments (Atom)
1 comment:
:(:(:(
Post a Comment